Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पत्रकारांनी गुणवत्ता विकसित करण्यावर भर द्यावा : वसंत मुंडे

डॉ.प्रभू गोरे यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता तर धनंजय लांबे यांना सुधाकर डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार प्रदान

औरंगाबाद – पत्रकारिता हे जनसेवेचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. हे कार्य निभावताना पत्रकारांकडे अभ्यास व गुणवत्ता असायला हवी. पावलोपावली पत्रकारांनी आपली गुणवत्ता विकसित करणार्‍यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने देण्यात आलेल्या डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता व सुधारकर डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार प्रदान सोहळयात वसंत मुंडे बोलत होते. या प्रसंगी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागचे मा.विभागप्रमुख प्रा.सुरेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात सोमवारी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मराठवाडयातील पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता तर दै.पुढारीचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांना सुधारकर डोईफोडे प्रेरणादायी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कृष्णूरसारखा मोठा धान्य घोटाळा उघडकीस आणून भ्रष्टाचाराविरूद्ध सतत लढा उभारणारे नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान यांचा समीक्षा कर्तृत्व सन्मान देऊन गौरव करण्यात आला. स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार दै.सत्यप्रभाचे गोपाळ देशपांडे, लातूरच्या युवा छत्रपतीचे संपादक वैजनाथ देशमुख यांना स्व.अनिल कोकीळ सामाजीक पत्रकारिता पुरस्कार, ग्रामीण भागात लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे कंधारचे दिगंबर गायकवाड यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रासहीत राजकारणात सक्रिय झालेले नगरसेवक तथा संपादक मुन्तजीबोद्दीन मुनीरोद्दीन यांना स्व.मिर्झा अहेमद अली बेग चुखताई पत्रकारिता पुरस्कार, सातत्याने  भ्रष्टाचारावर प्रहार करणारे दै.आनंदनगरीचे बजरंग शुक्ला यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार शहरातून चंद्रकांत घाटोळ, ग्रामीण भागातून माहूरचे तुळशीराम ठाकरे, मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार शकिलउर रहेमान, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ दै.एकजुटचे सुनिल मुळे, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक राज आडसकर, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर सिडकोचे सारंग नेरलकर, स्व.माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार नांदेड टुडेचे नईम खान तर स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार सुनिल शिंदे यांना यावेळी प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलतांना गणेश रामदासी म्हणाले की, पत्रकारिता हे एक तप आहे. हे तप निभावताना प्रचंड मेहनतीची व अभ्यासाची गरज असते. संस्कार व संयम असेल तर पत्रकारितेचे तप निभावून नेता येते. सध्या मुशीतून तयार झालेले पत्रकार दुर्मिळ होत आहेत, अशी खंत व्यक्त करून रामदासी म्हणाले की, आपण आज खरोखरच पत्रकार आहोत का? हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. सध्याची स्वयंभू पत्रकारिता हिस्त्र होत आहे. बातमीला दुसरीही बाजू असते हे लक्षात न घेता पत्रकारिता केली जात आहे. आज स्व.सुधाकर डोईफोडें सारख्या व्यापक दृष्टीकोन असणार्‍या पत्रकारांची समाजाला गरज आहे, असे स्पष्ट करून नांदेडच्या पत्रकारांनी 12 वर्षांपासून सुरू केलेल्या विधायक उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

माझ्या शिष्योत्तमांचा सन्मान हा आनंद सोहळाच – प्रा.सुरेश पुरी
मराठवाडयाचे माहिती संचालक गणेश रामदासी, पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे हे माझे शिष्योत्तम आहेत. या सर्वांची समाधानकारक वाटचाल माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. या माझ्या शिष्योत्तमाचा आज सन्मान होतो आहे, हा माझ्यासाठी एक आनंद सोहळाच आहे. 1982-2010 या काळात मला अनेक शिष्य मिळाले. त्यात लांबे, मुंडे, गोरे, रामदासी यांचे स्थान आज ठळक स्वरूपात समोर येत आहे, याचा आनंद वाटतो. डॉ.प्रभू गोरे यांच्यात कार्यकर्ता दडला आहे. आता त्यांची जबाबदारी वाढू लागली आहे, असे प्रा.पुरी सरांनी नमूद केले.
या पुरस्कार सोळयाचे मुख्य आयोजक व दै.समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांनी प्रास्ताविक केले. मागील 12 वर्षापासून आम्ही पत्रकार सन्मानाचा उपक्रम राबवतो आहे. आम्ही एक तप पूर्ण केले आहे, असे पाडमुख यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्‍वर खंदारे, जगन्नाथ सुपेकर, रमेश जाबा, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, छबुराव ताके, अभय विखणकर, प्रशांत सूर्यतळे, किशोर दहिवडे, माजेद खान, सागर भोसले आदींची उपस्थिती होती


वैर विसरून वार करण्याची लांबे सरांची शैली लक्षणीय – वसंत मुंडे

या पुरस्कार वितरण सोहळयात उपस्थितांशी संवाद साधताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, मी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आणि त्याचबरोबर कोरोनाचे संकट समोर आले. या काळात अनेक समस्या असतानाही पत्रकारांचे संघटन मजबूत व्हावे यासाठी अनेकांशी संवाद साधला. अनेकांना सोबत घेतले. संकटकाळात पत्रकारांना कशी मदत देता येईल, यासाठी प्रयत्न करतानाच सामाजिक उपक्रमही राबविले. औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांच्यामुळे विभागीय कार्यालयास चांगला आकार आलेला आहे. या विभागीय कार्यालयामुळे पत्रकारांसाठी व्यासपीठ उभे करणे शक्य झाले. या वाटचालीत पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांचेही सहकार्य व मार्गदर्शन लाभले. मी लांबे सरांच्या लिखाणाचा चाहता आहे वैर विसरून वार करण्याची लांबे सरांची शैली लक्षणीय मानायला हवी. यावेळी मुंडे यांनी ‘महाराष्ट्र काल आज उद्या’ या साप्ताहिकातून आपली जडणघडण झाल्याचे नमूद केले. एक चांगले अधिकारी म्हणून मुंडे यांनी विभागीय माहिती संचालक गणेश रामदासी यांच्या वाटचालीचा गौरव केला.
पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर सत्कारला उत्तर देताना पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांनी सांगितले की, स्व.सुधाकराव डोईफोडे यांच्य नावाने मला पुरस्कार दिला गेला हे वास्तव माझा सन्मान वाढविणारे आहे. प्रा.सुरेश पुरी यांनी आम्हाला लिहिते केले. सुरूवातीला आम्हाला काहीच कळत नव्हते, पण पुरी सरांनी केलेल्या संस्कारांमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहचलो आहोत. त्या संस्कारामुळेच आमच्यात चिकित्सक वृत्ती निर्माण झाली. तिचा आज पत्रकारितेत चांगलाच फायदा होत आहे. डॉ.प्रभू गोरे हेही कुशल संंघटक आहेत, असे लांबे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.


.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close