Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

वाहून गेलेल्या नद्या…

वाहून गेलेल्या नद्या…

एकदा आमच्या बालपणी भयंकर पाऊस पडला होता. आम्ही राहत असलेलो भाड्याचे दोन खोल्यांचे घर रात्रभर अनेक ठिकाणी गळत होते. मग आम्ही अंगाची वळकटी करून कोपरे पकडून झोपी गेलो आणि अण्णा-अक्का रात्रभर गळणाऱ्या पाण्याने भरत राहणारी भांडी रिकामे करत राहिले; पण सकाळी उठलो तेव्हा सगळे कसे निर्मळ दिसत होते.

दारासमोरच्या बाभळी लख्ख होऊन आपल्या काळ्याभोर खोडांसह आपले हिरवेपण मिरवत होत्या. समोरच्या म्हाताऱ्याचे खळे काळे कुळकुळीत दिसत होते. पाठीमागच्या गुलमोहराच्या अनेक फांद्या मोडून पडल्या होत्या. पक्षांची घरटी होत्याची नव्हती झाली होती. गुलमोहरांच्या शेगांचा जणू खच साचला होता. दारासमोरच्या नाल्यातून संथपणे पावसाचे पाणी वाहत होते. हमीद मटन सेंटरसमोर पाण्याचे तळे साचले होते; पण बेडकांचा आवाज मंदावला होता.

लोकांचे जथ्थेचे जथ्थे पूर पाहायला पुलावर जात होते. मग आम्हीपण आमच्या दोस्तांसह पूलाकडे निघालो. खरंच नदी दुथडी भरून दमदारपणे वाहत होती. पाणी एखाद्या चाल करून येणाऱ्या योद्ध्यासारखे भासत होते. चहासारखा दिसणारा पूर, त्यात वाहून येणारी झाडे, लाकडांचे ओंडके दिसत होते. पाण्याचा एखादा लोट अगदी पुलावरून आमच्या तळपायांना स्पर्श करून जात होता. ते दृश्य विलक्षण होते. आपण एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार आहोत याची जाणीव नव्हती; पण तसा पाऊस, तसा पूर, तशी नदी मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो. तसा पूर मला आयुष्यात पुन्हा पाहायला मिळाला नाही; पण तो पूर मनात कायमचा घर करून गेला.

सगळे गावच जणू पुलावर लोटले होते. धोतर सांभाळत, बिड्या फुकत म्हातारे जुन्या गावच्या गोष्टी सांगत होते. गढीला पाणी लागण्याच्या आठवणी ताज्या करत होते. थोराड माणसे तंबाखू चघळत पूर न्याहाळत होते. लोहाराच्या तीन म्हशी कुणास ठाऊक कशा पण पुरात अडकल्या होत्या. लोहार फक्त पुलावरून त्यांना आवाज देऊ शकत होता. त्याची घालमेल समजण्याचे आमचे वय नव्हते. लोहाराचा लेक आणि बायको नदीकाठावरून त्यांना बोलावत होत्या. त्या म्हशींचे नेमके काय झाले, ते आता आठवत नाही, पण तो पूर मनातून जात नाही.

गावच्या नदीने मनात घर केलेले असते आणि मनातल्या घरासमोरून स्मरणांची नदी सदैव वाहत असते. जुनी नदी पुन्हा भेटत नाही आणि नव्या नदीशी मैत्री होतेच असंही नाही. दिवस मागे पडतात आणि आयुष्याची पात्र कोरडीठाक होऊन जातात; पण वाहून गेलेल्या नद्या मनात मात्र भरलेल्याच राहतात.

  • अरुण सीताराम तीनगोटे
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close