Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

“वेलकम टू कोकण”

         “अतुल्य भारत” म्हणजे भारताच्या जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय ते गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा यासारख्या अनेक राज्यांना लाभलेला ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वैभवाचा साज! आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राचेही ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक वैभव पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे. अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा लाभलेला वरदहस्त जणू आपल्याला खुणावतोय आणि म्हणतोय….. “वेलकम टू कोकण!”

             श्री परशुरामाची पावनभूमी, लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य भूमी अशा अनेक थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाची, त्यांच्या अस्तित्वाची, कारकिर्दीची जाणीव करून देणारा आपला कोकण प्रांत!  पेशवेकालीन मंदिरे, सकाळ संध्याकाळचा सूर्योदय व सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांची समुद्रावर पडणारी सूवर्ण छाया, पावसाळयात कडेकपारीतून वाहणारा धबधबा इतकचं नव्हे तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अंगावर शाल पांघरून अंगणात केलेली शेकोटी, सकाळच्या न्याहारीसाठी केलेल्या आंबोळ्या, पोहे, उपमा, थालीपीठ तसेच जेवणातील सुरमई, पापलेट, सोलकढी आणि मोदकाचा आस्वाद, या सगळ्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकण हे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करते. आलेल्या पर्यटकांचे आदरातिथ्य करणे हे पर्यटकांच्या व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे.

               पर्यटन व आदरातिथ्य या दोन्हीही गोष्टी परस्परावलंबी आहेत, किंबहुना त्या असायलाच हव्यात. कोकणातील पर्यटन व तेथील आदरातिथ्य याचा अभ्यास करताना केलेले निरीक्षण “कोकणातील आदरातिथ्य” या विषयावरील अभ्यासक प्रा.डॉ.पराग र.कारुळकर यांनी  या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

              निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, शासन तसेच पर्यटन व्यावसायिक या सर्वांनी एकत्र येऊन कोकणातील पर्यटन  टिकविण्याच्या व  वाढविण्याच्या दृष्टिकोनातून  काम केले पाहिजे. अर्थात काही ठिकाणी उत्तम काम केले गेले आहे, किंबहुना करत आहेतच, यात शंका नाही.

              नवनवीन पर्यटनस्थळे शोधून काढणे व ती विकसित करणे, मूलभूत सोयीसुविधा प्रामुख्याने पर्यटनस्थळी स्वच्छ्ता गृह, रस्ते, वीजप्रवाह, दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे इ., औरंगाबाद येथील अजंठा वेरूळ या ठिकाणी जशा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एस.टी. च्या विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत, तशा धर्तीवर कोकणातील पर्यटन स्थळी विशेष बस सेवा सुरू केल्यास दळणवळणाची सोय अधिक सुलभ होईल. कोकणामध्ये अधिक पर्यटन माहिती केंद्रे उभारल्यास पर्यटकांना अल्पावधीतच पर्यटन ठिकाणाची व त्या जवळील पर्यटनस्थळांची तसेच तेथे उपलब्ध असलेल्या आदरातिथ्य (हॉटेल) व्यवसायाची माहिती मिळू शकेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढाकाराने प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शकाचा छोटासा अभ्यासक्रम चालवावा, जेणे करून स्थानिक तरुणांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून उपजीविकेचे साधन प्राप्त होवून अर्थार्जन करता येईल.

              कोकणामध्ये आदरातिथ्य व्यवसाय करताना प्रशिक्षित मनुष्य बळाची कमतरता प्रचंड जाणवते. त्याकरिता काही मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येवून हॉटेल मॅनेजमेंटचे तालुका स्तरावर किमान एक कॉलेज सुरू करायला हवे, त्यामुळे या क्षेत्रासाठी अपेक्षित असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. एमटीडीसीने नुकतेच सिंधुदूर्ग जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स चालविणाऱ्या नागरिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे, असे केंद्र प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत करावयास हवे. काही अंशी कोकणामध्ये स्थानिकांच्या पुढाकाराने वॉटर गेम्स सुरू केले आहेत, परंतु त्या वॉटर गेम्स ची साधने व त्यांचा मेंटेनन्स खूप खर्चिक आहे. जर अशा स्पोर्ट्स साधनांना आर्थिक मदत केली तर कोकणामध्ये सर्वच पर्यटन ठिकाणी अशा प्रकारचे वॉटर गेम्स सुरू करता येईल.

              पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, ऊस कारखाने, दुग्ध व्यवसाय जसे सहकार क्षेत्रावर आधारित आहेत, त्या प्रमाणे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायास देखील आर्थिक हातभार लावल्यास सर्वांच्याच हिताचे होईल.

