Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

सावधान…कोरोना: नका राहू गाफील कोरोना विषाणू उपाययोजना व घ्यावयाची काळजी

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या जाहीर

 

सद्यस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. सार्वजनिक ठिकाणे, पर्यटनस्थळी गर्दी वाढू लागली आहे. रस्त्यांवरही नागरिक आणि वाहतुकीची वर्दळ वाढत आहे. मात्र दुर्दैवाने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतराबाबतचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक बाबींमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाकडून काही नियमांमध्ये शिथिलता आणल्याने नागरिक मोठया संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन तसेच मास्कचा वापर होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात येऊन याबाबत तातडीने करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुषंगाने शासनाने कोरोना विषयक दिलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी करावयाच्या उपाय योजना व घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना खालीलप्रमाणे निर्देश तर दिले आहेतच. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणांनी काळजी घेण्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे जनतेनेही काटेकोरपणे पालन करण्याचेही आवाहन केले आहे.
पाहूया आणि समजून घेवूया काय निर्देश दिले आहेत जिल्हा प्रशासनाने……

१.सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात यावा.
तसेच नागरिकांनी मास्क न वापरल्यास किंवा आरोग्य नियमांचे पालन न केल्यास संबंधिताविरुध्द नियमानुसार आवश्यक ती दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.
२.सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणान्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादीकरिता केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल तसेच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत परवानगी घेणे आवश्यक आहे.
३.लग्न समारंभात जास्तीत जास्त ५० लोकांना मास्क वापर सक्तीचा करुन परवानगी देण्यात यावी तसेच त्या ठिकाणी हात धुण्यासाठी साबण/सॅनिटायझर इ.साधने उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात यावी. त्या ठिकाणी मर्यादापेक्षा जास्त लोक आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. पुन्हा त्याच मंगल कार्यालयात ५० पेक्षा जास्त लोक आढळल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
४.सामाजिक अंतर (social distance) ठेवणे, मास्कचा वापर करणे व नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुणेबाबत नागरिकांना वारंवार प्रोत्साहित करावे.
५.शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा-नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. याबाबत जनजागृती करावी.
६.रेस्टॉरेंटबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे ( SOP) तंतोतत पालन होते किंवा कसे याबाबत तपासणी करावी व या बाबींचे पालन होत नसल्यास संबंधित यंत्रणांनी पथके तयार करुन या पथकांनी अचानक भेटी देऊन दंडात्मक कार्यवाही करावी. पुन्हा असे निदर्शनास आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करावेत.
७.हॉटेल/पानटपरी/चहाची टपरी/चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासन यांनी नियंत्रण ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लघंन केले असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यावसायिक/दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी.
८.हॉटेलमध्ये तसेच दुकानाबाहेरील आवारात गर्दी होणार नाही याबाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत.
९.खाजगी आस्थापना/दुकाने या ठिकाणी मास्क घालून/फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. याबाबत दर्शनी भागात बॅनर/फलक लावणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आल्यास स्थानिक प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.
१०.रायगड जिल्हयातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक प्रशासन (महानगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत/ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेऊन व आवश्यक पथकाचे गठण करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांच्या स्तरावरुन करुन गर्दीस प्रतिबंध करण्यात यावा.
११.सर्दी, खोकला, ताप तसेच कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ RTPCR तपासणी करण्यात यावी.
१२.ज्या रुग्णालयात अथवा लॅबमध्ये सीटी स्कॅन करण्यात येते त्यांनी कोरोनासदृश्य रुग्णांचा अहवाल तात्काळ वैदयकीय अधीक्षक/प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी सादर करावा
१३.सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इ. लक्षणांसह खाजगी डॉक्टरांकडे रुग्ण आढळल्यास त्यांनी तात्काळ अशा रुग्णांची RTPCR करावी व शासकीय यंत्रणांना कळवावे. जेणेकरुन Contact Tracing करता येईल, १४.कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीत कमी २० लोकांचे तात्काळ contact tracing करण्यात यावे. contact tracing बाबत हलगर्जीपणा करण्यात येवू नये. १५.कोविड केअर सेंटर (CCC) केव्हाही कार्यान्वित करण्याची संपूर्ण तयारी ठेवावी.
१६.सार्वजनिक ठिकाणे (उदा. बस स्टॉप, शौचालये, पर्यटन स्थळे इ.) निर्जंतुकीकरणासाठी स्थानिक प्रशासनाने फवारणी तात्काळ सुरु करावी.
१७.अंत्यविधीच्या वेळीही स्मशानात मास्कचा वापर अनिवार्य करावा.
१८.वयोवृध्दांनी गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. १९.यापूर्वी कोविड-१९ चा प्रादूर्भाव/ फैलाव होऊ नये याकरिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
वर नमूद केलेल्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी व आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेशही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासकीय यंत्रणांना दिले असून नागरिकांनी शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही केले आहे.
“माझे कुटुंब…माझी जबाबदारी”
“आपला समाज…आपली जबाबदारी”

आपले व आपल्या कुटुंबाचे, एकूण समाजाचे कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण करणे,हे आपले कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे चला तर मग… शासन देत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे, समाजाचे या आपत्तीपासून रक्षण करूया….सोशल डिस्टंसिंगचे पालन,मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा नियमितपणे अवलंब करूया…! काळजी करीत बसू नका… तर काळजी घ्या…!

मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close