Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणब्लॉग्ज

भंडारदऱ्याच्या शेंडी’तून..संशयित ‘गाऊट’, झाला ‘आऊट’


ताज्या बातम्या साठी बघत राहा www.mh20live.com

नुकतच लॉकडाऊन सुरू झालं होतं.. आणि अनियमित जीवनाला एक नियमितपणा आला होता.. सकाळचं लवकर उठणं, फिरणं, प्राणायाम करणं, नाश्ता, जेवण,दुपारची वामकुक्षी, मुलांबरोबर खेळणं, वाचन, रात्रीचं जेवण, रात्रीच्या सिरीयल सगळं काही घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाललं होतं.

पहिल्या लॉकडाऊनचा तिसरा- चौथा दिवस असावा…उजव्या पायाचा अंगठा दुखायला लागला…वाटलं परवाच्या दिवशी जी आपण नखं काढली कदाचित अंगठ्याचे नख काढताना खोलवर ते काढलं गेलं असावं.. आणि म्हणून अंगठा दुखत असावा.. वाटलं दोन-तीन दिवसात राहून जाईल.

दोन दिवसानंतर अंगठ्याच्या वेदना दुपटीने वाढल्या..आता मात्र डॉक्टरांचा सल्ला व भेट गरजेची वाटली. जवळच पडेगाव येथे असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं.. परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षण करणारे गुरुजी आणि परीक्षा देणारे परीक्षार्थी यांच्यामधील तीन घंट्यातील औपचारिकतेच्या नात्याची आठवण डॉक्टरांच्या सहवासात झाली ! दुरूनच अंगठ्याकडे पाहिलं त्यांच्या समोर असलेल्या केस पेपर वर नाव, वय ,वजन लिहिलं आणि दोन दिवसाच्या गोळ्या घेऊन घरी परतलो.. दोन दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या आणि पायाला बरं वाटलं.. गोळ्या संपल्या नंतर पहिल्या दिवसापासून हळूहळू वेदनांचा आलेख वरच्या दिशेला जाऊ लागला… तीन दिवसाच्या खंडानंतर परत त्याच डॉक्टरांना भेटायला गेलो.. पहिल्या भेटीपेक्षा दुसऱ्या भेटीमध्ये डॉक्टर थोडसं अधिक बोलले… ह्यावेळी मात्र पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या..अन रक्तही तपासले.. रक्तामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी आढळलं..युरिक ऍसिडचे प्रमाण हे पण अप्पर लिमिट पर्यंत पोहोचले होते. वेदनांची तीव्रता, होणारा त्रास, त्रासाची वेळ यावरून डॉक्टरांनी अंदाज वर्तवत सांगितले, ” तुमचा हा आजार कदाचित ‘गाऊट’ असू शकतो”

‘गाऊट’ हा शब्द पहिल्यांदाच कानावर पडला.. काहीतरी भयंकर प्रकार नसावा.. या भीती सह डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन घरी पोहोचलो.. आता डॉक्टरांनी दहा दिवसाचा खुराक दिला होता, त्यामध्ये सुरुवातीचे तीन दिवसाचा डोस जरा ‘हेवी’ होता !

घरी आल्यानंतर ‘गुगल बाबा’ व ‘यूट्यूब’ यांच्याकडून ‘गाऊट’ काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.. त्याची लक्षणे काय आहेत? तो का होतो? होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे ? आहारामध्ये काय घेतलं पाहिजे? काय टाळलं पाहिजे? या सर्व बाबी ‘युट्युब आणि गुगल बाबा’ ने समजावून सांगितल्या !

‘गाऊट’ या आजारात शरीरामध्ये तयार होणारे युरिक ऍसिड युरिनद्वारे बाहेर न पडल्याने ते शरीरातील हाडांच्या जॉईंट मध्ये ‘स्पटिक’रूपाने जमा होते व जमा झालेल्या भागामध्ये वेदना जाणवायला सुरुवात होते..त्वचा लाल व्हायला लागते.

