Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

कार्टून बघत, मनसोक्त जगून आयआयटीन होता येत अन् ५५ लाखांची नोकरीही मिळते…

कार्टून बघत, मनसोक्त जगून आयआयटीन होता येत अन् ५५ लाखांची नोकरीही मिळते….अवघ्या विशीतला कनिष्क सध्या आयआयटी पवईत सिव्हील ब्रँचमध्ये शिक्षण घेतोय. पण आवड कॉम्प्युटर क्षेत्रात असल्याने कोडिंगचे धडे घेऊन त्याने यात प्रभुत्व मिळवले. नुकतेच त्याला जपानच्या सर्वात मोठ्या व नामांकित ई-कॉमर्स कंपनी राकूतनमध्ये नोकरी मिळाली. वार्षिक निव्वळ वेतन 55 लाख येन (¥) आहे. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच इतके वेतन आणि परदेशवारीची संधी खूप मोजक्यांना मिळते. त्यातलाच एक कनिष्क. त्याचे अभिष्टचिंतन करण्याच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा मारल्या. यात एक पालक म्हणून खूप गोष्टी समजून घेता आल्या. आयआयटीत नंबर लागणे नंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेत सातत्याने सर्वोत्तम परफॉर्मेन्स देणे अन् पहिल्याच प्रयत्नात यशाचा इतका मोठा पल्ला गाठणे सोपे नाही. या गोष्टी साध्य करताना त्याने अनेक गोष्टींचा त्याग केला असेल, संघर्षाच्या अग्निदिव्यातून त्याला जावे लागले असावे अशी माझी धारणा होती. पण आश्चर्य म्हणजे यातली एक गोष्टही त्याने किंवा त्याच्या पालकांनी केली नाही. सुरूवातीपासूनच अमूक एखादी गोष्ट करायची म्हणून त्याच ओझ वाहवत बसण्यापेक्षा जे करायचे ते अगदी आनंदी मनाने आणि पूर्णपणे फोकस्ड राहून करायचे, हे त्याने ठरवले आणि त्याला यश मिळत गेले. विशेष म्हणजे कनिष्कने शालेय, महाविद्यालयीन जीवनात मनसोक्त कार्टून पाहिले, मन वाट्टेल तितका वेळ तो गल्लीतल्या मित्रांसोबत खेळला. त्याला जी गोष्ट आवडली ती त्याने केली. पण सुरूवातीपासूनच एक नियम त्याने स्वत: घालून घेतला होता. तो म्हणजे, खेळ, कार्टून याच्यानंतरचा जो काही चार ते पाच तासांचा वेळ असेल तो क्वॉलिटी टाइम अभ्यासात दिला. एकदा का अभ्यासाला बसला की पूर्ण फोकस त्या गोष्टीकडेच राहायचा. मग तहान, भूक विसरून तो तिकडेच लक्ष केंद्रीत करायचा. दहावी परीक्षेच्या वेळेची आठवण सांगताना त्याची आई म्हणाली की, इंग्रजीचा पेपर असल्याने मला व त्याच्या वडिलांना जाम टेन्शन आलं होतं. पण हा पठ्ठ्या पेपरला जाण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत कार्टून पाहत बसला होता. त्याला अभ्यास कर म्हटलं की तो ‘करतो मी बरोबर तू टेन्शन नको घेऊ…’, असे म्हणाला. ज्या दिवशी रिझल्ट आला तेव्हा मार्कशीटवर इंग्रजी विषयात 90 मार्क दिसले. त्यावर माझा विश्वासच बसेना, हा कुणीतरी दुसरा कनिष्क असेल म्हणून दोन, तिनदा त्याबाबत खात्रीही केली. कनिष्कच्या यशाबद्दल वडिल सुनील म्हणाले की, कनिष्कला बालपणापासूनच मी कुठल्या गोष्टीसाठी अडवले नाही. त्याला त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. एक पालक म्हणून चांगले शिक्षण देण्याचे कर्तव्य आपण पार पाडले. पण काय चांगले आणि काय वाईट याचा निर्णय त्याने घ्यायचा आहे. हेच तत्व आजवर कायम ठेवले आहे. अभ्यासाला बस असे त्याला कधीही म्हटले नाही. किंबहुना शाळेत नववीपर्यंत त्याला वर्गात किती मार्क मिळताहेत तो कितवा आहे, हे जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला नाही. वर्गात त्याचा कधीही रँक आला नाही. वर्गातल्या ३०-४० विद्यार्थ्यांत पुढे राहावा म्हणून धडपड करण्यापेक्षा एक माणूस म्हणून किती यश मिळवतो आणि जगात कसा वावरतो हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुनील पुढे म्हणाले की, मुलांचे बालपण नेहमी नेहमी येत नाही. त्यामुळे त्या वयात त्याला खेळणे व बागडण्याचा पूर्ण अधिकार आहे. शाळा झाली की ट्यूशन यात गुरफटून ठेवण्यात काहीही अर्थ नाही. तो बारावीत असताना शिक्षकांनी त्याला मोबाईलपासून दूर ठेवा असे सांगितले होते. पण त्या क्षणाला सॅमसंग galexy घेऊन दिला. कारण त्या आनंदाला तो मुकू नये असे मला वाटायचे आणि दुसरीकडे तो या गॅझेटमध्ये अडकून पडणार नाही याबद्दल पूर्ण विश्वास होता. आणि तो त्याने सार्थ ठरवला. त्याचे मन आनंदी असेल तर बारा-पंधरा तासांचा अभ्यास तो दोन-पाच तासातच पूर्ण करेल. कनिष्कच्या बाबतीत तर हे खरे ठरले आहे… पोस्टचे तात्पर्य : पालक म्हणून अनेकजणांना मुलांची खूप काळजी वाटते. त्यामुळे सतत आपण पाल्याला फुलाप्रमाणे जपतो. मुलाने एकाच वेळी खेळात प्रावीण्य मिळवावे, अभ्यासात सर्वांच्या पुढे राहावे, संगीत, कलेतही त्याने पारंगत्व मिळवायलाच हवे, असा आपला आग्रह असतो. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आपण मागे हटत नाही. गंमत म्हणजे पालकांचे अपुरे राहिलेले स्वप्नही पाल्यानेच पूर्ण करायचे हवे, असे अनेकांना वाटते आणि मग सुरू होते bloody race. या स्पर्धेत मुलगा जीवन जगणेच विसरून जातो व मुलांचा आनंद कशात आहे हे आपणही कुठतरी विसरून जातो. कनिष्क आणि त्याच्या पालकांना भेटल्यानंतर एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे, मुलांचे मन सदैव आनंदी राहिल यासाठी प्रयत्न करा आणि त्यांना कशातच अडकून न ठेवता मनसोक्त जगू द्या मग स्वत:ची जागा तो स्वत:च निर्माण करेल, एवढे मात्र नक्की….कनिष्कला भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा…

.– नितीन पोटलाशेरू…

https://www.facebook.com/nitin.potlasheru
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close