Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

स्वयंअध्ययन एक प्रभावी शिक्षण पद्धती

स्वयंअध्ययन ही अशी प्रत्यक्ष शिक्षणपद्धती आहे की जिथे विद्यार्थी वर्गाबाहेर कोणत्याही पर्यवेक्षणाशिवाय तोच त्याच्या अभ्यासाचे नियोजन व नियंत्रण करीत स्वत: शिकत असतो.

त्यादृष्टीने आज लाॅकडाऊनच्या काळात स्वयंअध्ययनाची नितांत गरज भासल्याविना राहणार नाही.

स्वयंअध्ययनाचे महत्त्व

विद्यार्थी स्वत:च,स्वत:चे शिक्षण विषयक अनुभव घेतो
वर्गाध्यापनाच्या पलीकडे जाऊन शिक्षकाविना स्वत: अनुभवांच्या आधारे शिकत असतो.
आपणांस आवडणाऱ्या विषयांवर घटकांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी निरनिराळी कौशल्ये हस्तगत करून स्वयंमूल्यमापन करत शकतो.

स्वयंअध्ययनाचे फायदे

मुलांना यातून परिणामकारक अध्ययनाची सवय लागते.एखाद्या घटाकवर सखोल विचार करण्याची सवय अंगवळणी पडून स्मरणशक्ती व आकलनक्षमता वाढते. बहुविध अध्ययन कौशल्ये विकसित होऊन प्रत्येक आव्हानात्मक समस्येला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते.
प्रत्येक विषयाच्या पाठ्यांश घटकांकडे शोधात्मक नजरेने पाहण्याची सवय लागते.
स्वयंअध्ययनातून आत्मविश्वास व स्वतंत्रपणे आव्हाने स्वीकारण्याची विद्यार्थ्यांची तयारी होत जाते.
तो स्वत:स्वत:च्या घरात अभ्यास करत असतो त्यामुळे ताणतणाव विरहित ,वैफल्याशिवाय ,चिंता काळजी व निराशेशिवाय मुक्तपणे शिकत असतो. शिकलेले जतन करीत असतो.व यातूनच शिकणे ही प्रक्रिया परिणामकारक होत जाते.दृढ होते.

ऑनलाइन शिक्षण आज अचानक सर्वांच्याच मानेवर येऊन बसेल असं कधी वाटलं की नसेल.कारण आज अनेकजण अनेक पद्धतीने मुलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असताना अनेक अडचणीना तोंड देणं भाग पडतंय !

विशेषतः स्मार्ट मोबाईल ,टॅब,संगणक , वीज इंटरनेट ,रेंज ,पॅक आर्थिक तरतूद वेळ जागा तांत्रिक कौशल्ये असलेले शिक्षक पालक विद्यार्थी अशी अनेक बाबींवर मात करत शाळा बंद शिक्षण चालूच !

आजची पिढी गाईड, कोचिंग क्लास , किंवा वर्गमित्रांच्या रेडिमेड वह्या वापरून अभ्यास करतात पण यात  स्वयंअध्ययन अभावानेच आढळते.

पाठ्यपुस्तकातही स्वाध्याय असतात मुले गृहपाठ लिहितात परंतु त्यांची उत्तरे बाजारातील मार्गदर्शकात सहज मिळू शकतात यात केवळ नक्क्ल केली जाते स्वयंअध्ययन कमीच !

 अभ्यासासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच अनेक विषयांचा अभ्यास करणे.ते स्वयंअध्ययन !

यात कोणाच्या नोट्सची नक्कल न करणे ,गाईडच्या वापर न करणे उलट आपलाच अभ्यास आपण स्वत: करणे

सध्या पाठ्यपुस्तकात स्वयं अध्ययनासाठी फारच मर्यादित पाठ असतात तेही शिकवले जातात किंवा गाईडमध्ये याची साचेबंध उत्तरे असतातच .ती मुले उतरून काढतात.