‘गाऊट’ या आजाराबाबत एक -दोन मित्रांचंही मार्गदर्शन घेतलं.. ‘समस्या’ का निर्माण झाली? संभाव्य कारणांचा शोध,आणि नंतर उपायोजना या पायऱ्याने समस्या शून्यावर आणायची या उद्देशाने मार्गक्रमण सुरू झालं.

तीन दिवसाच्या ‘हेवी’ डोसच्या काळात वेदना पुन्हा शुन्य झाल्या.. चौथ्या दिवसापासून परत ‘जैसे थे’ !

डॉक्टर बोलता-बोलता बोलून गेले होते कि या आजारावर खूप ‘दीर्घकाळ’ ट्रीटमेंट घ्यावी लागते.. यूट्यूब च्या माध्यमातून थोडेसे समजले की ऍलोपॅथी गोळ्या औषधामुळे शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण आणखी वाढू शकते.. रसायनामुळे रसायन कदाचित वाढू शकेल, हा विचारही तर्कामुळे बळावला.. अन् त्यामुळे आयुर्वेदिक,आहार नियंत्रण या बाबींकडे भर देण्यासाठी मन वळवलं !

कपालभाती, अनुलोम-विलोम यासारख्या प्राणायामाने असाध्य रोगावर मात केलेली आहे हेही यूट्यूब च्या माध्यमातून ऐकायला मिळाले.. अन् सातत्याने प्राणायाम देखील सुरू केला !

हा आजार का झाला? त्या कारणांचा शोध आता सुरु झाला.. कोणत्या आहारामुळे शरीरातील युरिक एसिड ची पातळी वाढते त्या आहारा संदर्भातही जाणून घेतले.. कोरोना चा काळ सांगत होता, घरातलं जोपर्यंत सर्वकाही संपत नाही,तोपर्यंत बाहेर पडूच नका.. हा एक विचार बोल्ड झाला होता ; पण तो विचार मलाच ‘क्लीन’ करेल हे मात्र वाटलं नव्हतं ! सुरुवातीचा भाजीपाला संपल्यानंतर सरकारला (सौ.ला) सांगितलं घरात जे जे करता येईल ते-ते करा व करत रहा.. सर्व प्रकारच्या डाळी , बेसन कुरडायाची भाजी, भज्यांची भाजी! ..पालेभाज्या फळभाज्या ह्या कधीच संपल्या होत्या.. आता जोर सगळा दाळी-दुळी वरच होता.. अन कारणांच्या शोधामध्ये एक लक्षात आलं ‘कडधान्य’ मुळे शरीरातील ‘युरिक ऍसिड’चे प्रमाण वाढलं असावं.

दुसरे असे याच काळामध्ये कोरोनाची जागृती करणारे ऑडिओ-व्हिडिओ कानावर पडायचे ओरडून सांगायचे,”दिवसभरात जेवढं पिता येईल तेवढं गरम पाणी प्या, गरम पाणी प्या”.. आणि या काळात उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी प्यायला सुरुवात केली.. गरम पाण्याचे दिवसभरामध्ये फार तर चार किंवा पाच ग्लास व्हायचे..शरीरातील पाण्याची पातळी सहाजिकच कमी झाली.. अन् त्याचा परिणाम शरीरातील तयार होणारे युरिक ऍसिड बाहेर पडण्या-न पडण्यावर होत असावां असंही वाटू लागलं.

दुसऱ्या भेटीत डॉक्टरांनी सांगितले होते की ‘पाणी भरपूर पित’ चला.. शरीरातील युरिक एसिड शरीरातच जमा होण्याचे कारणामध्ये पाण्याचं कमी पिणे आणि यूरिक ॲसिड तयार होणारे पदार्थ/आहार ही कारणे दिसू लागली !

