Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

पेंगुळल्या उन्हातली तरतरीत माणसे

पेंगुळल्या उन्हातली तरतरीत माणसे

तू गावात पोहचशील तेव्हा टळटळीत दुपार झालेली असेल. डांबरी रस्ता तापूनतापून बुटांचे ठस्से उमटतील इतका वितळून गेला असेल. अशावेळी बस स्टँडवरच्या बाभळीदेखील सावलीच्या शोधात असतील. लाँड्रीशॉपचे शटर अर्ध खाली ओढून योगेश जाधव थोडासा कलला असेल. त्याच्या दुकानातल्या गाडगे महाराजांच्या तसबिरीवर आता ऊन असेल. तिथ कोळसे काढून ठेवलेल्या पण थंड न झालेल्या इस्त्रीखाली तांबूस पडलेले, किंचित जळालेले पिवळट पांढरे कापड असेल. काही विझवून टाकलेले कोळसे, थोडीसी सर्वत्र पसरू पाहणारी राख, काही इस्त्री केलेले एकावर एक ठेवलेले कपडे इतकं साहित्य आणि आपल सहा फुटाच शरीर शहाबादी फरशीवर निद्रादेवीच्या अधीन करणारा योगेश जाधव. त्याच्या स्वप्नात कदाचित दिवाळीला धंदा वाढून जास्त पैसे कमावण्याचे स्वप्न असेल.

समोरच्या चहाच्या टपरीवर काहीच काम न करणाऱ्या लोकांच एक टोळक बसलेल असेल. यातला प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. ते सर्व नाइलाजाने सोबत आहेत. पण त्यातला कुणीच कुणासोबत नाहीये. काहीही कामधंदा न करता दिवस मावळेपर्यंत इथे बस स्टँडच्या परिसरात नुसत बसून राहणे ही एक साधनाच आहे.

सकाळी लवकर उठून अंघोळपाणी करून घ्यायची. चहापाणी झाले की जेवण बनायची वाट पाहायची. मग बायकोसोबत दोनतीन भाकरी असेल त्या भाजीसोबत दणकन खायच्या. मग बायको दुपारचे जेवण घेऊन कामावर जाणार. आता हा उरलेला दिवस ह्या देवमाणसाला खायला उठणार. मग हा गडी रमाई आवास योजनेत भेटलेल्या घराला कडी घालून, बकरी छप्पराच्या खुंटीला बांधून तिच्याजवळ थोडासा घास आणि पुरेसे पाणी ठेवून निवांत पायांनी रमतगमत भेटणाऱ्या प्रत्येकाला नमस्कारचमत्कार करत बस स्टँड गाठणार.

आता कदाचित दुपारचे बारा वाजत असतील. तलाठी कार्यालयात बरचीशी लगबग असेल. चहाच्या टपरीवर पुरेशी गर्दी. पान टपरीवर बार खावून जगावर थुंकणारे देसाड तरुण. अशावेळी हा संन्यस्त पुरुष चहाच्या टपरीवर पेपर चाळत बसून राहील. दोन चार शहाणी माणसे चहा प्यायला येऊन बसली की त्यातल्या एखाद्या बऱ्यापैकी ओळख असणाऱ्या माणसाला हा बैरागी मोठ्या प्रेमाने आणि शक्य तितक्या मोठ्या आवाजात रामराम घालीन. हे रामराम घालणे आणि चहाचे कप त्यांच्या हातात येणे ही वेळ त्याने अचूक साधली असेल. म्हणजे चहा पाजणारा माणूस आणखी एक चहा संन्यस्त पुरुषासाठी मागवीन आणि याची तलप एखाद्या तासासाठी भागून जाईन. पुन्हा नवीन येणाऱ्या गिऱ्हाईकांची याची ओशाळ नजर वाट पाहत राहीन.

हे अस बोगस आयुष्य तुला नकोस वाटेल, पण कोण कशाला उगाच आठदहा तास काम करीन. आपल्याला लागतं तरी काय? दोन वेळ भाकर. चारपाच वेळेस चहा. थोडी फार तंबाखू. या सगळ्यांचा जुगाड थोडी फार फुटकळ कामे करून होऊन जातो. मग कशाला दररोज कुणाची चाकरी करायची? फक्त रोज संध्याकाळी बायकोच्या शिव्या खाव्या लागतात. पण स्तुती किंवा निंदेने विचलित होणे हे या वैरागी वयस्काचे लक्षण नाहीच आणि जोपर्यंत आपण स्वत:ला नालायक समजत नाही, तोपर्यंत आपण नालायक होत नाही.   

गावात बस स्टँड आहे, पण त्याला बस स्टँड म्हणावे असे तिथे काहीही नाही. रात्री जिल्ह्याच्या ठिकाणावरून येणारी एक बस मुक्कामाला थांबते आणि दिवसभरात दोनतीन बस तालुक्याच्या गावाला जातातयेतात. एरवी काही रिक्षा महामार्गापासून गावापर्यंत प्रवाशांची ने-आण करतात, म्हणून याला बस स्टँड म्हणायचे.