स्वयंअध्ययनात पहिल्यांदा वेळ खाऊ वाटते पण एकदा जमले की स्वयंअध्ययनाचे फायदेच होतात.अभ्यासक्रमात आकलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वयं अध्ययनात आकलनशक्ती वाढून आशयसमृद्धी होण्यास मदत तर होतेच पण स्वयंअभिव्यक्ती व वैचारिक क्षमता वाढण्यास मदत होते.
परीक्षेपूर्वी केवळ पोपटपंची करून पाठांतर किंवा घोकंपट्टी करून घोका आणि ओका पद्धतीने उत्तरे लिहिण्यापेक्षा आकलनाच्या आधारे लिहिलेली उत्तरे कधीही चांगलीच त्यासाठी हवे स्वयंअध्ययन !

स्वयंअध्ययन नियोजन

अध्यापनपूर्व अध्ययन

उद्या कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे हे शिक्षकाने अगोदर मुलांना सांगावे .घरी मुलांनी वाचन करणे, न समजलेल्या संकल्पना संबोध वर्गात शिक्षकांना विचारणे, शंका निरसन करणे, यावर वर्गात चर्चा घडवून आणणे .

पुनरावृत्ती अध्ययन

शिक्षक वर्गात शिकवतात होमवर्क स्वाध्याय देतात त्यात विविधता असावी व ते स्वयंअध्ययनावर,आकलनावर आधारित असावेत मुलांनी घरी पाठाचे पुनरावलोकन करून असे स्वाध्याय करावेत.

लेखन वाचन स्वयंअध्ययन

काही मुले केवळ आवडीने वाचन करतात तर काही लेखनात विशेष रस असल्याने वाचनाचा कंटाळा करतात अशा वेळी लेखनाचा सराव नसेल तर परीक्षेत लेखनाची योग्य गती साधता न आल्याने मुलांचे प्रश्न कृती सोडवताना वेळेचे गणित न जमल्याने उत्तरे लिहिणे राहून जातात.व गुण कमी मिळतात.
अशा वेळी अभ्यासाची रचनाच अशी असावी की मुलांनी हा भाग वाचावा व त्यांवर उत्तरे लिहावीत की जेणेकरून लेखन वाचनाचा नेहमी सराव होत राहील.

पुनरावृत्ती अध्ययन

सप्ताहात एक दिवस असा ठेवता येईल की ठरावीक अभ्यास उदा. पाठ प्रकरणे घरी अभ्यासास देऊन मुलांनी व शिक्षकांनी विविध प्रश्नांवर वर्गात चर्चा करावी लेखी तोंडी असे वेळेनुसार मूल्यमापनही करता येईल.

स्वयंमूल्यमापन चाचणी

यात मोठे वर्गआठवी ते दहावीची मुले कृतिपत्रिकेचा ,प्रश्नपत्रिकेचा आराखडा दिला तर छोट्या गुणांची अल्प कालावधीसाठी प्रश्नपत्रिका किंवा कृतिपत्रिका काढू शकतात व लहान वर्गांसाठी शिक्षकाने काढावी .

मुलांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका इतर मुलांना सोडवाव्यात देऊन नंतर मुलांकडूनच तपासून घेता येतील. अशा चाचण्या वस्तुनिष्ठ असाव्यात आतून आत्मपरीक्षण व स्वयंमूल्यमापनाची सवय लागेल योग्य नियोजन केल्यास हे शक्य होऊ शकेल.

आदर्श उत्तरसूची लेखन

वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलांनीच दिलेल्या प्रश्नपत्रिका किंवा कृतिपत्रिकेची नमुना उत्तर सूची तयार करणे यात बिनचूक व योग्य उत्तरे कशी असावीत याचा हा वस्तुपाठ असेल ही उत्तरे शिक्षक व विद्यार्थी यांच्या साहाय्याने तपासली जावीत व जास्तीत जास्त बिनचूक उत्तर कसे असावे याचे गुणदान माहिती होऊन याविषयीचा आत्मविश्वास मुलांमध्ये निश्चितच वाढीस लागेल.