निसर्गातून ‘पाणी’ आणि ‘हवा’ या दोन गोष्टी आपल्याला फुकट मिळतात , परंतु आपण त्याचं महत्त्व समजून घेत नाही.. ज्या गोष्टी फुकटात मिळतात त्याचं महत्त्व बऱ्याच लोकांना अद्यापही पटलेलं नाही .. “अनुभव नावाचा शिक्षक अगोदर जबर मोबदला घेतो आणि मग शिकवतो” हा वाचलेला, ऐकलेला विचार या दोन महिन्याच्या काळात जगलो मी.. खूप शिकवलं या दोन महिन्याच्या काळात त्यांनं !

जीवनाच्या पुर्व प्रवासाकडे वळून पाहिल्यानंतर लक्षात आलं खरंच आपल्या आहार,विहार,निद्रा, व्यायाम, याबद्दल किती दुर्लक्ष केले आहे.. घरातून सकाळी भरून दिलेली पाण्याची एक बॉटल सुद्धा रात्रीपर्यंत संपत नसायची.. जवळचे मित्रही सांगायचे ‘सर तुम्ही पाणी खूप कमी पिता’.. पण त्यावेळेस त्यांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष व्हायचं.. आज तेच दुर्लक्ष ‘लक्ष्य’ (टारगेट) बनलं होतं.. एक ‘वडापाव’ चोवीस घंट्यासाठी लढायचा; तर कधीकधी फक्त ‘चहाच’ पूर्ण दिवसाची सोबत करायचा.. त्याकाळात त्यावेळी ‘वडापाव’चा व ‘चहा’चा सार्थ अभिमानही वाटायचा.. धावपळीच्या जीवनशैलीमुळे कित्येक रात्री एक वाजता, दोन वाजता जेवण व्हायचं; जे कुठल्याच आहारशास्त्राच्या नियमात बसत नसायचं!

रामदेवबाबा यांची योगासनं आणि पतंजलीची औषधंही डोळ्यासमोर नाचू लागली.. मित्रपरिवारातील दोन -चार जणांना अनुभवही चांगला होता.. म्हणून एक दिवस जवळच असलेल्या पतंजली च्या औषधालयामध्ये जाऊन आजाराचे स्वरूप सांगून औषधे आणली आणि आता ऍलोपॅथिक औषध बाजूला ठेवून बाबांचे औषधं सुरू केली..ज्या आहारातून यूरिक ॲसिड वाढतं ते आहार थांबवले.. क जीवनसत्व असणारे फळं खायला सुरुवात केली..रोज चमचाभर ‘मेथी’ रात्री भिजवून सकाळी सकाळी उपाशी पोटी खाऊ लागलो.. लिंबू-पाणी, नारळ पाणी, खाता-सोडा,ओवा-पाणी, जे-जे शक्य ते-ते करू लागलो.. दोन-चार दिवसातच बरे वाटायला लागले म्हणून पतंजलीच्या डॉक्टर ताईंना फोन करून सांगितले आता बरे वाटते आहे, ‘औषध घ्यायची थांबवू का?’ त्यावर त्यांनी सांगितले ,’हा आजार इतक्या लवकर बरा होणारा नाही’ व एक दोन गोळ्या कमी करायला सांगितल्या. दोन चार दिवसानंतर हळूहळू त्रास ही वाढायला सुरुवात झाली.. आता काय करावे हे समजेना व माझा पुन्हा एकदा ‘अर्जुन’ झाला ! ऍलोपॅथी की आयुर्वेदिक या दोघांच्या मध्ये विचार चक्र थांबले.. पण त्रास काही थांबेना.

ॲलोपॅथी डॉक्टरांनी दहा दिवसानंतर बोलवले होते, परंतु पतंजली सुरु केल्यामुळे त्यांच्याकडे जायला जमले नाही.. असह्य वेदना सुरू झाल्यानंतर परत पाऊले वळाली ॲलोपॅथी कडे. डॉक्टरांनी पूर्वीच्या तारखा पाहिल्या अन रागावत विचारलं यायला उशीर का लावला? मी त्यांना जे खरं होतं ते सांगितलं पण झालेली चूक कबूल केली !

