गेवराई बायपासवर भीषण अपघात, वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू

बीड – गेवराई शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणा-या बायपासजवळ आय-20 कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या ५ पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ५ पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी आहेत. सर्व पदाधिकारी लातूरहून बीड मार्ग औरंगाबादकडे जात होते.
हा अपघात कारचालकाचा ताबा सुटल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार ऑईल टँकरला जाऊन धडकली. अपघातातील काही मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. एका जखमीवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारमध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रचार साहित्य होते. त्यावरून सर्वजण वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी क्रेन बोलावून कार बाजूला केली.