Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणब्लॉग्ज

शाळा सुरु होणार…!कशी वाचा सविस्तर बातमी

शाळा सुरु होणार…!
सर्वसाधारणपणे दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. मात्र यावर्षी राज्यातील शाळा केव्हा व कोणत्या निर्बंधासह नियमांसह सुरू केल्या जाव्यात, याबाबत निर्णय घेणे अत्यंत आवश्यक झाल्याने शाळा सुरु झाल्या नाहीत तरी शिक्षण व शैक्षणिक वर्ष मात्र वेळेवर सुरू करणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित कसे ठेवावे, शैक्षणिक वर्ष व शिक्षण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने 15 जूनपासून सुरू झाले पाहिजे, याबाबत शासनाने पुढील नियोजन केले.
राज्यातील काही भागात विशेषतः ग्रामीण व आदिवासी विकास क्षेत्रात तसेच कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त क्षेत्रात शिथिलता आणली जाऊ शकते किंवा तेथे असलेले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, त्यामुळे शैक्षणिक वर्ष हे सुरू करता येईल, यावर विचारविनिमय झाला.


राज्यात शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहायित शाळांचं ग्रामीण भागातील प्रमाण खूप मोठे आहे. राज्यातील विविध जिल्हे व महानगरपालिका क्षेत्र वेगवेगळया श्रेणीमध्ये सूचित केलेले असतील व त्यानुसार लॉकडाऊन विषयी निर्बंध वेगवेगळे असतील तसेच राज्यातील शाळांची पटसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा, वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांसाठी जाणारे सत्र विद्यार्थ्यांसाठीची बसण्याची व्यवस्था स्वच्छतेच्या सुविधा त्यांना उपलब्ध प्रवासाची सुविधा इत्यादी बाबींमध्ये ही विविधता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू कराव्यात याबाबत शहानिशा स्थिती विचारात घेऊन जिल्हास्तरावर व ग्रामीण व शहरी स्तरावर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचे निर्णय घेणे संयुक्तिक ठरेल, याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याशिवाय शाळा केव्हा व कशा सुरू कराव्यात, याबाबत शिक्षण शिक्षण क्षेत्रातील काही नामवंत शिक्षण संस्थांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पालक इत्यादींशी सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून शाळा सुरू करण्याविषयी देण्यात येणाऱ्या सविस्तर सूचना, चर्चेमधील उपस्थित करण्यात आलेल्या सूचना यांचा एकत्रित विचार करून शाळा शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्याविषयी सविस्तर सूचनांचे परिपत्रक शासनाने निर्गमित केले आहे.
राज्यात करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.सन 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
• राज्यातील सर्व शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक विदर्भामध्ये 26 जून रोजी तर उर्वरित ठिकाणी 15 जून रोजी आयोजित करावी.
• या बैठकांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी करावयाची तयारी शाळेची व स्वच्छतागृहांची स्वच्छता शाळा सुरू केल्यानंतर घ्यावयाची दक्षता विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून करावयाचे नियोजन इत्यादीबाबत निर्णय घ्यावा.
• या बैठकीत स्थानिक परिस्थितीप्रमाणे प्रत्यक्ष सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून शाळेत किंवा किंवा व्हाट्सअपद्वारे आयोजित करावी.
• शाळेत क्वॉरंटाईन केंद्र किंवा निवारा केंद्र असल्यास ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा प्रशासनामार्फत त्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. तसेच ही शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे.
• शाळा व्यवस्थापन समितीच्या मुख्य शिफारशी तसेच तज्ञ व्यक्ती यांच्या शिफारशीनुसार कंटेनमेंट झोनमधील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी शाळा केव्हा सुरू कराव्यात, याबाबतचा निर्णय घ्यावा.