फावल्यावेळेतली चर्चा

आज प्रत्येक घरात शिकलेले आई बाबा पालक भाऊ बहीण आजी आऊ किंवा नातेवाईक मित्र वगैरे.असतातच तरी पण
याला ग्रामीण भागात अपवाद ही असू शकतो पण घरच्यांनीच मुलांना फावल्या वेळेत प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा जेवण करताना , मोकळा वेळ असताना ,न आवडणारा टिव्ही कार्यक्रम असेल तेव्हा खास रविवारी सुट्टी असेल तेव्हा , सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांनी केलेल्या अभ्यासावर प्रश्न उत्तर या स्वरूपात चर्चा केली तर त्यामुळे एकमेकातील ताणतणाव कमी होतील व स्वयंअध्ययनात मदत मिळेल आणि स्पर्धापरीक्षेची यातून सहज तयारी करता येईल.
पालकांनी यात वेळ देऊन सहभाग वाढवला तर नंतर मुलेच अशा चर्चा करण्यास पालकांकडे आग्रह धरतील .

स्वयंअध्ययन अभ्यासक्रम

 पुढील काळात अभ्यासक्रमात स्वयंअध्ययनास निश्चितच वेगळे स्थान द्यावे लागेल मुलांवर व पालकांवर ही खास जबाबदारी म्हणून हा अभ्यासक्रम असावा.

 स्वयंअध्ययनात ऑनलाइन कोणती दृक् व्याख्याने मुलांनी ऐकायची ती शिक्षकांनी स्वत:तयार केलेली असावीत.

काही श्राव्य व्याख्याने रेडिओ व शिक्षकांनी किंवा पाठाखाली स्वयंअध्ययनासाठी दिली जावीत व त्यावर आधारित मूल्यमापन असावे जेणेकरून मुले ऐकणे आकलनयुक्त श्रवण व त्यानंतर लेखन किंवा मौखिक अभिव्यक्ती असे मूल्यमापनाचे स्वरूप असावे.
ऑडिओ व्हिडिओ डाउनलोड मुद्रित आणि तयार केलेली अध्ययन सामग्री यात उपलब्धतेनुसार वापरता येईल.सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जावा.

 अशा प्रकारचा अभ्यासक्रम इयत्ता आठवीपासून करण्यात काही हरकत नाही.जेणे करून मुले पुढील शिक्षणासाठी स्वत: शिकण्यासाठी तयार होतील.यासाठी काही विशिष्ट दिशानिर्देश निश्चित करावे लागतील 

स्वयं अध्ययनाचा निश्चित अभ्यासक्रम ठरवणे.ज्याद्वारे विद्यार्थी स्वत:व पालकांच्या मदतीने शिकू शकतील.
वर्ग इयत्ता यानुसार संदर्भ निश्चित करूनच मागील इयत्तेचे पूर्वज्ञान समोर ठेवून पुढील वर्गाचा अभ्यास उच्चीकृत करून तयार करावा.
विद्यार्थ्यांचा वयोगट इयता व अनुभवांशी निगडित स्वयंअध्ययनाची रचना असावी.
स्वयंअध्ययन स्वमत अभिव्यक्ती वस्तुनिष्ठ रचनात्मक सामान्यज्ञानात्मक उपक्रम प्रकल्प व संशोधन पर असावेत.
पाठांतरापेक्षा अनुभवात्मक ,व्यवहारी ,कृतिप्रधान अशा प्रकारे आकलन कौशल्यांवर यात भर असावा
स्वयंअध्ययनात स्वयंनिर्मितीला विशेष स्थान असावे .
आजच्या काळाचाच नव्हे तर भविष्यातील विचार करता स्वयंअध्ययन ही एक प्रभावी अध्ययन पद्धती ठरू शकेल .

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

काकासाहेब वाळुंंजकर
तज्ञ मार्गदर्शक , माजी प्राचार्य ,
रयत शिक्षण संस्था , नगर .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close