Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

गाव : कंटाळ्याला न कंटाळणाऱ्या लोकांची वस्ती

mh20live.com

तिथं एक चौक आहे आणि जवळच एक पाईपची फॅक्टरी. थो‌ड्या अंतरावर एक धाबा. धाब्यासमोर दारूच्या जाहिरातीतला काळ्या सुटमधला शाहरूख खान. त्याच्या आसपास एक मोठच्या मोठ वडाच झाड. त्याच्या सावलीत या वेळी कुणीही नसेल. तू ही नसशील. कदाचित ती सावलीच त्या वडाची नसेल.

चारही बाजूने थोडी थोडी शेती. तुटक तुटक घर. आणि मानवीपणाच्या निर्मनुष्या खुणा. तिथल्या नव्या पाटीवर माझ्या जुनाट गावाचे नाव लिहिलेले असेल. तिथ एक दोन बाभळीची खुरटलेली झाड दिसतील. आणि तिथ एक दोन जुनाट म्हाताऱ्या बसलेल्या असतील. कमरेत वाकलेले म्हातारे बिड‌या फुकत असतील. त्यांच्याजवळ बिड‌यांचा विचित्र वास घुमत असेल. त्यात थोडी धूळ, थोडी माती, थोडा धूर यांचे वास मिसळलेले असतील. अशा वेळी तुझी इच्छा असूनही तू लावलेल्या परफ्युमचा सुगंध तुला जाणवणार नाही.

तिथच एक दोन रिक्षावाले प्रवाशांची वाट बघत असतील. मधूनच त्यांच्यांत एखादा आंबट जोक होईल. आणि ते मोठ्यांने हसतील. एखादा तोंडातली तंबाखू बाहेर फेकून खिशातला बार तोंडात टाकेल. आणि आपल्या लाळग्रंथीला कामाला लावेल. अस तासनतास आठदहा प्रवाशांसाठी थांबण किती कंटाळवाण असेल, याचा तू अंदाज लाव. पण खर तर गाव म्हणजे कंटाळ्याला न कंटाळणाऱ्या लोकांची वस्ती आहे. कुणी मोबाइलवरचा एखादा व्हायरल व्हिडीओ दाखवील. मग सगळे मोबाइलवरच रम्मी खेळायला लागतील.

बसमधून उतरणाऱ्याला ‘कुठ जायचं’ अस विचारल जाईल. एखादा तुम्हाला हाताला धरून अॅपेत बसवील. तुम्ही शहरातून इथपर्यंतचा प्रवास एका तासात कराल. पण इथून सात किलोमीटर आत जाण्यासाठी तासभर बसून राहाल. हे अस वाट पाहण तुझ्यासाठी कठीण असेल. पण गावाने प्रत्येक गोष्टीची किती वाट पाहिली आहे, याची तुला कल्पना आहे का? गावाने रस्त्याची, पाण्याची, आरोग्याची, शिक्षणाची वाट पाहिली आहे. गावाने पावसाची वाट पाहिली आहे. गावाने विहिर भरून जाण्याची वाट पाहिली आहे. गावाने माळराने हिरवी होण्याची वाट पाहिली आहे. गावाने गाव सोडून जाणाऱ्या आणि परतून न येणाऱ्या पाखरांची वाट पाहिली आहे. या प्रतिक्षेला अंत नाहीच.

तिथ एक छोटीशी चहाची टपरी आहे. तू चहा, मिनरल वॉटर, बिस्कीट विकत घेऊ शकशील. तिथ उगाच बसलेली एक दोन माणसे आहेत. तिथ बराच कंटाळा आहे. तिथ बराचसा एकटेपणा, तुटकपणा आणि मुकेपणा आहे. तिथ बरचशी अबोल दु:ख आणि न सांगता येणाऱ्या वेदना आहेत. तिथ एक ‘काय कराव’ हे न कळणारा माणूस आहे. आणि ‘काय करतोय’ हे न समजणारा एक माणूसही तिथच आहे. तिथल्या इवल्याशा जागेत तुझं भ्रमिष्ट वर्तमान आहे. तिथ बाहेर ऊन आहे. कदाचित आतही ऊनच आहे.

मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आहे. पण तरीही सकाळचे अकरा वाजेचे ऊनदेखील तुला नकोसे होईल. टपरीच्या पाठीमागे एका नवख्या चित्रकाराकडून करवून घेतलेली महानुभाव मंदिराची दिशादर्शक पाटी आहे. हा रस्ता तुला श्रीकृष्णाकडे घेऊन जाईल किंवा हा रस्ता तुला गावाकडे घेऊन जाईल किंवा हा रस्ता तुला स्वत:कडे घेऊन जाईल किंवा हा रस्ता तुला कुठेच घेऊन जाणार नाही. तुझ भिरभिरलेपण हा रस्ता थांबवू शकणार नाही. खर तर कोणताच रस्ता तुझी भरकट कमी करू शकणार नाही.

हे सात किलोमीटरच अंतर पार करणे तुला सात जन्माचे दु:ख वाटेल. पण खरी दु:ख वेगळी आहेत, हे तुला गावच्या तळघरात शिरल्याशिवाय कळणार नाही. तू गावाकडे जायला लागशील, तेव्हा कदाचित गावही तुझ्याकडेच येत असेल. तू आणि गाव नदीजवळ एकमेकांना कुठतरी भेटणार. या असह्य ऊन्हात तुझ्या मनातही आठवणी दाटणार. हे धुळभरले, मातकट आणि जुनाट रस्ते तुला काही नव देऊ शकतील अस वाटत नाही. हरघडी बदलणाऱ्या जगात तुझ जुन गाव तुला पुन्हा भेटल असही वाटत नाही. तू लहान असताना दुथडी भरून वाहणारी नदी आता तशी वाहत नाही. तू पोहायला जायचास त्या विहिरीच्या तळाशीही आता पाणी राहत नाही. कोल्हापुरी बंधाऱ्यावर बसून तू लिहिलेल्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या कवितांच्या साक्षीदार बाभळी आता तिथ नसतील. त्यांची पिवळी पाने कोणत्या पावसाने कोणत्या किनाऱ्याला वाहून नेली असतील?

गावाकडे जाणे अनेक अर्थाने स्वत: कडे परतून येण्यासारखे आहे. आणि तू स्वत:ला भेटायला नेहमीच घाबरत आला आहेस. तू मनात गाव घेऊन सगळ्या जगात तुझी निवाऱ्याची जागा शोधत आला आहेस. स्वत:ची माती शोधता शोधता तुझ्याच तुझ्याच जिवाचा चिखल झाला आहे.

तू तुटक मनाने गावात जात आहेस आणि गावही तुटकपणानेच तुझी वाट पाहत आहे.

तुमच्या भेटीला अर्थ प्राप्त होवो.

– अरुण सीताराम तीनगोटे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close