Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम सेवा द्यावी :पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग, जि.रायगड: म्हसळा शहरात पंचायत समितीची सुसज्ज अशी नवीन प्रशासकीय इमारत परिपूर्ण साकारण्यात आली असून या इमारतीच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम सेवा द्यावी, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
म्हसळा पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे व उद्घाटक म्हणून राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती गिता जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, नगराध्यक्षा श्रीमती जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष सुहेब सलमा हळदे, रायगड जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धनश्री पाटील, पंचायत समिती म्हसळा सभापती श्रीमती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, पंचायत समिती सदस्य संदिप चाचले, सदस्या श्रीमती छाया म्हात्रे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत अद्ययावत झाल्यामुळे जनतेला याचा मोठा लाभ होणार आहे. एकाच कार्यालयातून जनतेच्या अडीअडचणी सोडविणे अपेक्षित असून तसाच प्रयत्न असावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी जनेतेचे आशिर्वाद महत्वाचे असतात. येथील नळ पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल. जलमिशन कार्यक्रमांतर्गत विविध पाणी पुरवठा योजना मार्गी लावल्या जातील. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करता आल्या, यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानते. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमधील नळ पाणीपुरवठा योजना जलदगतीने सुरु होण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वांचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना सुधारित दराने नुकसान भरपाई देण्यात आली. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही मोहीमही उत्तमरित्या राबविली. जिल्हा ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय एकाच ठिकाणी कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे ग्रामीण जनतेची कामे सुरळीत होतील.
खासदार सुनिल तटकरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोविड कालावधीत सर्वच यंत्रणांनी अतुलनीय असे काम केले. बॅ.अंतुले यांचे या जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे या इमारतीला बॅ.अंतुले प्रशासकीय भवन असे नाव द्यावे. रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी भरीव निधीस मंजूरी दिली, यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानतो. सामंजस्याने काम केल्यास विकासकामांना गती मिळते. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्र काम केल्यास जनतेच्या अडीअडचणी वेगाने सोडविता येतील.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या प्रशासकीय इमारतीला बॅ.अंतुले प्रशासकीय भवन नाव देण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावा, त्याला तात्काळ मंजूरी मिळेल. करोनाबाबत अजूनही खबरदारी घ्यावी. जुन्या असलेल्या ॲम्ब्युलन्स निर्लेखित करुन ग्रामविकास विभागामार्फत 10 ते 20 ॲम्ब्युलन्स रायगडसाठी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकासांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचे प्रस्ताव त्वरित पाठवावेत, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, पंचायत समिती कार्यालय अद्यायावत करण्यासाठी जी काही मदत लागेल ती देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकही गाव सोयी-सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामविकास विभाग पूर्ण सहकार्य करेल. कोविड काळात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी राहावी, म्हणून शासनाने विशेष लक्ष दिले. सामान्य नागरिकांशी संबंधित असलेल्या महसूल, आरोग्य, कामगार, ग्रामविकास अशा विविध विभागांच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा शाळेतील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सभापती श्रीमती उज्ज्वला सावंत यांनी केले. तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन निंबाजी गिते यांनी केले. .
कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच म्हसळा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close