               कोकणामध्ये कोकम, आवळा, कैरी, यांचे उत्पादन भरपूर प्रमाणात आहे. हॉटेलमध्ये आलेल्या पर्यटकाला कोकम सरबत, आवळा सरबत, कैरी पन्हे याचा आस्वाद ‘वेलकम ड्रिंक ‘ म्हणून द्यावा. हॉटेलमध्ये आलेल्या पर्यटकांचे स्मित हास्य व वेलकम ड्रिंक ने केलेले स्वागत पर्यटकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

कोकणातील खाद्य संस्कृती फार मोठी आहे. विशेषतः सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण तारकर्ली या पर्यटन स्थळी बहुतांशी पर्यटक विविध खाद्य पदार्थांची लज्जत लुटण्यासाठी जातात. प्रत्येक हॉटेल व्यवसायिकांनी हे बंधन कटाक्षाने पाळावे की, स्थानिक खाद्य पदार्थांशिवाय उदा. चायनीज, पंजाबी, दक्षिण भारतीय पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देवू नये. आपण जर दक्षिण किंवा उत्तर भारतात गेलो तर तेथे आपल्याला आढळून येईल की, त्या ठिकाणी पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थाशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ सहसा उपलब्ध करून दिले जात नाहीत.

              दक्षिण भारतामध्ये जसे सर्कल टुरिझम आहे त्याप्रमाणे, कोकणात देखील सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड-ठाणे-पालघर अशा जिल्ह्यांमध्ये असलेल्या पर्यटनस्थळांची जाहिरात करून, त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी बस सेवा सातत्याने सुरू ठेवल्यास पर्यटन वाढीस मोठी चालना मिळेल. हॉटेल रूम्स ची स्वच्छ्ता,  तेथे असणाऱ्या सोयी-सुविधा जर सुयोग्य असतील तर त्या ठिकाणी पर्यटक जास्तीत जास्त आकर्षित होतात. आजकाल डिजिटल जाहिरातीचा उपयोग, प्रसिद्ध ट्रॅव्हल वेबसाईट व टूर ऑपरेटर यांच्याबरोबर सामंजस्य करार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात.

            कोकणामध्ये पुरेशी जागा असताना देखील काही ठिकाणी पार्किंगची समस्या जाणवते. पर्यटकांना त्यांची गाडी पार्किंगचे भाडे मोजून देखील सुरक्षित पार्किंग करता येत नाही. यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेवून त्या शहरातील व गावांमधील काही जागा पर्यटकांच्या गाडी पार्किंगसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत. उत्तराखंड मधील नैनितालला जशी “टुरिझम पोलीस” ही संकल्पना आहे, त्या धर्तीवर कोकणात देखील “टुरिझम पोलीस” ही संकल्पना राबविली गेली पाहिजे.

             कोकणात प्राचीन काळातील अनेक मंदिरे आहेत. होळी, गणपती अशा सणांकरिता कोकणवासीय एकत्र जमतात. तेथील यात्रा, पालखी, उत्सव पाहण्यासारखे असतात. यानुषंगाने कोकणामध्ये धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. सध्या कोकण हे समुद्र पर्यटनाकरिता अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु त्याबरोबरच धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, साहस पर्यटन इ. पर्यटनाकरिता प्रसिध्दीस येवू शकेल. फक्त त्यासाठी योग्य नियोजनबध्द पर्यटन विपणनाची आवश्यकता आहे.     

              रायगडमधील माथेरान तसेच सिंधुदूर्ग मधील आंबोली ही ठिकाणे जशी थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत तसेच या ठिकाणी जैवविविधता देखील आढळते. त्या जैवविविधतेचा अभ्यास जैवविविधता पर्यटनाच्या माध्यमातून निसर्ग प्रेमींना करता येईल.

            कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हा जसा शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून केंद्रित केला आहे तसेच कोकणातील इतर चारही जिल्ह्यांना अर्थात संपूर्ण कोकणाला  “पर्यटन क्षेत्र” म्हणून घोषित करावे म्हणजेच संपूर्ण कोकणाचा विकास होवू शकेल. अशा या विविधतेने समृद्ध असलेल्या कोकणामध्ये बाराही महिने पर्यटन सुरू राहू शकते. फक्त पर्यटन व येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य जर सुनियोजित असेल, तर कोकणामधील पर्यटन हे दीर्घकाळ टिकेल. त्याकरिता पुढील 3 महत्वाच्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

•पर्यटनास आवश्यक असलेल्या सोयीसुविधा

•पर्यटन जाहिरात किंवा विपणन

•सुयोग्य व सुनियोजित आदरातिथ्य

      एक गोष्ट फार महत्वाची आहे की, कोणताही आर्थिक विकास करताना त्या ठिकाणाची नैसर्गिक क्षमता लक्षात घेतली पाहिजे तेथील नैसर्गिक क्षमता डावलून कोणत्याही प्रकारे आर्थिक विकास करता येत नाही. कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पर्यटन टिकवायचे असेल तर ते कृत्रिमरित्या विकसित न करता कोकणामध्ये असलेल्या नैसर्गिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक क्षमतेच्या आधारावर विकसित करायला हवे. परंतू हे सर्व अंमलात आणण्यासाठी फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता शासन, पर्यटनावर आधारित उद्योजक व स्थानिक लोक यांचा त्रिवेणी संगम कोकणातील पर्यटन व आदरातिथ्य उद्योगास दीर्घकाळ यशस्वी करू शकेल.

      लेखक:-

प्रा.डॉ.पराग र.कारुळकर

भ्रमणध्वनी क्रमांक:-9004504702                                                                      (लेखक ‘कोकणातील आदरातिथ्य’ या विषयावरील अभ्यासक आहेत.)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close