Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

संघर्षाचा प्रेरक योद्धा – साहेब!मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ऐंशीव्या जन्मदिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा विशेष लेख


शरद पवार हे नाव नाही, ती एक कारकीर्द, एक मोहीम, एक वसा आणि माझ्यासारख्या लाखो लोकांसाठीची दिशा आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून लिहिणे हिमालयाच्या संदर्भात अपराध केल्या सारखे आहे. 
पवार साहेबांच्या बारामतीत शेतकऱ्यांकडे मती आहे, गती आहे आणि पवार साहेबांच्या दुरदृष्टीमुळे त्यातून शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे, हे कौतुक कुणी कार्यकर्त्याने नव्हे तर खुद्द पंतप्रधान मोदींनी केलं होतं, ते अनेकांना आठवत असेल. ‘मी बऱ्याचदा शरद पवार साहेबा कडून खूप काही गोष्टी शिकत असतो…’ असं म्हणत मोदींनी बारामतीत येऊन केलेलं भाषण! अनेकांना ते मोदींचे मिश्किल भाषण वाटेल मात्र ते सत्य अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना उभय नेतृत्वा दरम्यान घडलेल्या आहेत. जाणता राजा हे बिरूद माझ्या महाराष्ट्राने दुसऱ्यांदा कुणाला दिलेले असेल तर ते आहेत शरद पवार साहेब. रयतेच्या हिताची कणव, आपत्ती काळात नेतृत्वाची सिद्धता, सामाजिक संतुलन आणि पुरोगामी विचारांचा पगडा जपण्याचा आग्रही रोख, यातून महाराष्ट्राला लाभलेले हे लाडके नेतृत्व खर तर जगाची मिळकत ठरावी .

आम्ही कार्यकर्ते नेहमी साहेबांना जाणता राजा अशी उपमा देत असतो, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना म्हणून अजिबात नाही तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात शेतकरी कष्टकरी वर्गाची, त्यांच्या प्रत्येक बारीक प्रश्नांची व त्यावर जालीम उपायांची इथंभूत जाण असणारं नेतृत्व म्हणून. मी विविध ठिकाणी माझ्या भाषणांमध्ये नेहमी सांगत असतो की सुई पासून विमानापर्यंत कोणत्याही प्रश्नांची पूर्ण माहिती असणारं साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. या मातीतल्या सामान्य माणसाशी त्यांची इतकी घट्ट नाळ जोडलेली आहे की इथल्या विरोधकांना देखील साहेबांच्या मार्गदर्शनाचे मोल ठाऊक आहे. माझ्या जिल्ह्यात आले की जिवनराव बजगुडे यांचा आंबा घेणारच, माझ्या जिल्ह्यातील जनतेने या जाणत्या राजासाठी छाती बडवून ‘साहेब मी हाई तवर तुमचाच…’ ची दिलेली  साक्ष महाराष्ट्राने अनेकदा अनुभवलेली आहे.

राज्याच्या राजकारणात तर आजकाल फॅशन आहे, ज्याला प्रसिद्धी झोतात यायचं आहे, तीन चार दिवस सतत टिव्ही चॅनल्स वर दिसायचं आहे, त्याने थेट पवार साहेबांवर टीका करायची; बास, फेमस झालाच म्हणून समजा! त्यामुळे त्या आरोपांना लिहून माझा अन तुमचा वेळ घेणार नाही. तसे शरद पवार जगाचे क्रिकेट खेळलेले खेळाडू त्यांच्या खिलाडू वृत्तीची साक्ष आणि लाभ त्यांच्या राजकीय विरोधकांनी देखील मान्य करावा!

साहेबांचे जीवन मुळात अशा अनेक टीका टिप्पणीनी व त्यात साहेबांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने, गांभीर्य व राजकीय चातुर्याने सहज मार्ग काढून, जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवलेली शेकडो उदाहरणे साहेबांच्या इतिहासात पाहायला मिळतील. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांनी आपला वारस म्हणून हा पुरोगामी महाराष्ट्र ज्या सुकानुधारी नेतृत्वाच्या हातात दिला ते नाव म्हणजे माझे साहेब.

शालेय जीवनात गोवा मुक्ती सत्याग्रहातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले साहेब, त्या काळात विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून उदयाला आले, भाषणावरील मजबूत पकड, विषयावरील प्रभुत्व आणि त्या विषयातील बारकाव्यांची जाण या बाबींनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना साहेबांची दखल घेण्यास भाग पाडले. चव्हाणांनी साहेबांना आपले शिष्य करून घेतले. वयाच्या २४व्या वर्षी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना साहेबांकडे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाऊ लागले. खर तर आईने ज्या बाळाला टोपलीत टाकून बोर्डाची बैठक घेण्यासाठी बारामती ते पुणे अंतर कापले त्या लेकराला संघर्षाचे बाळ कडू थेट टोपलीत लाभले त्याच बाळाच्या संघर्षाची उंची आता हिमालयाची झालीय!

युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर जर्मनी, फ्रांस, इंग्लंड, इटली आदी देशात जाऊन तेथील राजकारण, पक्षबांधणी, आदी गोष्टी साहेबांनी नवतारुण्यात अभ्यासल्या. आज याच बाबींचा परिपाक असावा म्हणून लोकशाहीची ताकत साहेबांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा जिंकून सुद्धा विरोधी पक्षात बसवुन दाखवून दिली, सुडाच्या राजकारणाचा तो एक बदला होता मात्र त्यावर इथे लिहणार नाही.

आमदार, खासदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा ५० वर्षांहून अधिक काळ साहेबांचा संसदीय कारभाराचा अनुभव देशात बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडेच आहे. मला मधुकर भावे यांच्या यशवंतराव ते विलासराव या पुस्तकातला संदर्भ आवर्जून आठवतो, साहेबांच्या पोटातले पाणी कळायचे नाही याचा अर्थ उदात्त आणि उदार भावाचे साहेब केव्हा कुठला निर्णय घेतील अन त्याचे पडसाद किती दूरगामी असतील हे केवळ साहेबांना ठाऊक असायचे. परंतु साहेबांच्या आयुष्यात सत्तेपेक्षा कितीतरी अधिक संघर्ष त्यांच्या वाट्याला आलेला आहे. वसंत दादा पाटलांच्या काळापासून खंजीर, गद्दारी अशा टिकांचे हजारो विष प्याले साहेबांनी अत्यंत संयमाने गळ्याखाली उतरवले आहेत. टीका टिप्पणीने इंचभरजरी डगमगले, ते पवार साहेब कुठले!

राजकीय जीवनात टीका टिप्पणीवर उद्विग्न प्रतिक्रिया देणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, राजकारणात मोठं व्हायचं असेल तर पवार साहेबांसारखी सहनशीलता अंगीकारा. मार्च ९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी साहेबांवर विरोधकांनी नाही नाही ते आरोप केले, सप्टेंबर ९३ मध्ये मराठवाड्यात भूकंप झाला तेव्हा सैरभैर झालेल्या नागरिकांना सावरायला पवार साहेबच होते. पण नियतीला ते मान्य नसावं, ९४ मध्ये नागपूर येथे गोवारी समाजातील घडलेल्या घटनेवरून विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्तांतर झाले. काँग्रेस मध्ये त्याकाळी झालेल्या बंडखोरीस देखील काहींनी साहेबांना दोषी ठरवले. ९९ साली पवार आहेब, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेस मधून ६ वर्षांसाठी बाहेर काढले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विचारांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ अशा अनेक शिक्षण संस्थांसह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अशी अनेकविध पदे साहेबांनी भूषवली व त्यांना बहुमान मिळवून दिला, हा इतिहास आहे.

साधारण एक दशकापूर्वी मी साहेबांच्या सहवासात आलो, अगदी सुरुवातीच्या काळातच नव्याने माझ्या ताब्यात आलेल्या परळी नगर परिषदेला साहेबांनी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला. माझी घरात व पक्षात झालेली घुसमट व शेवटी नाते तोडून आम्हाला बाहेर काढल्यानंतर पक्षांतर करण्याचा घेतलेला निर्णय यावरून आमचे घर फोडले म्हणून देखील पवार साहेबांवर आरोप करण्यात आले. परंतु राजकीय जीवनात पहिली मोठी संधी मला पवार साहेबांनीच दिली हे कुणाला तरी नाकारता येईल का? माझ्या माणसांची सेवा करण्याची संधी ज्या लोकनेत्याने मला दिली ते मला सांगण्याची गरज तरी भासावी का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच आमदारकी मिळावी, अनपेक्षित होते, डिसेंम्बर २०१४ मध्ये मी परळीत असताना नागपूर अधिवेशनासाठी निघायची तयारी सुरू होती आणि टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या, ‘विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी धनंजय मुंडे यांची निवड होण्याची शक्यता’ वगैरे… खरंतर मला विश्वास बसत नव्हता की असे काही होईल. पण दुसऱ्याच दिवशी मला विरोधीपक्षनेते पदी नियुक्तीचे पत्र मिळाले… माझ्यासारख्या तरुण नवख्या कार्यकर्त्याला साहेबांनी त्यावेळी पक्षाकडे असणारी राज्यातली सर्वात प्रमुख जबाबदारी देणे हे मला अंगी शंभर हत्तींचे बळ येण्यापेक्षा कमी नव्हते, ज्याची सिद्धता महाराष्ट्र जाणून आहे .