परत या वेळेच्या टप्प्यात दहा दिवसाच्या गोळ्या तीन दिवसाचा अधिक डोससह याप्रमाणं परत तिसरी एक चिठ्ठी लिहिली गेली.. गोळ्या घेऊन परत घरी आलो आणि परत ‘एकं- दोनं’ सुरू केले.

याच काळात एका डॉक्टर मित्राचा सल्ला घेतला.. डॉक्टर बदलू की जे आहेत तेच ठेवू.. त्यांनं सांगितलं डॉक्टर बदलण्यापेक्षा आपण आहे त्या डॉक्टरांच्या सल्ल्याखाली पुढे मार्गदर्शन घेऊ.. याच काळात डॉक्टरांना विचारले होते की ट्रीटमेंट किती काळ चालेल? त्यावर ते बोलले होते, जर हा आजार गाऊट असेल तर दहा वर्षे सुध्दा चालू शकेल? हे ऐकून तर मी चक्रावूनच गेलो.. सरकार(सौ.) धीर देत होतं, विज्ञान खूप पुढं गेलं आहे.. काहीतरी इलाज असेल हे पुन्हा पुन्हा ते सांगत होतं !

वेदना मात्र दिवसा थांबायच्या आणि रात्री डोकं वर काढायच्या.. तळपायाची ,अंगठ्याची, पायाच्या बोटाची प्रचंड ‘आग’ व्हायची.. ती आग थांबवण्यासाठी घरात असलेल्या फ्रीजला मनोमन धन्यवाद द्यायचो.. रात्री-अपरात्री उठून सरकार माझ्या पायावर बर्फाचा हात फिरवायचं.. या काळात होणाऱ्या माझ्या वेदनांनी मला महिलांच्या प्रसव वेदनांचं स्मरण करुन दिलं.. खरंच त्या वेदना कशा असतील ? याचा मन अंदाज बांधायचं.. ‘मरण यातना’ सुध्दा एवढ्या ‘कठीण नसतील’, असंही वाटायचं.. पहाटे मध्यरात्री या वेदना खूप तीव्र व्हायच्या.. सहन करण्याच्या पलीकडे माझ्या हातात दुसरा काहीच पर्याय नव्हता.. बर्फानं तात्पुरता वेदनेचा काटा शून्याच्या दिशेने धावायचा.. बरं वाटायचं !

बघता बघता हेही दहा दिवस संपले आणि परत अकराव्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो.. त्यांना सांगितले ,”त्रास कमी होतो, परत वाढतो कमी होतो, वाढतो परंतु तो शून्यावर काही येत नाही.” यावेळेला मात्र आता डॉक्टरांनी पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्या.. पण यावेळी थोडा बदल होता.. यापूर्वी घेतलेल्या गोळ्यापैकी एकच गोळी, पण ती दोन ऐवजी तीन वेळा घ्यायला सांगितली.

पुन्हा एकदा गोळ्या बरोबर ‘आशा’ही सोबत घेतली आणि घरी आलो..जवळपास दोन महिन्यांचा काळ आता पूर्ण होत आला होता.. या आजाराचा शेवट काय होणार? याबद्दलही आणि अनिश्चितता वाढतच चालली होती.

दोन-चार जवळचे मित्र नातेवाईक सोडले तर कुठे काही याविषयीची वाच्यताही करत नव्हतो.. मित्र, नातेवाईक ‘धीर’ द्यायचे आणि खूप मोठा ‘आधार’ वाटायचा..’जातील हेही दिवस जातील’ या विचारावरचा ‘विश्वास’ वाढायचा..

