Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत “पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण”उपक्रमाचा समारोप संपन्न

पर्यटक मार्गदर्शकांना अधिक सक्षम होण्यासाठी भविष्यात अद्यावत प्रशिक्षण दिले जाईल

अलिबाग, जि.रायगड दि.6- कर्नाळा व फणसाड अभयारण्य येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, पर्यटन मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, या संकल्पनेतून पर्यटक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी या संकल्पनेला यश मिळाल्यास दुसरीकडेही या संकल्पनेची भविष्यात पुनरावृत्ती करता येईल, येथे घडणाऱ्या पर्यटक मार्गदर्शकांना भविष्यात वेळोवेळी अद्यावत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते अधिक सक्षम होतील, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज कर्नाळा अभयारण्य येथे केले.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेराजगार युवक-युवतींना राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या ग्वाल्हेर येथील “आयआयटीटीएम” या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दि. 02 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पर्यटन संचालनालय (DoT) कोकण विभागाचे उपसंचालक श्री. हनुमंत हेडे, उपवनसंरक्षक (वन्यजीव) श्री भानुदास पिंगळे , सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) फणसाड श्री. नंदकिशोर कुप्ते, परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रदीप चव्हाण, पर्यटन संचालनालय (DoT) चे सहाय्यक संचालक (आयटी) व ट्रेनिंग श्री. योगेश निरगुडे, फणसाड अभयारण्य परिक्षेत्र वनाधिकारी श्री. भोसले तसेच कर्नाळा व फणसाड अभयारण्यातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र हे पर्यटनदृष्ट्या संपन्न राज्य आहे. पर्यटनावर आधारित विविध उद्योगधंदे पर्यटनस्थळी व तीर्थक्षेत्र स्थळी विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी “तज्ञ पर्यटक मागर्दशक”(गाईड) हा उत्तम पर्याय विकसित होत आहे. स्थानिक पातळीवरील मार्गदर्शन विषयक ज्ञान, कौशल्य आत्मसात करुन त्याच्या सहाय्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यासाठीचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटन विभाग स्थानिकांना देत आहे.
रायगड जिल्ह्याचे नाव कसे वाढविता येईल तसेच या जिल्ह्याची ख्याती सर्वदूर नेण्यासाठी गाईड हाच माध्यम असल्याचे नमूद करून पालकमंत्री कु.तटकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
“स्थानिक तरुण-तरुणींनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद द्यावा व पर्यटक मार्गदर्शक (गाईड)चे कौशल्य आत्मसात करावे, पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळील 20 तर फणसाड अभयारण्याजवळील एकूण 10 अशा एकूण 30 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला होता. यात 4 मुलींनीही सहभाग नोंदविला होता. यावेळी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला या उपक्रमातील सहभागाबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य या ठिकाणी पर्यटक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी यांची कायम पसंती असते. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, अभ्यास दौरे या दोन्ही पर्यटनस्थळी होत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, पर्यटन मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, अशी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना. कु.आदिती तटकरे यांची संकल्पना आहे. त्यानुसार भारत सरकारचा ऑनलाईन “पर्यटन सुलभ मार्गदर्शक” हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी अधिकृतरित्या महाराष्ट्र शासनाने प्रमाणित करून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण वर्ग पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी संचालक, डॉ.धनंजय सावळकर, पर्यटन संचालनालय (DoT) यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून या प्रशिक्षणाचा कसा लाभ झाला तसेच पुढे काय साध्य करता येईल यावर भाष्य करून पालकमंत्री महोदयांचे आभार मानले.
उपवनसंरक्षक श्री. पिंगळे यांनी पुढील वाटचालीसाठी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले कौशल्य कसे विकसित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
“पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण”याबाबत थोडक्यात माहिती :-
सलग 5 दिवस झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात “पर्यटनाचे सर्वसाधारण पैलू” व “प्रात्यक्षिक” अशा दोन विभागातील अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. ज्यामध्ये पर्यटनाची थोडक्यात ओळख, पर्यटन प्रशिक्षणाची पायाभूत माहिती, या पर्यटन प्रशिक्षणातील करिअरच्या संधी व या उद्योगातील महत्त्व, व्यावसायिक आव्हाने, जबाबदारी, उत्तम प्रशिक्षण कसे बनाल, पर्यटनाचे विविध पैलू, जैवविविधता, वन्यजीव, संवाद कौशल्ये, पर्यटकांचे स्वागत, प्रथमोपचाराची साधने, पथ-प्रात्यक्षिक, पर्यटकांच्या आवडीनुसार अवांतर चर्चा, समालोचनाचे तंत्र, व्यक्तिमत्व विकास, कर्नाळा किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट व प्रात्यक्षिक अभ्यास आदीबाबत तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
रायगड जिल्ह्यास लाभलेले वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ जास्त आहे. फणसाड व कर्नाळा पक्षी अभयारण्य इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक युवक-युवतींसाठी “पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण” ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु तरुण-तरुणींना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन “टुरिस्ट गाईड” म्हणजेच “पर्यटन मार्गदर्शक” म्हणून घडविले जात आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close