Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देवू: उपमुख्यमंत्री अजित पवार


अलिबाग,जि.रायगड, :- गेल्या वर्षीचे “निसर्ग” आणि यावर्षीचे “तौक्ते” चक्रीवादळ या दोन्ही चक्रीवादळानी कोकणातील शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे  अतोनात नुकसान केले. मात्र हे महा विकास आघाडीचे शासन सदैव कोकणातील जनतेच्या सोबत आहे. कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांनी आज श्रीवर्धन येथे केले.     उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या हस्ते आज (दि.4जून) रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकात  श्रीवर्धन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाचे तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या  सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. त्यानंतर येथील र.ना.राऊत हायस्कूलच्या प्रांगणातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे तरपालकमंत्री कु.आदिती तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.         या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, श्रीवर्धन नगर परिषद नगराध्यक्ष फैसल मियाजान हुर्जुक,  उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, मुख्याधिकारी किरण मोरे, पाणीपुरवठा जलनि:सारण व अपंग कल्याण समिती सभापती किरण केळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.दिशा नागवेकर, क्रीडा व युवक कल्याण समिती सभापती सौ.रहमत आराई,स्वच्छता वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सौ.गुलाब मांडवकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती वसंत यादव, नगरसेवक, नगरसेविका सर्वश्री जितेंद्र सातनाक, श्रीमती सीमा गोरनाक, श्रीमती कामिनी रघुवीर, शबिस्ता सरखोत, अनंत गुरव, प्रितम श्रीवर्धनकर, श्रीमती अंतिम पडवळ, श्रीमती प्रतिक्षा माळी, श्रीमती मीना वेश्विकर, स्वीकृत नगरसेवक अब्दुल कादिर काशीम राऊत, सुनिल पवार, गटनेता बबन चाचले, दर्शन विचारे आदि उपस्थित होते.       उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, केंद्राच्या तुलनेत राज्याने चक्रीवादळग्रस्तांना अधिक पटीने मदत केली. सध्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव असल्याने सर्वांनी कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे तितकेच महत्वाचे आहे. परिस्थिती निश्चितच आव्हानात्मक आहे.मात्र संकटांना न भिता त्यावर मात करणे महत्वाचे आहे. आपण भूकंप, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बॉम्बस्फोट, चक्रीवादळे अशी अनेक संकटे पाहिली व यावर मात करुन आपण पुन्हा उभे राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.नानासाहेब धर्माधिकारी, सी.डी.देशमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांची  सुवर्णतुला आजच्याच दिवशी म्हणजेच दि.4 जून 1674 रोजी झाली होती. हा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांना व मावळयांना वंदन करून महाराष्ट्राची वाटचालही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू राहील.      संपूर्ण कोकण परिसराचा कॅलिफोर्निया करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यादृष्टीने कोकण रेल्वे, मुंबई-गोवा हायवेचे काम, सागरी महामार्ग, आयकॉनिक पूल या काही महत्त्वाच्या बाबी आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज 0% व्याजाने  हा शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेला महत्वाचा निर्णय आहे.  श्रीवर्धनच्या 16  ते 18 हजार लोकांसाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी या पाणी पुरवठा योजनेसाठी रु.23.13 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या जिल्ह्याला निर्सगाने खूप काही दिलेले आहे. त्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटन हा महत्वाचा पर्याय आहे. येथे येणाऱ्या लोकांना, पर्यटकांना सांभाळले पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे, त्यांना चित्रीकरण वा अन्य बाबीसाठी आवश्यक परवानगी देणे, अशी सर्वप्रकारे मदत करायला हवी. या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक दिली जावी. ही फक्त शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून येथील स्थानिकांची देखील मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.    श्री.पवार पुढे म्हणाले की, काळाची गरज पाहता सर्वांनी वृक्षलागवड करणे, वृक्षसंवर्धन करणे, ही आवश्यक बाब बनली आहे. शासन याबाबतीत असा कायदाच करणार आहे. सध्याचे वातावरण पाहता हवामानाला साजेसे अशी  झाडे लावणे गरजेचे झाले आहे.     यावेळी त्यांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचे कौतुक करून ते पुढे म्हणाले की, कामांचा दर्जा चांगला ठेवा, कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको, विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. फळबागांचे झालेल्या नुकसानीसाठी शासन मदत करीलच.गेल्या काही वर्षात कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे. या चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानीची तीव्रता कमी करण्यासाठी किनारपट्ट्यांवरील जिल्ह्यात आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात यावीत, ही बहुउद्देशीय निवारा केंद्रे दर्जेदार आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सक्षम असावीत. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधी व्यतिरिक्त इतर वेळी या निवारा केंद्रांचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी करण्यात यावा. याची कायमस्वरुपी देखभाल, दुरुस्तीचेही नियोजन करण्यात यावे. चक्रीवादळाच्या वेळी निर्माण होणाऱ्या समुद्राच्या मोठ्या लाटांनी जमिनीची धूप होऊ नये, यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत. चक्रीवादळासह इतर नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वीज कोसळून जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आवश्यक अंतरावर लाईटनिंग अरेस्टर उभारण्यात यावेत. ही सर्व कामे दर्जेदार, मजबूत, गुणवत्तापूर्ण असली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.      यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, गेल्या वर्षी श्रीवर्धनला चक्रीवादळाचा खूप मोठा तडाखा बसला होता.  यावेळी आदरणीय शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात व मंत्रिमंडळातील अन्य मंत्री महोदयांनीही तात्काळ रायगड जिल्ह्याचा दौरा करुन येथील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने दिली. यापुढे श्रीवर्धनचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.  श्रीवर्धन पर्यटनदृष्टया अधिक संपन्न करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. समुद्रकिनाऱ्यावर अनेक विकासात्मक कामे होत असून सागरी महामार्गाचे स्वप्नही लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मच्छिमारांसाठी अद्ययावत बंदरे उभी करण्यासाठी प्रयत्नशील असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी महाराष्ट्राचा विकास साधला जाईल. जिल्ह्याच्या विकासात स्व.बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या स्वप्नातील कोकण साकारण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत, असेही ते शेवटी म्हणाले.      यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, मूलभूत प्रश्न सोडवित असताना श्रीवर्धन पर्यटनदृष्टया नावाजण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्रीवर्धन  समुद्रकिनाऱ्यावर करण्यात येणाऱ्या सुशोभिकरणामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे, त्यातून स्थानिक तरुणांसाठीच रोजगार निर्मिती होणार आहे. शेवटी बीचचे सुशोभिकरण झालेल्या कामांचे भविष्यात अजित दादांच्याच हस्ते उद्घाटन करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष फैजल मियाजान हुर्जुक यांनी केले. तर उपस्थितांचे आभार  जितेंद्र सातनाक यांनी मानले.       या कार्यक्रमाला कोविडविषयक सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच श्रीवर्धन येथील नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close