Subscribe to our Newsletter
Loading
यशकथाशेतीविषयक

सातपुड्याच्या डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग


नंदुरबार: आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. इथले हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धिरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे.

धिरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे आणि त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली.

वाचा सविस्तर news आरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…

डाब येथे 2007 पासून स्ट्रॉबेरी लागवड होत आहे. मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीने ही लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेती सहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग करीत आपल्याकडील वडिलोपार्जित जमिनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली.

पूर्वी वडिलांच्या नावावरील 2 एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या 4 एकर जमिनीवर गहू, हरबरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असे. त्या जागी धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरबरा आणि भगर लागवडदेखील केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले.

त्यांनी नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला. शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केला. त्याचा फायदा त्यांना मिळाला.
वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

धिरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. शेतीतील नवे तंत्र आणि सोबतीला असलेली प्रयोगशिलता यामुळे दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात यश मिळविले आहे. आता त्यांना वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचायचे!

धिरसिंग पाडवी, शेतकरी – गतवर्षी 2 लाखाचे उत्पन्न मिळाले, तर यावर्षी 3 लाखापर्यंत उत्पन्न येईल. साधारण 80 ते 120 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळतो आहे. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडीग करून मोठ्या शहरात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शेतीत नवे तंत्र वापरले त्याचा लाभ निश्चित होतो.
अविनाश खैरनार, मंडळ कृषी अधिकारी-अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील 25 शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. साधारण 10 ते 12 हेक्टरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. एक एकरवर 30 क्विंटल होणारे उत्पादन 40 क्विंटलपर्यंत व्हावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Team DGIPR by Team DGIPR , नंदुरबार

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close