‘इंटर्न’ डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन द्या:आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

प्रसिध्दीसाठी
औरंगाबाद– कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन द्यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.20) निवेदनाव्दारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असताना देखील औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड रूग्णांची सेवा करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी तर आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. मात्र असे असताना देखील सद्यस्थितीत औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणार्या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना केवळ 11,000 रू. विद्यावेतन दिल्या जात आहे. जे की खूप कमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आख्यारित येणार्या आंतरवासित (इंटर्न) डॉक्टरांना 11,000 रू. विद्यावेतन व 39,000 रू. कोविड भत्ता असे एकूण दरमहा 50,000 रू., तर पुण्यातील बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना 11,000 रू. विद्यावेतन व 19,000 रू. कोविड भत्ता असे एकूण दरमहा 30,000 रू. मानधन देण्यात येत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आम्हाला देखील त्याच प्रमाणे कोविड भत्ता देण्यात यावा अशी मागणी औरंगाबादसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी केली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठातांनी तसा प्रस्ताव देखील 15 जानेवारी 2020 रोजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे पाठवला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात काम करणार्या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांचे मनोधर्ये वाढवण्यासाठी त्यांना देखील 1 जून 2020 पासून प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन देण्यात यावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
सोबत- आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत