Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

ऑनलाइन की वन लाईन इन लाईन हेच ऑन लाइन

आज कोरोनाच्या विळख्यातच शिक्षण सापडलंय  म्हणून ते थांबलंय असं होतं नाही.घरात बसूनही शिक्षणाचे व्यवहारी व सामान्यज्ञानाचे म्हणजेच जीवन शिक्षणाचे धडे मुले घर बसल्या गिरवत आहेत.       प्रत्येक घरातील मुलं कोरोनाचे वाढते परिणाम पाहत आहे .त्यातूनच ते जागरूक होत आहे . वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता सावधगिरी कशी बाळगावी हे त्यांना समजतंय सुरक्षित राहणं काय असतं हे मुलं अनुभवताहेत. एकमेकातील सुरक्षित शारीरिक अंतर का आवश्यक आहे हे ती जाणून आहेत. संसर्गाची व्यापकता त्यांच्या लक्षात आलीय. संसर्ग साखळी तोडणे म्हणजे काय हे त्यांना माहिती झालंय .जगात कोरोनाने चालवलेलं मृत्यूचं रौद्र तांडव पाहून त्यांच्यातील सहृदयता , मानवता, संवेदनशीलता जागी होतेय.जाणाऱ्या जिवांविषयी त्यांच्या मनात हळहळ आहे .भीती ही आहे.       रस्त्यावर अनवाणी उपाशीपोटी ऊन वाऱ्यात घराकडे स्थलांतरीत होणारे मजूर त्यांची बिर्‍हाडं लहान मुलं बाया वृद्ध यांचे हाल  व शहरी जीवनावर आलेलं हे विषाणूचं भयंकर संकट ते पाहताहेत. संचारबंदी लाॅकडाऊन याविषयीची ते आता स्वत:च माहिती देताहेत. मुलांच्या मनांत एक काळजी आहे अनामिक हूरहूर आहे. भीती आहे हे कोंडलेपण एकदाचं संपावं अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांना आता ओढ लागलीय आपल्या शाळेची शिक्षक मित्र मैत्रिणी व शिकण्याची !खेळण्याची मुक्त हुंदडण्याची ! पण शाळा बंद आहे शिक्षण चालू आहे.         मुलांना मोबाइलचे फार आकर्षण! पाहिजे तेव्हा मिळत नसे  पण  आज ऑनलाईन शिक्षण सुरू झालं मुलांच्या हातात मोबाइल आला शिक्षक मंडळी अनेक पर्याय शोधू लागली मुलांपर्यंत अनेक प्रकारे  माध्यमांद्वारे शिक्षक शिक्षण घेऊन जात आहेत जे या तंत्राचे माहितगार व नवीन तंत्र  निर्माण करू शकतात ते ऑनलाईन धडपड करत आहेत.पण जे ऑनलाईन तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ आहेत ते मात्र अस्वस्थ आहेत. काहीजण व्हाट्स अप समूह बनवून तर कधी लाईव्ह निरनिराळ्या ऍप द्वारे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत आहेत हे सर्व ज्यांच्याकडे सर्व साधनांची उपलब्धता आहे असेच या मार्गाने जात आहेत .         तरी पण ऑनलाइन शिक्षणाला शेवटी मर्यादा आहेत त्याचा निश्चित अभ्यासक्रम हवा तो नाही,काय घ्यावं काय नको याची निश्चित उद्दिष्टे नाहीत. कोणत्या ऍचा ऑनलाईनसाठी वापर करायचा  जी विहीत व दर्जेदार इलेक्ट्रॉनिक साधनं असतील ती मोघम आहेत या शिकवण्याची पुस्तके  हवीत. मूल्यमापनात एकवाक्यता नाही. त्याची वेळ कालावधी यांचे वेळापत्रक सर्वांना सोयीचे असे हवे त्याचा अभाव  त्यामुळे अशा एकमार्गी शिक्षणात मुलांचा सहभाग तुलनेने कमी दिसून येत आहे.  शहरी भागातील पालक या साधनांची उपलब्धता करू शकतात पण ग्रामीण व अतिग्रामीण भागात हे कसे शक्य आहे ? साठ सत्तर टक्के मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच असणे हे म्हणजे ज्यांना शिक्षणाची नितांत गरज आहे तेच ऑनलाईन येण्यापासून दुरावलेत . काय आहे या आभासी शिक्षणात एक शिक्षक विषयाशी संबंधित अल्प वेळेत  संपेल अशी बहुपर्यायी चाचणी देतात दिलेल्या विषयांची टेस्ट मुलांनी सोडवायची  प्रश्न वाचा टिक टिक करा व सबमिट करा.         कधी शिक्षक समोर बोलतात मुले घरी बसून ऐकतात पण ते खरेच ऐकतात का ? ज्यांना नाही समजले ते शिक्षकांना शंका विचारू शकतात का ? किती संख्येने मुले यात सहभागी होतात ? त्याच्या घरात असे शिकण्यास योग्य वातावरण आहे का ? कोणी शंका निरसन करू शकेल का ?असे अनेक प्रश्न यात आहेत.        दुसरे असे की काही पालक प्रत्यक्ष मुलांबरोबर असतात यातून ते शिक्षकाच्या अध्ययन अध्यापनाचे बारकाईने मूल्यमापन करतात मुलं शिक्षक चुकले तर एकवेळ समजून घेतील पण कोणताही सुज्ञ पालक चुकीचे शिकवणे का माफ करीन ? अगदी तुमची  भाषा,उच्चार,लकबी ,हालचाली व एकंदरीत बाह्य वर्तनही यातून सुटणार नाही ही सावधगिरी बाळगावीच लागेल. नाही तर नको त्या चर्चा होतात अगदी त्याही ऑनलाईन !      