तिथ एक मोठी पुरातन बाभूळ आहे. तिथ एक जगातला पहिला वाटावा इतका जुनाट पूल आहे. तिथ तुम्ही वाहनांची वाट पाहत बसू शकता. त्याच्या शेजारी एखाददोन टपऱ्या. एक दोन किराणा दुकाने. एखादे खताचे दुकान. जवळच ग्रामपंचायत कार्यालय. त्याला चिकटून बामनाचे कुणीच राहत नसलेले घर. काही बाभळी, काही कडूलिंब. काही मोकाट जनावरे. खूप सारी धूळ आणि बरीचशी माती. जीव भंडावून टाकणारा कंटाळा, बरचस रिकामपण, खूप सारी स्तब्धता, न सरणारा काळ, अजिबात न बदलणारी माणसे, वडाच्या झाडाखालचा गारवा आणि मन उदास करून टाकणारे ऊन. हे आपल्या जगण्यातला उन्हाळा वाढणार आहे याची जाणीव करून देत राहतात.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही विशेष किंवा ठळक गोष्टी नाहीत. वडाच्यासमोर रस्त्याच्या पलीकडे एक टेलरचे दुकान, एक मोटार रिवांयडिगवाला, स्वस्त धान्याचे दुकान, एखाददोन सलून. बस इतकीच बाजारपेठ. हीच मनोरंजनाची मुख्य साधने. खरतर या मनोरंजनात आनंद मानणारी ही माणसेच अधिक मनोरंजक. कारण की एवढ्याशा जगातही आनंदी राहण्याचे कौशल्य त्यांनी शोधून काढले आहे. खिशात एकही रुपया नसताना दिवसभर राजेशाही थाटात फिरणे सोपे नाही. मारवाड्याच्या दुकानाजवळ त्या भल्या मोठ्या वडाची प्रचंड सावली आहे, तिथ चहावाला चारसहा खुर्च्या आणि एक पेपर ठेवून देतो. इतक्याशा भांडवलावर ही रिकामटेकडी माणसे अख्खा दिवस धकवून नेतात आणि त्यांच्या असण्याने चहाच्या टपरीवरही वर्दळ जाणवत राहते. काहीही काम न करता ही माणसे दिवसभर प्रसन्न राहतात. कोणत्याही कंटाळ्याला ही माणसे मोठया धीराने तोंड देतात.

खर तर ही पेंगुळल्या उन्हातली तरतरीत माणसांची जमात आहे. जगातला सगळा कोडगेपणा ही माणसे कोळून प्याली आहेत. ही जमात संख्येने कमी असली तरीही ह्या दिव्यांनीच सगळ्या गावात उजेड केला आहे. झाकून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा बोभाटा झाला आहे. इथ बसून दिवसभर काहीच काम न करणारा माणूस पंतप्रधानांनी नेमक काय करायला हवं, हे अगदी चपखल सांगतो किंवा जगातल्या कोणत्याही महत्वाच्या घडामोडीवर तो अभ्यासू मत व्यक्त करू शकतो.

यातल्या काही लोकांचा शब्दकोडी सोडवण्यात हातखंडा आहे. काही मटक्याचे आकडे सांगण्यात तज्ज्ञ आहेत. ‘सगळ्याच गोष्टी निरर्थक आहेत’ असा काही जाणकारांचा अभ्यास आहे. आणि ‘काहीही केले तरी कशातच काही अर्थ नसतो’ हे आत्मविश्वासाने सांगायला ही रिकामटेकडी माणसे सदैव तत्पर आहेत.  

यातले काही फक्त बाजूला बसून एखाद्या अभ्यासू माणसाप्रमाणे रम्मीचा डाव पाहत राहतात. खेळणाऱ्या माणसांना सुट्टे पैसे, नवे कॅट, बिड्याका‌डया, चहापाणी आणून देतात आणि एखाददोन बिड्या आणि एक कप चहात ताजेतवाने राहतात. नेमक्या याच वेळेला यांच्या बायका रानावनात राबत असतात. घरी बांधून ठेवलेल्या बकरीला पाणी दिले असेल का चिंतेने त्रस्त होतात. पण हे भिडू लोक सुखदु:खाच्या पुढे गेले आहेत. एका संन्यासाचे सर्व गुण त्यांच्यात ठासून भरले आहेत. ‘तुझ्यासारखा मटक्याचा आकडा कुणी लावू शकत नाही’ अस कुणी म्हणाले तरी अंहकार त्यांच्या मनाला शिवणार नाही आणि संध्याकाळी बायको कामावरून घरी आल्यावर ‘जाळ झाला ह्या भाड्याचा’ असं म्हणाली तरी ते अपराधी दिसणार नाहीत. 

हे गाव अद्भूत लोकांनी भरलेले आहे. शहाणी माणसे इथे वेडी होऊ शकतात आणि वेड्यांना ठार वेड करण्याच कौशल्य गावच्या रक्तातच आहे…!

अरुण टिंगोटे
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close