:जगभरातले मायमराठीचे रसिक मराठी भाषा दिन जगभरात उत्साहात साजरा करत आहेत. समाजमाध्यमांवरही याचे प्रतिबिंब उमटते आहे. ‘कू’मराठी वरही राजकारणी, साहित्यिक, कलावंत आणि जनसामान्य मराठीविषयीची आपली कृतज्ञता भरभरून व्यक्त करत आहेत.
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मायक्रो-ब्लॉगिंग अॅप ‘कू’वरही यानिमित्ताने #उत्सवमराठी भाषेचा हा हॅशटॅग चालवला गेला. मराठीजन आज मराठीवरच्या प्रेमाची, अभिमानाची गोष्ट सांगत आहेत. विविध विचार, मतं यांसह कविता, चारोळ्या आणि चित्रांमधूनही ‘कू’ युजर्स हे प्रयोगशीलपणे करत आहेत.
‘कू’ मराठीसह दहा भारतीय भाषांमध्ये लोकप्रिय असलेले अॅप आहे. मराठीसह प्रादेशिक भाषांमध्ये लोकांनी प्रभावीपणे व्यक्त व्हावे हा या मंचाचा हेतू आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, उद्योग, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील नामवंत मराठी भाषिक लोक ‘कू’वर मोकळेपणाने आपली मतं मांडत असतात.
अभिनेत्री सुझान बर्नेट हिने मराठी दिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. सदिच्छांच्या शब्दांसह आपल्या नऊवारीतल्या सुंदर छायाचित्रासह ती ‘कू’वर राजभाषा दिन साजरा करते आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करत त्यांच्या कवितेच्या ओळींसह एक खास व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात लहान मुले गोड आवाजात मराठी कविता म्हणत आहेत.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही मराठी भाषा दिनाच्या सदिच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत कवी नाटककार व लेखक कविवर्य वि. वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सुरेख शब्दांत मातृभाषेची महती सांगितली आहे. ‘भाषेला केवळ संवादमूल्य नाही. ती आपल्या वैचारिकतेचीही जननी आहे. जे संस्कार आई करते तेच संस्कार मातृभाषेतूनही होतात.’ या शब्दात त्यांनी मायमराठीला अभिवादन केले आहे.