Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

युवकांचे प्रेरणास्थान सुमित पंडित- पुजा पंडित

जीवन जगण्याचे तीन मार्ग असतात. पहिला- पारंपरीक रुळलेल्या वाटेने चालत जगणे. दुसरा- थोर व्यक्तींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या आदर्शाप्रमाणे त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालवत जगणे. तिसरा- स्वतःच जीवन जगण्याचा नव्याने मार्ग निर्माण करुन समाजाला प्रेरक असे जीवन जगणे. तिसऱ्या मार्गाने केवळ युगपुरुष अथवा महापुरुष जाऊ शकतात.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण


सुमित पंडित, औरंगाबाद. असाच सामान्य तरुण. थोर समाजसेवक गाडगेबाबा, महात्मा ज्योतिराव-सावित्रीबाई फुले व संत सेना महाराज यांच्या सेवाकार्यातून प्रेरणा घेवून विविध क्षेत्रात समाजसेवेचे कार्य हाती घेवून आजच्या युवा पिढीचा प्रेरणास्थान बनला आहे. फक्त इ. ७ वी पास शिक्षण असलेल्या व केश कर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या,आर्थिक परिस्थितीने अतिसामान्य असणाऱ्या या युवकांचे समाजकार्य मात्र अनेक अति उच्चशिक्षित व गर्भश्रीमंतांना लाजवणारे आहे.आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी मिष्टान्नभोजन देणारा हा तरुण “मुलगी तर आहे, कशाला पाहिजे तिचे एवढे लाड व कौतुक !” या एका नातेवाईकाच्या हेटाळणीपूर्ण उद्गाराने प्रेरणा घेवून ‘बेटी बचाव अभियाना’चे राष्ट्रीय कार्य हाती घेवून समाजकार्याला लागला.


हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा


जिल्हा शासकीय अर्थात घाटी रुग्णालय,औरंगाबाद येथे माणुसकी सलुन च्या माध्यमातून त्यानी मुलींचा जन्मदर वाढावा याकरीता मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा साड़ी-चोळी,वडिलांना शाल-श्रीफळ देवून सन्मान व दोन महिने २१ दिवस मोफत दाढी-कटिंग,नवजात बालिकेला नवीन कपडे व जवळ मोफत व तिच्या नावे पोस्टात ‘जीवन सुकन्या योजना’मध्ये रु. २८१/- भरुन ‘कन्या जन्माचा आनंदोत्सव’ साजरा करु लागला. अशातच म्हैसाळा जि. सांगली येथे एकाच वेळी १४ स्री भ्रूण मृत स्वरुपात सापडल्याची बातमी ऐकून भयंकर हादरा बसलेल्या सुमितने या घटनेकडे समाज, सेवाभावी संस्था व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘क्रांती चौक, औरंगाबाद’ येथे आंदोलन करुन या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करुन आपले ‘बेटी बचाव अभियान’ अधिक तीव्र केले.


हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण


औरंगाबादमध्ये मराठवाडा,खांदेश,विदर्भातील गरजू, गरीब रुग्ण व नातेवाईकांचे उपचारासाठीचे आधार केंद्र म्हणजे ‘जिल्हा शासकीय रुग्णालय घाटि.’ बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औषधे, प्रसंगी रक्त व निवास-भोजन सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो.अशा रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीला सुमित धावून जातो. ‘माणुसकी सेवा ग्रुप’ व ‘सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अशा रुग्णांना मोफत औषधे, रक्त, जेवण इ. विविध सेवा देवून त्यांचा आजारही सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो. ‘रक्तदान – श्रेष्ठ दान !’ या संकल्पनेतून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणेसाठी विविध माध्यमातून आत्तापर्यंत ६० रक्तदान शिबिरे आयोजित करुन ६९९० रुग्णांना रक्त उपलब्ध करुन त्यांना जीवनदान देण्यास हातभार लावला आहे.


आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी पैशाअभावी कधी कधी काही रुग्ण, त्यांचे नातेवाईक नाइलाजाने आपले सौभाग्यलेणेही विक्रीस काढतात. अशा प्रकारे उपचारासाठी सौभाग्यलेणे विक्रीस काढलेल्या रुग्ण, नातेवाईकांचा शोध घेवून त्यांना मोफत औषधे, प्रसंगी रोख पैसे पुरवून सुमितने अनेक महिलांचे सौभाग्यलेणे व संसार वाचवले आहे. या सेवाकार्यात त्यांना त्यांच्या पत्नी व सहका-यांचे सहकार्य मिळते. पत्नी सौ. पूजा पंडितच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचार घेणाऱ्या गरीब व गरजू रुग्ण व नातेवाइकांसाठी उपचार काळात दररोज १५/२० जेवणाचे डबे पुरवण्याचे सेवाकार्य अखंडपणे चालू आहे.


हेही वाचा जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार
‘बेटी बचाव’ व ‘रुग्ण सेवा’कार्याबरोबरच सुमितने महिला सक्षमीकरणांतर्गत ‘बेटी पढाओ’ अभियानातही आपले योगदान सुरु केले आहे. ‘मुलींनी शिकून स्वयंपूर्ण झाले पाहिजे’ या विचारातून ‘कन्या दत्तक पालक योजना’ सुरु करुन आत्तापर्यंत १५० मुलींचे दत्तक पालकत्व घेवून त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे व त्यांना ‘शिक्षणाचा प्रकाशमार्ग’ दाखवला आहे. तसेच मागील दोन वर्षात ७५०० विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर केला आहे. ‘शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीने उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगावे’ म्हणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थीनींचा ‘शिक्षण प्रेरणा सन्मानपत्र’ देवून त्यांचा सत्कार, सन्मान व गुण गौरव करण्याचे काम सुमित करतो आहे.
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठीही त्याचे सेवाकार्य चालू आहे. निराधार, रस्ता भरटकलेले, घर सोडून बाहेर पडलेले, अबाल-वृद्ध, मनोरुग्ण, कुष्ठरोगी, भिकारी यांना आधार देण्याचे कार्य सुमित आपल्या ‘माणुसकी ग्रुप’च्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांसह करतो आहे. रात्र-अपरात्र, ऊन-वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सापडलेल्या ठिकाणाहून अशा दुर्लक्षितांना उचलून आणून दवाखाण्यात दाखल करणे, त्यांना स्वच्छ आंघोळ घालणे, त्यांची दाढी- कटिंग ( पुरुष ), वेणी-फणी ( स्री ) करणे, अत्यावश्यक उपचार करुन त्यांची सेवा-सुश्रुषा करणे, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेवून दामिनी पोलीस पथकाच्या मदतीने त्यांना त्यांच्या घरी पोहचवणे,नातेवाइकांचे प्रबोधन करणे, निराधारांना आधाराश्रमात पोहचवून त्यांना जीवनाधार देणे, त्यांचे पुनर्वसन करणे. मनोरुग्ण असल्यास उच्च न्यायलयाच्या परवानगी ने पुणे येथे मनोरुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो अशा दुर्लक्षित निराधारांचा सुमित आधार बनला आहे.महाराष्ट्र आतापर्यंत १२८४ मनोरुग्णाना न्याय दिला आहे.
सेवाकार्याबरोबरच भारत व महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सुमित ‘प्रेरणादूत’ बनला आहे.’नारी प्रतिष्ठा’अभियानांतर्गत ‘माणुसकी स्वच्छता अभियान’बेटि बचाव बेटि पढाव अभियान, सुरु करुन जे कुटुंब रक्तदान करनाऱ्या दात्याची १ महिना ११ दिवस दाढी कटिंग मोफत करतो तसेच स्वत:चे शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करेल त्या कुटुंबाचा सपत्नीक शाल-श्रीफळ देवून सत्कार व कुटुंब प्रमुख पुरुषाची १ महिना ११ दिवस मोफत दाढी-कटिंग करण्याचा अभिनव उपक्रम २०१७ पासून सुरु केला आहे. या उपक्रमाचा आत्तापर्यंत ११० कुटुंबांनी लाभ घेतला आहे. तसेच ‘एक घर एक झाड !’ उपक्रम सुरु करुन ‘पर्यावरण रक्षण व संवर्धन’ कार्याला हातभार लावतो आहे. ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर चालू असलेल्या ‘जल साक्षरता अभियाना’च्या कार्यात श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्याची कार्यक्षेत्रावर जावून बांधावर मोफत दाढी-कटिंग करण्याचे कार्य अलीकडे हाती घेतले आहे.
आपला फाटका संसार सांभाळून समाज बांधवांना शाश्वत असा भक्तिमार्ग दाखवून ‘रंजले गांजल्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा !’असा सेवासंदेश देणाऱ्या संत सेना महाराज यांची पुण्यतिथी ‘जिल्हा शासकीय ( घाटी ) रुग्णालय, औरंगाबाद मध्ये साजरी करुन गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांना महाप्रसादाचे दानाचे पवित्र कार्य करतो आहे.
देशासाठी आपले घर-संसार दूरदेशी सोडून डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करणारे आपल्या देशाचे नौजवान सैनिक व त्यांची राष्ट्रसेवा हा सुमितच्या मनातील हळवा कोपरा. देशाच्या सैनिकांबद्दल त्याला नितांत आदर ! अशा आजी-माजी सैनिकांची चांदीच्या वस्त-याने मोफत दाढी-कटिंग करुन त्यांचा गौरव करुन त्यांच्या देशवासियांसाठी असलेल्या त्याग व ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करतो आहे. ‘सैनिकांची दाढी-कटिंगरुपी सेवा करताना मनाला असीम समाधान व आनंद मिळतो’ असे सुमित म्हणतो.
सध्याच्या संगणक , मोबाईल, लॅपटॉप व डिजिटल माध्यमाच्या बाउगर्दीत विद्यार्थी तसेच पालक यांचे वाचन कमी झाले असे सर्वच साहित्यिक, विचारवंत व तत्वज्ञ यांचे मत झाले आहे. सुमितने यावर उपाय म्हणून एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. त्याच्या केश कर्तनालयात केस कापण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा ‘वेटिंग’मध्ये जाणारा वेळ सत्कारणी लावावा व त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती वाढावी म्हणून आपल्या दुकानात वाचनालय सुरु केले आहे. दुकानात वर्तमान पत्र, मासिके, चरित्र ग्रंथ,आत्मचरित्र, प्रवास वर्णन, कादंबरी, इ. वाचनीय साहित्य दुकानात उपलब्ध करुन देणारे ‘माणुसकी सलुन जटवाडा रोड सारा वैभव येथील दुकान वाचनालय’ कदाचित महाराष्ट्र नव्हे तर भारतात एकमेव असावे. कटिंगसाठीचा आपला नंबर येईपर्यंत आपला अमूल्य वेळ ग्राहकांनी आपल्या आवडीच्या साहित्यकृती वाचनात घालवावा असे त्याला वाटते.
‘कोविड १९’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात निर्माण झालेले ‘कोरोना’ आजाराच्या थैमानामुळे केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केले.’स्वत:च्या सुरक्षेसाठी घरातच रहा’ अनिवार्य झाल्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील मजूर, कामगार बेरोजगार झाले. कामातून साठवलेली छोटीशी पुंजी काही दिवसाच संपल्यामुळे व रोजगार पुन्हा केव्हा सुरु होईल याची शाश्वत्ती नसल्यामुळे दैनंदिन मजुरी करुन हातावर पोट भरुन जगणाऱ्या मजुरांनी ‘गड्या आपला गाव बरा !’ मानून महाराष्ट्रातील महानगरांमध्ये कष्ट करणाऱ्या परराज्यातील मजुरांनी आपल्या गावी पोहचण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे पायी प्रवास सुरु केला. ‘पोटात भुकेची आग, वरुन सूर्याची जीवघेणी उष्णता व पायाखाली तापलेला रस्ता’ अशा अवस्थेत अन्न, पाण्यावाचून उपाशी पोटी प्रवास करणाऱ्या या मजुरांचे हाल पाहून सुमित व त्याच्या सहकाऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि त्यांनी अनेक दानशूर व आर्थिक सक्षम असलेल्या घटकांना हाताशी घरून या मजुरांना यथाशक्ती मदतीचे सेवाछत्र सुरु केले. त्यांना अन्न, पाणी, अत्यावश्यक औषधे, चप्पल, लहान मुलांसाठी दूध, खाऊ तसेच थोड्या प्रमाणात रोख पैसे अशा आवश्यक गोष्टींची मदत केली. यामुळे या मजुरांचा प्रवास सुसह्य झाला असे नाही म्हणता येणार पण त्यांना थोड़ा दिलासा मिळाला व त्यांच्या पुढील प्रवासासाठी हुरुप आला असेल.’किसी कफन को जेब नही होती !’ जे वचनानुसार ‘कमवाल ते शेवटच्या प्रवासाला निघण्यापूर्वी इथेच ठेवून जायचे आहे,’ तर त्याचा गरजवंत समाजासाठी उपयोग करा. असा संदेश सक्षम घटकांना देवून त्यांच्या सहकार्याने हे काम करतो आहे. समाजाला देण्यासाठी माझ्याकडे माझे स्वतःचे असे काहीच नाही. माझ्या व्यवसायातील सेवा व समाज माध्यमाकडून जे उपलब्ध होईल ते गरजवंतांपर्यंत पोहचवण्याचा एक दुवा म्हणून प्रयत्न करतो आहे. ‘जे जे आहे आपणापाशी, ते ते वाटावे सकलांशी।’ या सुवचनाप्रमाणे सेवा करतो आहे.
सुमितचे वय २७ वर्षे. सेवा कार्यकाळ ८ वर्षे. आणि सेवाकार्याबद्दल मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ७०.( हा लेख लिहीपर्यंत ) सुमितच्या सेवाकार्याची महाराष्ट्रातील मुंबई,नाशिक, पुणे, सोलापूर, परभणी, जळगाव, औरंगाबाद येथील अनेक सेवाभावी संस्था, प्रसार माध्यमे यांनी दखल घेवून त्याचा सन्मान केला आहे.जनकल्याण समीतीतर्फे देन्ययात येनारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार रोख रक्कम ४१००० पन सुमितला मीळाला आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आबेंडकर समाजभुषण पुरस्कार,गाडगेबाबा सभाजभुष पुरस्कार,’युवा गौरव पुरस्कार’, ‘अभिनव कार्य गौरव पुरस्कार’, ‘सेवा गौरव पुरस्कार’, ‘समाज भूषण पुरस्कार’, ‘कार्यभूषण पुरस्कार’, ‘भूमीपुत्र-भूमीकन्या पुरस्कार’, ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी सुमितला ‘सन्मान पत्र व रोख रक्कम देवून पुरस्कारीत करुन त्याचा व त्याच्या ‘माणुसकी ग्रुप’ व ‘सु-लक्ष्मी सेवा संस्था’ या संस्थांच्या सेवाकार्याचा उचित सन्मान व गौरव केला आहे.
‘पुरस्कार हा पुरस्कारच असतो !’ तो छोटा मोठा कधीच नसतो, मात्र पुरस्काराच्या निमित्ताने पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या कार्याचा समाजात प्रचार व प्रसार होवून त्याद्वारे समाज घटकांनी अशा कार्यातून प्रेरणा घेवून त्यासारखेच कार्य हाती घेतले तर तेच पुरस्काराचे फलित व यश असते. पुरस्काराकडे मी याच दृष्टीकोनातून पाहतो असे सुमित म्हणतो. सुमितच्या सेवाकार्याचा प्रसार मराठवाड्याबरोबरच विदर्भ, खानदेशात झाला असून तेथील अनेक तरुणांनी त्याच्या कार्यातून प्रेरणा घेवून आपापल्या क्षेत्रात ‘माणुसकी ग्रुप’ची स्थापना करुन सुमितच्या ‘आरोग्य सेवा, महिला सबलीकरण, शैक्षणिक, पर्यावरण रक्षण व संवर्धन, दुर्बल घटक पुनर्वसन’ अशा समाजकार्याचा वसा हाती घेतला आणि हेच सुमितच्या कार्याचे यश व फलित आहे. त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !
‘सुमित खऱ्या अर्थाने समाजातील युवकांचे प्रेरणास्थान आहे !’

लेखक श्री अर्जुन वेलजाळी, नाशिक – ९०४९५२२२४०

 
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close