वय वाढत गेले तसे साहेबांना कॅन्सरच्या आजाराने ग्रासले, राजकीय संघर्षाबरोबरच त्यांना शरीराच्या आतून असलेल्या या जीवघेण्या व्याधीचा गेली अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो आहे. कितीतरी वेळा शस्त्रक्रिया केल्या असतील, आज साहेबांना व्यवस्थित बोलता येत नाही, त्यावरूनही आमचे विरोधक व्यंग करतात, टीका करतात याची बऱ्याचदा चीड येते. पण संयम आता आम्ही साहेबांकडून शिकून घेतलाय! ८० च्या वयात असताना आजही साहेबांचा झंझावात आम्हा तरुणांना प्रेरणा देतो, राज्यावर कोणतेही संकट असो, साहेब तिथे हिमालयासारखे उभे असतात. अतिवृष्टी असो की अतिरेकी साहेब सामान्य माणसाचे अश्रू पुसायला थेट दारावर जातात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ८० वर्षांच्या वयात शेतकऱ्यांचे नुकसान हजारो किलोमीटर प्रवास करत बांधावर जाऊन पाहणारे पवार साहेब, अगदी अलीकडच्या काळात कोरोना मुळे सगळे जग हवालदिल झालेले असताना लस निर्मिती पासून ते गोरगरिबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी अहोरात्र वेळ देणारे पवार साहेब, महाराष्ट्र नव्हे तर सबंध देशाने पाहिले आहेत.

मी साहेबांच्या तुलनेत खुपच लहान आहे पण एक गोष्ट आवर्जून नमूद करतो, निवडणुका जवळ आल्या की विरोधक बदनामीची ठिणगी टाकणार म्हणजे टाकणारच, हे माझ्या आणि साहेबांच्या बाबतीत एक साम्य आहे! आणि आम्ही दोघेही बदनामीची ही षडयंत्र हाणून पाडण्यात तरबेज झालोत हेही तितकेच खरे! माझ्यासाठी साहेब प्रेरक शक्ती आहेत, मागच्या वर्षीची ईडीची कारवाईची नोटिसच घ्या उदाहरण म्हणून… ईडी ची नोटीस मग माध्यमातील काही ठराविक लोकांनी त्याचा केलेला उहापोह, आदरणीय अजित दादांच्या नावाने घातलेला गोंधळ आणि शेवटी साहेबांनी क्षणात ईडीची ‘अळी मिळी गुपचिळी’ करून केलेली दयावह अवस्था! तो घटनाक्रम आठवला की हसू येते.

२०१९ ची लोकसभा निवडणूक, त्यापाठोपाठ आलेली विधानसभा निवडणूक या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदरणीय साहेबांना अनेकांनी खिंडीत गाठायचा पुरेपूर प्रयत्न केला. विरोधी पक्षांनी तर महाभरती अभियानच राबवले. या काळात साहेबांच्या विश्वासातील अनेकांनी सत्तेपुढे लोटांगण घालत पक्षांतर केले. राष्ट्रवादीला गळती, पवारांना धक्का, पक्ष कमजोर झाला असे अनेक मथळे त्या काही दिवसांमध्ये वर्तमानपत्र व टीव्ही च्या हेडलाईन्स मध्ये पाहायला मिळत! पण अशा कोणत्याही धक्क्याला धक्का न मानत साहेब चालत राहिले. साहेबांच्या मुत्सद्दी राजकारणापुढे धक्का देऊ पाहणाऱ्या त्या सर्वांनाच साहेबांनी अखेर दिला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आणली.

महाविकास आघाडी किती प्रबळ-अढळ आहे, एकजूट आणि निश्चयाने मैदानात उतरली आहे हे काल – परवाच्या पदवीधर – शिक्षक निवडणुकीतील निकालांनी दाखवून दिले. जनतेचे हित केंद्रस्थानी ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या आघाडी विरुद्ध महाराष्ट्र द्रोह अशा या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिलेला कौल हा साहेबांच्या दूरदृष्टीला दिलेला कौल आहे असे मी म्हणेन!

बदनामीची षडयंत्रे असोत की राजकीय टीका टिप्पणी, सत्ता असो किंवा नसो, विरोधकांना धडा शिकवण्याची पवार साहेबांची मुत्सद्देगिरी, राजकारण आणि समाजकारण करत असताना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून दूरगामी विकासाचा दृष्टिकोन अशा अनेक बाबी साहेबांकडून शिकण्यासारख्या व प्रेरणा घेण्यासारख्या आहेत. पार्थच्या उमेदवारीच्या वेळी साहेबांनी स्वतः माघार घेत कौटूंबिक व राजकीय असा दुहेरी समन्वय साधला. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी साहेबांनी केलेली किमया भल्याभल्यांना न समजणारी आहे, किंबहुना ती किमया पूर्णपणे समजायला अनेकांना आणखी काही वर्षे लागतील! किंबहुना साहेब समजून घेण्याचा विषय आमच्या कवेच्या बाहेरचा आहे मात्र त्यांच्यातील ममत्वाचा येथेच्छ लाभ घ्यावा, सागराचे माप का काढावे? आपली ओंजळ भरून घ्यावी हेच तर सत्य!

खरंतर साहेबांवर लिहायला – बोलायला बसलो तर एक ग्रंथ सहज तयार होईल एवढं आहे, परंतु आज साहेबांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या काही छटा उलगडायचा मी छोटासा एक प्रयत्न म्हणून हा शब्दप्रपंच केला. आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांना या माध्यमातून ऐंशीव्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा देतो, तसेच साहेबांना उत्तम दीर्घ आयुरारोग्य लाभो अशी प्रभू वैद्यनाथाकडे प्रार्थना करतो…

– धनंजय मुंडे
समुदायाद्वारे पडताळणी केले आयकन
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close