आता या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या पाच-सहा दिवस त्रास जाणवला नाही. सातव्या-आठव्या दिवसानंतर त्रास जाणवायला सुरुवात झाली.. हळूहळू पायांच्या बोटांचा रंग बदलत चालला होता.. करंगळीचा रंग वेगानं बदलत गेला.. मुलाला विचारलं करंगळी कशी दिसते रे?, तर त्यांनं काळजी करणाऱ्या शब्दात सांगितलं,” बाबा ‘हे’ तर करवंदच वाटतं आहे!” मुलाच्या त्या उत्तरानं वेदनेवर हळूवार फूंकर घातल्यासारखं वाटलं.. पण ते क्षणिक होतं !

आता मात्र वेदनांनी कळस गाठला होता.. पाय टेकवत नव्हता.. चालता येत नव्हते.. डॉक्टर बदलावे हा विचार मनात तीव्र झाला होता.. 1-2 मित्रांना त्या स्थिती मधील पायाचे व करंगळीचे फोटो पाठवले आणि मार्गदर्शन विचारले.. त्यांनी हाडाचे डॉक्टर किंवा सर्जरी तज्ञ यांना दाखवा असे सांगितले.. आर्थो स्पेशालिस्ट यांना दाखवल्यानंतर त्यांनी ‘कलर डॉपलर’ करण्यास सांगितले. रक्तवाहिन्यांमध्ये ‘अडथळा’ ( ब्लॉकेज) आहे असेही म्हटले.. कलर-डॉप्लर नंतर डॉक्टरांनी फक्त औषधोपचाराने हा त्रास कमी होणार नाही असे सांगितले.. एमजीएम हॉस्पिटल मधील रेडिओलॉजी डिपार्टमेंट श्री चारठाणकर यांना होणारा त्रास सांगितला व मार्गदर्शन विचारले, त्यावर त्यांनी डॉक्टर शिवाजी पोले रक्तवाहिन्यांची तज्ञ यांना भेटण्यास सांगितले.

डॉक्टर पोले साहेबांनी माझ्या पायाची अवस्था पाहतच ऍडमिट होण्यासाठी सांगितले व ऑपरेशन करावे लागेल असेही बोलले.. दिनांक 11 जून 2020 रोजी भरती झालो, त्याच दिवशी अँजिओग्राफी झाली व एंजियोप्लास्टी सुध्दा !

पायातील रक्तवाहिन्यांमध्ये दोन अडथळे (ब्लॉकेज) होते जर आणखी उशीर झाला असता तर ‘गॅंग्रीन’ झाले असते आणि त्याचा परिणाम खूप वेगळा राहिला असता असेही यावेळी डॉक्टरांनी सांगितले.. वेळेत निदान झाल्याचं ‘समाधान’ आणि ‘शून्य’ झालेल्या वेदना यामुळे एक वेगळाच ‘आनंद’ वाटत होता !

Stitch in time saves nine.. अर्थात वेळीच दिलेला टाका नऊ टाके वाचवतो, हा विचार वाचला होता, ऐकला होता, अनेकांना सांगितलाही होता..परंतु “उशीर झाला असता तर पाय काढावा लागला असता”, या या वाक्यानं अनुभवला मात्र जवळून या काळात !

का झाले? का होते? कसे झाले? यापेक्षा जे झाले ती वेळेत समजले व वेळेत उपचार झाले हे अधिक महत्त्वाचे या डॉक्टरांच्या बोलल्यामुळे विचारचक्र सुद्धा शांत झाले !

दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांची टीम, त्यांच्यातील संवाद एका लढाईमधले वाटत होते..”धरा, ओढा ,आवळा ,फोडा,व्वा ,छान !” असे कानावर पडलेले शब्द ऐकून कधी ‘थरार’ तर कधी ‘हर्ष’ वाटायचा..घामानं अंग कधी चिंब झालं ते कळलं सुद्धा नव्हतं..! अधून मधून डॉक्टर सांगायचे आता तुम्हाला थोडं गरम वाटेल; आता तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु घाबरू नका?” त्यांच्या या बोलण्याने ‘धीर’ वाटायचा आणि ‘आधार’ मिळायचा !

