Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

संयुक्त वर्गाध्यापन काळाची गरज – जयवंत कुलकर्णी (शिक्षक समुपदेशक )

संयुक्त वर्गाध्यापन काळाची गरज – जयवंत कुलकर्णी (शिक्षक समुपदेशक )

अहमदनगर – बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोड पद्धती, चालू वर्गातसंगणक पडद्यावर देशोदेशीच्या बच्चे कंपनीला समोरासमोर आणून विविध शैक्षणिक विषयांवर त्यांच्यात सुलभ संवाद साधण्याचे अनोख तंत्र जगापुढे मांडून, जगातील १४३ हून अधिक देशांतील हजारो तंत्रस्नेही शिक्षकांना आपल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने लीलया जिंकून घेत मराठमोळ्या रणजितसिंह डिसले या सोलापूर जिल्ह्यातील खांडवी येथील प्राथमिक शिक्षकांनी सात कोटी मानधनाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड जिंकून भारतीय भावी शिक्षण पध्दती कोणत्या दिशेने प्रवास करत आहे हे अवघ्या जगाला दाखवून दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला कोविड विषाणूच्या आपत्तीत केवळ अपरिहार्यता म्हणून स्विकारावी लागलेली ऑनलाईन शिक्षण पद्धती पारंपारीक वर्गाध्यापनाला पर्याय ठरेल का ? चांगली इंटरनेट सुविधा व पुरेसे तंत्र अवगत करुन निम्म्याहून अधिक प्रमाणात शिकणे तसेच शिकविणे, एकाच वेळी शंभर ते अडीचशे लोक देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून एक दोन तासांहून अधिक काळ मोफत/अत्यल्प दरात शिक्षण, शालेय सभा, सरकारी प्रशिक्षणे, परिषदा, चर्चासत्रे, व्याख्याने घरबसल्या ‘ याची देही याची डोळा ‘ अनुभवता येणे यासारख्या जमेच्या बाजू लक्षात घेता आजचे हे शैक्षणिक तंत्रज्ञान येत्या काळात फळा खडू आणि चिमुरड्यांच्या गलगलाटात भरणाऱ्या वर्गाध्यापनावर मात करेल का ? यासारखे अनेक किंतू परंतु कोविड काळात शिक्षण वर्तुळात वारंवार चर्चेत येतात. दैनंदिन अध्यापनात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर हा अध्यापनशास्त्र
महाविद्यालयात अभ्यासला जाणारा विषय आहे. जगभरात कोविड परिस्थितीत त्याचे महत्व,
व्याप्ती आणि प्राबल्य प्रचंड वाढले आहे. पाठातील एखादी क्लिष्ट संकल्पना किंवा आशय विद्यार्थ्यांना समजण्यास सोपा जावा, त्याची प्रत्यक्ष अनुभूती यावी, अध्यापन एकसुरी न राहता ते मनोरंजक पद्धतीने व्हावे आणि मुलांचा त्या विषयातील रस वाढावा यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकतेनुसार मदत घ्यावी असा एक संकेत आहे. मात्र सारेच काही तंत्रज्ञानावर सोपवून अध्यापनातील मानवी संवादाचा वाटा न्यूनतम होणे कदापि अपेक्षित नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याची माणूस म्हणून होणारी सर्वांगीण प्रगती, वाढ आणि विकास समाजातून होणाऱ्या आदान प्रदानावर अवलंबून आहे. त्या दृष्टीने शाळा आणि वर्ग हीच एक समाजाची प्रतिकृती आहे. कुटुंबानंतर मिळणारी सुरक्षितता, प्रेमळ वागणूक, विश्वास, आपलेपणा आणि दुसऱ्या एका मोठ्या कुटुंबाचे आपण एक सदस्य आहोत ही जाणीव करून देणारा ‘शिक्षक’ ही एक अनादी काळापासून चालत आलेली संकल्पना आहे. विद्यार्थी आकलन आणि त्याचे दृढीकरण दृक, श्राव्य, दृकश्राव्य असे भिन्न प्रकारे होते. प्राप्त ज्ञानाचे उपयोजन तो समाजात करतो. स्पर्श, प्रयोग, गंध, कल्पना, कृती, सहभाग, सहकार्य, समायोजन, खेळ यातून होणारा भावात्मक, बोधात्मक, क्रियात्मक वाढ आणि
विकास होतो तोच मुळी समाजामध्ये. त्यासाठी प्रत्यक्ष वर्गांतर्गत आंतरक्रियांना कोणताही पर्यायअसूच शकत नाहीत. ऑनलाईन अध्ययन अध्यापन पद्धतीची ती सर्वात मोठी मर्यादा त्रिकालाबाधित आहे. बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थीपिढी देखील झपाट्याने तंत्रकुशल असल्याचा अनुभव या काळात प्रत्येक शिक्षकांनी नक्कीच घेतला असेल. त्यांची झपाट्याने तंत्रज्ञान अवगत करण्याची क्षमता शिक्षकांच्या एक घर पुढे असल्याचेही काही शिक्षक प्रांजळपणे कबूल करतात. मात्र माहिती, ज्ञान व कौशल्य यांची रुजवण करताना शिक्षकाची भूमिका आणि प्रत्यक्ष अस्तित्व निर्विवाद आहे. येत्या काळात शैक्षणिक तंत्रज्ञानावर शिक्षकांना सकुशल स्वार होता आले पाहिजे अन्यथा त्यांची अध्यापन पद्धतीच कालबाह्य ठरेल. त्यासाठी शासनाने आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षित करुन अधिकाधिक व्यवसायाभिमुख, तंत्रस्नेही बनविले पाहिजे.
शिक्षक आणि शासनामध्ये ही सजगता आणणारे करोना हे एक निमित्त आणि ” वेकिंग अलार्म ” आहे असे म्हणता येईल. नव्याजुन्याचा अध्यापनात सुरेख संगम (Blending)घालण्याची हीच ती वेळ आहे. करोनाने जागतिक व्यवसायांचा चेहरामोहरा, मानवी राहणीमान,अपेक्षा, विचारसरणी यात अमुलाग्र बदल होऊ घातले आहेत. शिक्षक व शिक्षण क्षेत्र त्याला अपवाद राहू शकत नाहीत. शिक्षकांनी आपल्यातील दूरदृष्टी शाबूत ठेवून त्या सर्व बदलांना स्वीकारावे. स्वतःसह भावी पिढीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकांनी तयार होण्याची गरज लक्षात घेणे हाच खरा करोनाचा वस्तुपाठ ठरेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close