गावाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करावा :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व स्टरलाईट टेक फाऊंडेशन कार्यशाळा
औरंगाबाद: शेतकऱ्याच्या मालाला उत्तम बाजारपेठ, विहिरीला वीजपुरवठा, महिलांना मृदा व जलसंधारण आधारित रोजगाराच्या संधी, युवकांमध्ये कौशल्य विकास करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. या माध्यमातून शेतकरी, महिला, बेरोजगारांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. एखाद्या गावातील पिकानुसार त्या गावाची ओळख निर्माण व्हावी, सर्वांगीण विकासाचा गाव विकास आराखड्यात अंतर्भाव असावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व स्टरलाईट टेक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद येथील पेस प्रशिक्षण केंद्रात तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळा पार पडली. या प्रशिक्षणाचा समारोप जिल्हाधिकारी सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधताना श्री. चौधरी बोलत होते. प्रशिक्षणासाठी एकूण ४१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यामध्ये गावातील अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, रोजगार सेवक आणि जलदूत यांचा समावेश होता.
प्रशिक्षणासाठी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रशिक्षणार्थीना जल संधारण, मृदा संधारण, झाडांचे आरोग्य, मृदा आरोग्य, जमिनीतील पाणी साठ्याचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, पाण्याचा योग्य वापर, पिकांची निवड, हर घर नल से जल ‘जल जीवन मिशन’, सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शोषखड्डे निर्मिती, सांडपाण्याचा परसबागेसाठी वापर, प्रत्येक घरी परसबाग निर्माण करण्यावर मार्गदर्शन केले. तसेच अभियानाचे अभियान व्यवस्थापक दिलीपसिंग बयास यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक प्रवीण पिंजरकर यांनी अभियानांतर्गत कामे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणात विविध विभागातून आलेल्या विभाग प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना योजनांविषयी माहिती दिली.
प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती संगीतादेवी पाटील यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील ७३ गावांमध्ये विविध विकास कामे सुरू असून या प्रशिक्षणातून आपापल्या गावांमध्ये पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. दुपारच्या सत्रात विभागीय उपायुक्त (विकास) अविनाश गोटे, सहायक आयुक्त श्रीमती. विना सुपेकर यांनी आरोग्य आणि पाणी मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी थांबवून भूजल पातळीमध्ये वाढ होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वृक्ष लागवडीवर भर देण्याचे आवाहन केले. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम.घुगे यांनी “जल जीवन मिशन” बद्दल मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात माहिती व शिक्षण व संवाद तज्ज्ञ सतीश औरंगाबादकर यांनी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिल्पा चौधरी यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेबद्दल मार्गदर्शन केले. रोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शांता सुरेवाडकर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबद्दल मार्गदर्शन केले. विशाल आगलावे (प्रकल्प विशेषतज्ञ) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना, डॉ. के. सत्यपाल यांनी झाडे जगविण्यासाठी आणि झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती सांगितली. शेवटच्या सत्रात लघु पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता श्री.चौधरी यांनी कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, गॅबियन बंधारे, सिमेंट बंधारे याविषयी माहिती दिली. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कनिष्ठ भूवैज्ञानिक एस.जी.बैनाडे यांनी पाण्याचे महत्व स्पष्ट करून जलचक्र याबद्दल माहिती दिली. भूजलाचा जास्त प्रमाणात होत असलेला उपसा यावर मर्यादा लावून भूजल पातळी वाढविण्यासाठी शोषखड्ड्याचे महत्व पटवून सांगून शोषखड्डे करण्यावर भर द्यावा याविषयी माहिती दिली. जिल्हा अभियान व्यवस्थापक सुचिता खोतकर यांनी उमेद अभियानाची ओळख करून दिली. दुपारच्या सत्रात आत्माचे फुलंब्री तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मकरंद नलावरे यांनी आत्मा विभागामार्फत शेतकरी गट नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या पूर्ततेविषयी माहिती दिली. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या MAHADBT पोर्टलवर सुरु असणाऱ्या कृषी योजनांची माहिती दिली.