माझ्यावरचे बलात्काराचे आरोप खोटे; धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे.कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.