नांदेड : मिशन आईसीयू ने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 10 खाटांचा आईसीयू सेटअप सुरू केला आहे. येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये मदतीची नितांत गरज असलेल्या रुग्णालयांमधील आईसीयू च्या पायाभूत सुविधांना बळ देण्याच्या दिशेने हा उपक्रम म्हणजे एक पाऊल आहे. नांदेडमधील या कार्यक्रमाच्या सोबतच मिशन ICU ने भारतात 100 आईसीयू खाटांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन झलेल्या या कार्यक्रमात, या नवीन उपक्रमाविषयी बोलताना, मिशन आईसीयू चे सह-संस्थापक श्री मनोज शाह म्हणाले, “सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक आईसीयू बेड सुविधांनी सुसज्ज करून COVID पलीकडे टिकणारी शाश्वत प्रभावी व्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या संस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या मजबूत पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसह, मिशन ICU आधीच देशभरात गेल्या ७ महिन्यात १०० आईसीयू बेड स्थापित करण्यात यशस्वी झाले आहे. धुळे आणि इतर तीन जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही यावेळी आमचे कार्य आणखी वाढवत आहोत, जेणेकरून आधीच ताण असलेल्या रुग्णालयांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर होऊ नये.” महाराष्ट्रातील सुमारे 10 जिल्ह्यांमधील वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या स्थितीचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर हे स्थान निवडण्यात आले. सर्व जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती समजून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक/सिव्हिल सर्जन यांना एक योग्य फॉर्म पाठवण्यात आला होता, त्या आधारे नांदेड आणि इतर तीन जिल्हे मदत मिळण्यास सर्वाधिक पात्र असल्याचे आढळले. मिशन आईसीयू धुळे, बुलढाणा, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयांना आणि सांगली उपजिल्हा रुग्णालयाला मदत करेल. उपजिल्हा रुग्णालये त्यांच्या कमी दृश्यमानतेमुळे बाहेरून सहाय्य मिळविण्यात अनेकदा अयशस्वी ठरतात. मिशन आईसीयू या उपक्रमाद्वारे ही दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवते. श्री गुरु गोविंद सिंग जी मेमोरियल जिल्हा रुग्णालय, नांदेड जिल्ह्यातून मिशन आईसीयू द्वारे निवडण्यात आले आहे, त्यांची आईसीयू खाटांची क्षमता 150 इतकी आहे. कोविडच्या काळात, अधिक आईसीयू खाटांची गरज स्पष्टपणे दिसून आली कारण विद्यमान खाटांच्या सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यरत होत्या असे सर्वेक्षणादरम्यान दिसून आले. दुसऱ्या लाटेत नांदेड हे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक होते आणि कोविड-19 संसर्गामुळे अनेक गुंतागुंत असणाऱ्या रुग्णांना हाताळण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव हे मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले.नांदेडमधील आईसीयू च्या पायाभूत सुविधांच्या गरजेविषयी बोलताना श्री गुरु गोविंद सिंग जी मेमोरियल जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर म्हणाले, “आमच्याकडे दररोज अत्यवस्थ रुग्ण येत असतात. त्याना आम्हाला GMC किंवा आईसीयू सेवा उपलब्ध असेल तिथे पाठवावे लागते. आता आमच्याकडेच आईसीयू सुविधा आल्याने आम्हाला सगळ्या रुग्णांना सेवा देता येणार आहे. त्यामुळे रुग्णांचा बहुमूल्य वेळ वाचेल. आणि त्याना आवश्यक असलेले उपचार इथेच त्वरित देता येतील. हे निश्चितच एक स्वागतार्ह पाउल आहे कारण आपल्याला हे माहित आहे की भारतात ग्रामीण भागातल्या किंवा निमशहरी भागातल्या अनेक रुग्णांचा मृत्यू वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे होतो. आता मात्र या आईसीयू सुविधेमुळे आम्ही रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार देऊ शकतो.