Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी महाआघाडी सरकार काहीच करत नाही !


आ.विनाय मेटे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात आरोप


औरंगाबाद / प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने झाली, मोर्चे, मूक मोर्चे झाले. अनेक तरूणांनी आत्महत्याही केल्या, तरीही सध्याचे महाविकास आघाडी सरकार आरक्षणासाठी काहीच करायला तयार नाही. हे सरकार काही तरी केल्यासारखे दाखवते, पण प्रत्यक्षात ते काहीच करत नाही, अशी घणाघाती टिका आ.विनायकराव मेटे यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना केली.


वार्तालाप कार्यक्रमाच्या प्रारंभी कोषाध्यक्ष मुकेश  मुंदडा , सरचिटणीस  नारायण जाधव पाटील यांनी आ.मेटे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वार्तालाप कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना आ.मेटे पुढे  म्हणाले की, विद्यमान महाविकास आघाडी सरकार हे पापी सरकार आहे. या सरकारला मराठा समाजाची व्यथा काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छाशक्तीच नाही. मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे, ही समाजाची भावना आहे, पण ही भावना सरकारच्या नाकर्तेपणामुळे पायदळी तुडविली जात आहे, असा आरोप आ.मेटे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. वास्तविक ही स्थगिती देखील या सरकारच्याच निष्क्रियतेचा परिणाम आहे. ही स्थगिती सरकारनेच ओढवून घेतलेली नामुष्की आहे. नोकर भरती संदर्भातील जी.आर .विरोधकांकडे उपलब्ध असतो, पण तो सरकारच्या वकीलांकडे उपलब्ध नसावा ही वस्तुस्थितीच सरकारची अनास्था दाखविणारी आहे, असे मेटे यांनी स्पष्ट केले. विजय वेडेट्टीवार हे ज्येष्ठ मंत्री आहेत, पण ते नको ते बोलत असल्याने सामाजिक दरी निर्माण होण्याचे प्रसंग ओढवतात. ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या मंडळींना मराठा आरक्षण अबाधित राहण्याविषयी काहीच सोयरसूतक नसल्याची टीका आ.मेटे यांनी केली.
मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख या नेत्यांची भूमिका प्रांजळ व सकारात्मक असल्याचा उल्लेखही आ.मेटे यांनी केला. सध्याच्या सरकारमधील मराठा आमदार व मंत्री यांच्यात आरक्षणाबाबतची इच्छाशक्तीच उरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वत: मराठा आरक्षणाबाबत मोठया प्रमाणात पाठपुरावा केलेला आहे. मी 1995-1996 साली प्रथम आमदार झालो तेव्हा विधीमंडळात जेव्हा आरक्षणाचा विषय उपस्थित करत होतो, तेव्हा आमदार बाहेर निघून जायचे, एवढी आरक्षणाबाबतची मराठा नेत्यांची अनास्था मी अनुभवलेली आहे. मी सातत्याने मोर्चे, मेळावे, परिषदा आयोजित केल्या. 18 मार्चच्या सुनावणीच्या वेळी आरक्षण प्रश्‍नी सकारात्मक परिणाम हाती यावा, अशी अपेक्षा असून याच पार्श्‍वभूमीवर आपण 7 फेब्रुवारीपासून एल्गार मेळावे आयोजित करणार आहोत. अशोक चव्हाण, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, शरद पवार या नेत्यांच्या विरोधात एल्गार मेळावे घेणार असल्याचे आ.मेटे यांनी सांगितले. मला संघर्षाचा मोठा अनुभव आहे. एकेकाळी शिवाजी पार्कवरचे पूर्ण मैदान मी आरक्षण प्रश्‍नी भरविले होते. त्यामुळेच आमचे आताचे एल्गार मेळावे लक्षवेधी ठरतील, असे मेटे यांनी स्पष्ट केले. आम्ही आरक्षणप्रश्‍नी व्यवहार्य भूमिकाच प्रत्येक वेळी घेतलेली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले. आम्ही महाविकास आघाडीवरचा दबाव वाढवत आहोत, असे मेटे यांनी सांगितले.
यावेळी डॉ.प्रभू गोरे, विलास शिंगी, बाजीराव सोनवणे, शेख शाफिक, शेख अमजद, सचिन फुके, नारायण जाधव पाटील, शेख अफसर, गणेश पवार, जगन्नाथ सुपेकर, रमेश जाबा, छबुराव ताके, एच.आर.लहाने, अभय विखणकार, जॉन भालेराव, मनोज पाटणी, दिपक म्हस्के पाटील, किशोर दहिवाडे, गणेश जाधव, मानसी शिंदे, दुर्गा खरात आदींसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित  होते.

कष्टाची कामे केली ! रात्रीच्या कॉलेजात शिकलो !
वार्तालाप कार्यक्रमा दरम्यान आ.मेटे यांनी आपल्या जीवनातील बिकट अनुभवांना उजाळा दिला, ते म्हणाले की, दुष्काळात आमचे हाल झाले. मी माझ्या गावात शिक्षण घेऊ शकत नाही, हे माझ्या मुंबईतील मामांच्या लक्षात आले. त्यांनी मला शिक्षणासाठी मुंबईत येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी मुंबईला गेलो. तेथे मी दिवसभर कष्टाची कामे केली. भाजी विकणे, हमाली करणे, हेल्पर म्हणून काम करण्याचा माझा अनुभव मला उभारी देणारा होता. दिवसा काम करणे व रात्री शिक्षण घेणे हा माझा अनुभव आज मला इथपर्यंत घेऊन आला आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष स्व.अण्णासाहेब पाटील यांचा सहवास मला प्रेरणादायी ठरला. त्यातून मला समाजकारण करण्याची दिशा मिळाली. सामान्य लोक समाजकार्य करणारांचीच आठवण ठेवतात, मंत्र्यांची नव्हे. असे मेटे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close