शिक्षक ऑनलाईन जे शिकवतात ते मुलं डोळे आणि कानात प्राण आणून त्यांनी दिलेले होमवर्क पूर्ण करण्यासाठी तासंतास घरात व मोबाइलवर  बसून व पालकांच्या निगरानीखाली बसून बसून मुलं कंटाळलीत अनेक पालकांनी याला विरोध केला आहे ऑनलाइन हवे पण मोबाइल नको . अशा शिक्षणात मुलांना दीर्घोत्तरी व आकलनीय प्रश्न त्यांची उत्तरे ऑनलाईन लिहायला मर्यादा पडणारच . यासाठी अभ्यासक्रम विषय वेळ उपयुक्त साधने शैक्षणिक वातावरण व तंत्र कुशल शिक्षक तयारीसह असणे याची नितांत गरज ऑनलाईन शिक्षणात हवी.अजून आपल्या अंगवळणी पडायला वेळ तर लागेलच .         ग्रामीण व वाड्या तोड्यावर ,वस्ती व तांड्यावर अनेकांच्या घरात  खाण्याची भ्रांत आहे उपास पडताहेत जिथे बारा बारा तास लाईट नाही.ज्यांच्या जवळ स्मार्ट फोन तर सोडाच पण साधे मोबाइल ही नाहीत जिथे नेटवर्क गायब असते इंटरनेट नाही. इंटरनेट पॅक मारायला ज्यांच्याकडे पैका नाही तिथे ऑनलाईन शिक्षणाची पहाट कधी उगवणार ? तरी पण आज व बदलत्या काळानुसार ऑनलाईन शिक्षणाची निकड नाकारता येणार नाही. पण वर्गात शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यात जी भावनिक आंतरक्रिया होते त्या शालेय शिक्षणाची सर नाहीच ! म्हणून सध्या तरी ऑनलाईन शिक्षण वन लाईन ,एक दिशा वाटते.         मुलांनी भरलेल्या शाळेला तोड नाही .कारण शिक्षण जे आपण आपले अनुभव मुलांपर्यंत घेऊन जात असतो आणि मुलांच्या अपरिपक्व मनावर अनुभवांची पेरणी करीत असतो यातून काम करण्याचे वळण संस्कार मुलांवर होतात व त्यातून शिक्षण घडत जाते.शिक्षणातून आत्मविश्वास वाढावा  आत्मवृद्धी व्हावी की ज्यातून सतत शिकण्याची क्रिया घडत राहावी.ते हे शिक्षण . आपणांस शिक्षणातून कसा विकास व्हावा ही एक अपेक्षा असते मग ती भावनिक बौद्धिक शारीरिक अगदी सर्वांगीण विकास आपण अपेक्षित करतो व त्यादृष्टीने अभ्यासक्रम रचना उद्दिष्टे अध्ययनानुभव शिक्षण तज्ज्ञ ,शिक्षक पालक व समाज व परिसर देत असतो.त्यातून शिकणं घडत जातं.   खरे तर शिक्षणाचा मूळ हेतूच असा आहे की मनुष्याच्या सर्व जन्मजात शक्ती आंतरिक इच्छा वैयक्तिक सामाजिक  भरणपोषणांसाठीच्या शक्तींचा विकास होत जावा ज्यातून एक आदर्श नागरिक घडावा.आणि  शिक्षकही मुलांच्या सुप्त आंतरिक इच्छा गुण कला यांना शोधून वाव कसा मिळेल हे पाहतो. खरे तर हेच चारित्र्य निर्माण मूल्यसंवर्धनाचं काम शिक्षणाच्या माध्यमातून अपेक्षित असतं . व्यवहाराचे तत्त्वज्ञान मुलांनी अर्जित अनुभवातून सिध्द करावं पोपटपंची बनण्यापेक्षा स्वानुभवातून संपन्न बनावं व त्यातूनच सर्वांगसुंदर जीवनाची तयारी होत जावी. मुलांना वातावरण व परिस्थितीशी समायोजन साधता यावे जिंकल्याच्या आनंदाबरोबरच पराजयाचं ,अपयशाचं दु:ख पचवण्याची क्षमता निर्माण व्हावी .सुख दुःख नीती मूल्ये सदाचार यासाठी जी सकारात्मक कार्यशीलता लागते ती औपचारिक शिक्षणातूनही व्हावी . यातून सत्य शिव आणि सुंदर ही जीवनातील कल्याणकारी अंतिम मूल्ये समजून ती अंगवळणी पडण्याची अनुभवण्याची क्षमता शिक्षणातून सक्षमपणे निर्माण व्हावीत.ती पूर्तता आभासी शिक्षणातून कशी पूर्ण होऊ शकेन ?     परंपरागत सामाजिक अनुभवांचा वारसा जतन करून तो नेहमीच समृद्ध करून तो येणाऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत जावा ही हेतू शिक्षणातून निर्माण होत जावा.     जग बदललं ध्येये बदलली मूल्ये मात्र चिरंतन आहेत ती संवर्धित तर झालीच पाहिजेत.यासाठी इन लाईन म्हणजेच वर्गावर्गात रांगेत दिले व घेतले जाणारे शिक्षणच सध्या तरी ऑन लाईन म्हणजे योग्य आहे असे वाटते. (टिप..सबधीत लेखाची सर्व जबाबदारी ही लेखकांची आहे mh20live आसणार नाही, वाचकान साठी)

काकासाहेब वाळुंंजकर तज्ञ मार्गदर्शक , माजी प्राचार्य , रयत शिक्षण  संस्था , नगर

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close