Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

निवडणुकांच्या संग्रामात कार्यकर्ता जुटतो; आपसाततली आपुलकी आणि प्रेमळ हितसंबंध तोडण्यासाठी का? 

  कालच ग्रामपंचायत निवडणूक 2020 चा निकाल लागला. सगळीकडे जल्लोष,तर कुठे कुठे नाराजीचाही सूर होता. काही पण असू द्या; उमेदवार विजयी होवो की पराभूत,कार्यकर्ते हे त्यांचे ‘युज अँड थ्रो’ चे पॅकेट असतात,इतकेच! पण हे सुजाण म्हणणारे मतदार व हुशार असणारे कार्यकर्ते कधी समजून घेतच नाहीत. पराभवानंतर लागले आपसातच भानगडी करायला, हेवे- दावे उकरून काढायला! निखळ टाइमपास करत असाल तर एखादा आडवा- तिडवा चित्रपट पहा! ते चालेल; पण असे बेमतलबी बोलून स्वतः चा वेळ व बुद्धी खर्च करून मूर्खपणा करू नका मित्रहो!

  राजकारणाचे स्वरूप ग्रामपंचायत असू द्या की लोकसभा सारखेच! फक्त बदलतात चेहरे आणि त्यांचे काम करणारे मोहरे. मोहरा वापरला की फिका पडतो; आणि बाजारात फिका विकत नाही, म्हणून त्याची गरजपण शून्य होऊन जाते. भारताने शून्याचा शोध ‘शून्य’ होण्यासाठी नाही लावला, तर शून्याचे हजार, दहा हजार, करोड करण्यासाठी लावला. आम्ही तर इथं हजार घेऊन त्यालाच पगार समजायला लागलो. 

  आपले काम ‘मत’ देऊन बाजूला होणे; आपसात भानगडी करणे नाही. आणि वाद घालायचेच असतील तर विकास कामांच्या मुद्द्यावर घाला. मग तो कोण जवळचा व कोण दूरचा हे पाहत बसू नका; आणि तसे करता येत नसेल तर शांत बसा! उग, चार- चौघे बोंबलत आहेत म्हणून आपणपण ‘आ वासने’ शोभनीय नाही.

  तुम्हाला आपल्या कामाशी मतलब ठेवावा लागेल; आणि इतकाच फावला वेळ व इंटरेस्ट असेल तर राजकारणात उडी मारून उमेदवार व्हा! आता तुमचा हा इंटरेस्ट का आहे? यावरून मला काही देणेघेणे नाही. फालतू बहुमोलाची ऊर्जा वाया घालून अर्थ नाही, म्हणून ही सूचना. तुम्हाला काही गोष्टी पटतच असतील,तर एक संत आणा नाहीतर कुठला महात्मा काही फरक पडणार नाही. कोणी समजावून सांगू शकणार नाही;असे वागू नका म्हणून. फक्त तरुण पिढी काम करण्याच्या व कमाईच्या वयात असे व्यर्थ काम करून अनर्थ करू नये असे वाटते. म्हणूनच हा माझा खटाटोप!

  तुमच्या गावचे पाच वर्षांपूर्वीचे राजकारण पहा, नाहीतर दहा वर्षांपूर्वीचे! काय दिसेल? विरोधक सत्ताधारी हे समीकरण कायम बदलत आले आहे. विरोधक कधी शत्रू तर कधी मित्र होत असतात. पण आपण जिथल्या तिथंच असतो. कायम एकमेकांचे शत्रू होऊन बसतो. मतांसाठी गळा कापणारे उद्या गळ्यात गळा घालून फिरतील तर नवल वाटायला नको. आणि तसे घडले पण आहे,बऱ्याच वेळा! हे वेगळे सांगणे नको. 

  मतदार हा राजा असतो, केवळ मतदान होईपर्यंत. नन्तर तुम्ही कोण आणि आम्ही कोण? गरज सम्पली की कारभारपण पुढे धकत नाही. आणि ज्यात स्वतः चा मतलब नाही, ते नातेही जास्त काळ टिकत नाही. पुनः पाच वर्षाने नवीन निवडणुकीचे लग्न, पुनः नवीन पत्रिका आणि पुनः नवीन पाहुणे. लग्न झाले की संसार करणारे संसार करतात, कधी भांडतात तर कधी एकत्र येतात. पण पाहुणे फक्त अक्षता टाकायलच, आणि काही फिसकलंच तर सोयरीक करणारे जिम्मेदार म्हणून त्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे.

  सगळे विकास करायला बसले तर असेही विकास करायला कोणी रोखले नाही. फक्त तुमच्या भावना ज्या जास्त दिलजमाईकडून प्रक्षोभक होत आहेत, त्या भावनांना फक्त थोडा आवर घाला. नाहीतर 

भावनांची कदर न झाल्यामुळे भावनाशून्य होऊन जाल आणि कोणत्याच कामाचे उरणार नाही.

 चांगल्या नात्यात पैसा येऊ नाही म्हणतात, तसे घाणेरडे राजकारण पण आणू नका. तुमचा शेजारी हा शेजारीच असतो, अडीअडचणीला कायम धावून येणारा. चार दिवसाच्या पोर खेळासाठी त्याला दूर ढकलून स्वतःही त्यापासून दूर होऊ नका. तुमचे नाते जपा, ते अत्यंत महत्वाचे आहे. बाकी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा!

  माणूस आधी आला;  भानगडी, राजकारण व हेवेदावे हे नन्तर आले. जन्मल्या जन्मल्या तर कोणी भानगडी करायला लागत नसते. या राजकारणापूरते तरी लहान बाळासारखे निकोप वागायला शिका! ते तुमच्या फायद्याचे राहील! फायदा नाही झाला, तरी निदान तोटातरी होणार नाही.

  कार्यकर्त्यांचे मित्र खाजगी जीवनात वरच्यावर कमी व्हायले, पण राजकीय लोक स्वतः च्या स्वार्थासाठी खूप लवकर जवळ येतात. आणि राजकारणात असे काहीही होऊ शकते असे म्हणतात. तुम्ही फक्त ‘बाहुली’ बनता आणि तुमच्या जीवावर ते ‘बाहुबली’!

  ” तुम्ही मला मत दिले नाही हं!” असे कडक शब्दात विचारतात. “काय? तुझा बाप सांगून गेला की तू? आणि माझी जमीन तुझ्याकडे गहाण आहे की माझा सन्मान.” मतासाठी जाब विचारणाऱ्यांना आता तुम्हीपण जाब विचारा! तुझ्यामुळे माझ्या वार्डाचा काय फायदा झाला? आणि झाला असेल तर माझे मत मी कोणालाही देऊ शकतो. कोणी सांगणार नाही, ” मलाच दे!” म्हणून! आणि नाही जरी दिले तरी माझा अधिकार आहे तो, कोणाची जहागिरी नाही!

भांडणे,वाद- विवाद करत बसण्यापेक्षा स्वतःचे खाजगी काम करा! तुमचे व तुमच्या कुटुंबाचे भले होईल, नाही का? धन्यवाद!

लेखक- अमोल चंद्रशेखर भारती

( लेखक / कवी / व्याख्याते, नांदेड )

मो- 8806721206

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close