जालना जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रामार्फत 5 ते 18 वयोगटातील बालकामगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

जालना दि. 6 :- श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार दिल्ली यांच्या सूचनेनुसार दि 1 फेब्रुवारी 2021 रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे नेहरू युवा केंद्रामार्फत जालना जिल्ह्यात 5 ते 18 वयोगटातील बालकामगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण दिनांक 6 मार्च 2021 पासून सुरू झाले असून जालना जिल्ह्यात 5 ते 18 वयोगटातील बालकामगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण याकरिता दिनांक 5 मार्च 2021 रोजी जिल्हा समाजकल्याण कार्यालय सभागृह याठिकाणी 61 महिला सर्वेक्षण प्रगणक यांचे कोरोंनाचे नियम व अटी पाळून 20-20 च्या टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले. व पुढील 8 ते 10 दिवसात जालना जिल्ह्यातील सर्व स्लम एरिया, वीटभट्टी, बिडिकाम, पापड लाटणे,भंगारकाम, खदान, कत्तलखाना, मटन शॉप,गॅरेज, हॉटेलकाम ,घरकाम ,शेतीकाम अशा विविध कार्यक्षेत्राचा सर्व शहरातील वार्ड ,प्रभाग, यांठिकाणी सर्वेक्षण होणार असून याकरिता जालना, भोकरदन,अंबड,परतूर,जाफराबाद,मंठा, घनसावंगी,बदनापूर या 8 शहर व तालुका स्तरावरील ज्या गावात जास्त लोकसंख्यांची गावे,बाजारगावे अशा 42 खेडे गावांची निवड करण्यात आलेली आहे.
या सर्वेक्षणा दरम्यान या महिला प्रगणक यांना सर्वेक्षण फॉर्म समजावून सांगून सर्वेदरम्यान सर्वेक्षण कार्यक्षेत्राच्या ठिकाणी लोकेशन घेण्यासाठी व पडताळनी करण्याकरिता एनराईड मोबाइल द्वारे लोकेशन घेण्यासाठी जी.पी.एस कॅमेरा अॅप सर्वांच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करण्यात येऊन सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकामगार विद्यार्थांचा लाईव्ह फोटो घेण्यात येत असून सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकामगार विद्यार्थ्याला 10 अंकी चाइल्ड कोड देण्यात आलेला आहे ज्यामुळे तो विद्यार्थी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील ,कोणत्या प्रभागातील व कोणत्या प्रगणकाच्या माध्यमातून आढळून आला हे त्वरित निदर्शनास येते. या सर्वेचा अहवाल घेण्याकरिता व्हाट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुप मध्ये योग्य सर्वेक्षण होण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प
संस्थेचे शासकीय अधिकारी व सर्व सदस्य,सहाय्यक कामगार आयुक्त,जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी तसेच महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सहभागी असून या सर्वांच्या सहभागामुळे जालना जिल्ह्याचे सर्वेक्षण व्यवस्थित होत आहे की नाही याची दखल घेत आहे व त्यामध्ये वेळो वेळी मार्गदर्शन व सूचना देण्यास ग्रुपची मदत होत आहे.
जी.पी.एस कॅमेरा अॅप सर्व प्रगणकांच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड केल्यामुळे सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकामगार विद्यार्थांचा लाईव्ह फोटो घेण्यात येत असल्यामुळे या फोटोत बालकामगार विद्यार्थी लाईव्ह लोकेशन, त्याचा पत्ता, वेळ,सर्वेक्षण दिनांकासहित, फोटो काढण्यात येत असून तो व्हाट्स अॅप ग्रुपवर पाठविण्यात आल्यामुळे सर्वेक्षणात आढळून आलेल्या या बालकामगार विद्यार्थ्याची पुढील काळात पाठपुरावा करण्यास सोयीस्कर होईल.
सर्वेक्षणात आढळून आलेल्या या बालकामगार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचा यापुढे प्रयत्न राहील.
तरी जिल्ह्यातील सर्व आस्थापनाचे मालक, पालक यांनी सर्वेक्षणाकरिता आलेल्या सर्व प्रगणक यांना या विद्यार्थ्याची माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवाजी खरात , जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळे, प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी केले.