Angiography व Angioplasty च्या शस्त्रक्रियेच्या वेळी मी एक प्रकारच्या युद्धात असल्यासारखं वाटत होतं…. या युद्धामध्ये डॉक्टर पोले सेनापती होते तर त्यांचे सर्व सहकारी सैन्य म्हणून किल्ला लढवत होते.. बघता बघता तो पाऊन तास कसा गेला ते कळलेही नाही.. शस्त्रक्रिया करताना होणारा त्रास गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये झालेल्या त्रासा पेक्षा ‘किरकोळ’ वाटत होता.

अडीच महिन्यांपासून त्रास होता.. पण आता तो मावळला. दि. १४/६/२०२० रोजी सुटी झाली.. घरी सुखरुप परतलो, ते देवाच्या कृपेमुळे डॉक्टर व त्यांच्या टीममुळे आणि जीवनप्रवासात भेटलेल्या सहप्रवाशांच्या शुभेच्छा व आशिर्वादामुळे. धन्यवाद सर्वांचे मनापासून, यानिमित्ताने !

कोरोनाच्या या काळात दवाखान्यात माझ्या सोबत फक्त गुरुजी (मेहूणे श्री विष्णू गायके ) होते.. चहा, दुध देणं, घरुन डबा आणणं, गोळ्या- ओषधं आणणं, इतकंच का उलटी साठी टप देणं, पैशांची व्यवस्था करणं, मोबाईलवरुन नातेवाईकांना तेवढ्याच संयमानं हँडल करणं, अशी कितीतरी प्रकारची सेवा गुरुजींनी कसल्याही प्रकारचा त्रागा न करता आईच्या मायेनं केली.. कदाचित आईलासुध्दा एवढं करताना मर्यादा आल्या असत्या.. चार दिवसाच्या काळात एका शब्दानंही ते रागावले नाही, चिडले नाही, खुप प्रेमानं त्यांनी मला हाताळलं.. “माणूस वयानं जरी लहान असला तरी तो कर्मानं महान बनतो”, याचा उत्तम अनुभव गुरुजींच्या माध्यमातून आला.

असंख्य मित्र, नातेवाईक या सर्वांनी फोन करुन,वॉटस अप वरुन, मेसेज,मेलवरुन ‘संवाद’ साधला, खूप ‘आनंद’ वाटला.. त्याच्या जोरावरच पुन्हा जोमानं कामाला लागायचं ‘बळ’ मिळालं !

‘काळजी घ्या’ असं सांगणारी, प्रार्थना करणारी,काही अडचण आहे का? असं विचारणारी, प्रोत्साहन देणारी,बळ वाढवणारी ‘माणसं’ जीवनप्रवासात ‘लाभ’ली हे माझं भाग्यच.. मला अभिमान वाटतो त्या सर्वांच्या डायरीत माझं नाव असण्याचा !

दोन- अडिच महिन्यात जो त्रास झाला तो पुर्व जीवनप्रवासातील कळत नकळत, जाणते- अजाणतेपणात घडून गेलेल्या चुकीच्या वागण्याचा, नकारात्मक विचाराचा अन् अनैसर्गिक जीवन पध्दतीचा परिणाम असावा; तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, वेळेत परिस्थिती पुर्वपदावर येणं हा पुर्ण आयुष्यातील चांगल्या कामाचा ‘पुरस्कार’ असावा असाही चिंतनविचार या निमित्तानं पुढील जीवनप्रवासासाठी ‘हिंट’सांगून ‘सतर्क’ करून गेला गेला.

निसर्ग, नियती , ईश्वर यांनी पुढच्या जीवन चित्रपटासाठी एक चांगला ट्रेलर या निमित्तानं दाखवून दिला.

एक मात्र चांगले झाले या काळात.. ‘भरपूर पाणी प्यायची सवय’ लागली..व्यायाम , प्राणायाम याच्यामध्ये ‘नियमितता’ आली..माझ्यामुळे घरातले सर्व जण भरपूर पाणी पिऊ लागले आणि प्राणायाम सुद्धा करू लागले..’जेवणाकडे’ व ‘जीवनाकडे’ सारेच आवर्जून गांभीर्यानं लक्ष देऊ लागले !

खरंतर “हे सारं ” सांगायची गोष्ट नाही..जाहिरात हा तर मुळीच उद्देश नाही.. ‘रडून ऐकणं अन् हसून सांगणं’ ही जरी जीवनाची एक रीत असली तरी जीवन प्रवासाच्या अंतिम टप्प्यात “किधर गये थे, तो किधर भी नही; और क्या लाये तो कुछ भी नही” अशी अवस्था होऊ नये; पुढच्यास ठेच मागचा शहाणा..या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना अनुभवातून आलेलं शहाणपण चार लोकांच्या कामी पडावे म्हणून हा प्रपंच..

ज्यांचं जीवन ‘आदर्श’ आहे त्यांना मूळीच हे ‘सारं’ सांगायचं नाही त्यांच्या जीवनशैलीला सलामच आहे.. पण ज्यांची ‘शैली’ शिला’पासून भरकटण्याची शक्यता आहे अशांसाठी हा ‘सार’ सांगण्याची आवश्यकता वाटते यानिमित्ताने.., धावपळीच्या जीवनाची गती थोडीशी कमी करावी..स्वतःचा ‘शहाणपणा’ ‘पणा’ला लावू नये.. आपण कितीही घाईत असलो, तरी वाहनात इंधन आहे की नाही याची अगोदर खात्री करुन घेतो.. अन् लाख मोलाचा देह घेऊन घराच्या बाहेर पडताना मात्र तशी काळजी घेतो का? याचाही विचार महत्वाचा वाटतो.. अनावश्यक गोष्टीकडे धावणार्‍या इच्छांना आवर घालावा..निसर्गाने फुकट दिलेल्या ‘हवा’ आणि ‘पाणी’ यांचा पुरेपूर वापर करून घ्यावा.. दिवसभरात ‘भरपूर पाणी’ प्यावं..दिवसभरात दहा मिनिटांचा वेळ काढून जाणीवपुर्वक ‘दीर्घश्वसना’चा सराव करावा.. ऑक्सीजन ही शरीरातील अब्जावधी पेशींची गरज आहे.. ती समजून घ्यावी.. चोवीस तासातला किमान एक तास व्यायामासाठी द्यावा.. प्राणायाम-योगासने करावे किंवा पायी चालावे…पुरेसा आणि संतुलित आहार घ्यावा..आणि गरजेनुसार विश्रांतीसुद्धा !

‘जसं आहे तसं स्वीकार करण्याच्या सवयीमुळं’,’ या काळात खंत, पश्चाताप, त्रागा, दुःख मात्र जवळ फिरकले नाही याचाही आनंद वाटतो.. त्रास जाणवला पण त्यानंही घेतलं कमी अन् दिलं भरपूर !

‘संशयित हा शब्द पूर्वी फक्त आरोपीच्या संदर्भानं वावरायचा.. कोरोनामुळं मात्र त्याची व्याप्ती वाढली.. माझ्या बाबतीतला आजार जो वाटला ‘संशयित गाऊट, तो अखेर झाला ‘आऊट’ !

✍️✍️✍️
डॉ.शंकर आ. गाडेकर
विस्तार अधिकारी(शिक्षण)
शेंडी (भंडारदरा डॅम)
ता.अकोले जि.अहमदनगर

ह.मु.तारांगण, औरंगाबाद
📧 [email protected]
📲9890201591

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close