घरात राहून किंवा ऑनलाइन, डिजिटल किंवा ऑफलाईन शिक्षणाचे अपेक्षित नियोजन…
 भविष्यात वेगळ्या अध्ययन-अध्यापन पद्धतीचा अवलंब करताना यापुढे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक राहणार आहे.
 नेहमीची लेक्चर पद्धती टाळून मुलांनी स्वयंअध्ययन करावे व त्यानंतर त्यांच्या शंका व प्रश्नाचे निराकरण शिक्षकांनी करावे.
 डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या ई-लर्निंग शैक्षणिक सुविधेबाबतची माहिती दि.28 एप्रिल 2020 च्या शासन परिपत्रक अन्वये देण्यात आली आहे.
 त्या परिपत्रकातील सूचनांचे पालकांनी जास्तीत जास्त पालन करण्याबाबत प्रोत्साहित करावे.
 भविष्यामध्ये टीव्ही, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होणार आहे, त्याचाही मुलांनी वापर करावा.
कंटेनमेंट झोनमधील शाळा सुरू करणेबाबत…
 या क्षेत्रात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची कोणतीही निश्चित तारीख ठरविता येत नाही.
 स्थानिक व बदलत्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्यापूर्वी त्या त्या जिल्ह्याच्या कोविड-19 आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका क्षेत्रांसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरू कराव्यात, याबाबतचा निर्णय घ्यावा.
 डिजिटल माध्यमाचा वापर करून शासनाच्या ई-लर्निंग शैक्षणिक सुविधा याबाबतची माहिती दिनांक 28 एप्रिल 2020 च्या शासन परिपत्रक अन्वये देण्यात आली आहे.
 त्या परिपत्रकातील सूचनांचे पालकांनी जास्तीत जास्त पालन करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे.
भविष्यात शाळा प्रत्यक्षात सुरू करताना शाळा व्यवस्थापन समितीने विचार करावयाच्या बाबी…
 विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे याकरिता शाळा दोन सत्रांमध्ये सुरू करणे.
 एक सत्र जास्तीत जास्त तीन तासाचे असावे किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून अदलाबदलीने शाळेत यावे.
 प्रत्येक सत्राचा कालावधी व वेळापत्रक ठरवावे. उदाहरणार्थ सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत इत्यादी किंवा सोमवार, बुधवार व शुक्रवार वर्ग-1 व 2 तसेच मंगळवार, गुरुवार व शनिवार वर्ग 3 व 4 असे वर्ग सुरू करावेत.
 एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी किंवा एका वर्गात एक जास्तीत जास्त 20 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी.
 बैठक व्यवस्थेमध्ये किमान एक मीटर अंतर ठेवावे.
 शाळेच्या इमारतीत अतिरिक्त खोल्या असल्यास त्या स्वच्छ करून वापरण्याबाबत निर्णय घेण्यात यावा.
 शाळा स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात.
 विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ साबण व पाणी इत्यादी.
 खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या बाबतीत शाळांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे.
 बसेस, ऑटोमध्ये मुलांची गर्दी होऊ नये, यासाठी काय व्यवस्था करावी, हे शाळा व्यवस्थापन समितीने ठरवावे. उदाहरणार्थ मुलांनी शाळेत पायी किंवा सायकलने यावे किंवा पालकांनी त्यांना स्कूटर किंवा सायकलीने शाळेत जावे, अशा पर्यायाचा विचार करता येऊ शकतो.
 एक जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ज्याप्रमाणे मार्च-एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे योग्य ते नियोजन करून विद्यार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करावे.
 शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर पुढील कालावधीसाठी धान्य घरपोच द्यावे अथवा शाळेत आहार तयार करून द्यावा, याबाबत निर्णय घ्यावा.
 सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तांची शालेय वर्ष 2020-21 साठीची विषयनिहाय सर्व पाठ्यपुस्तके वाटप करण्याबाबतचे नियोजन करावे.
 भविष्यामध्ये करोना-19 रुग्ण आढळल्यास किंवा इतर कारणांमुळे शाळा बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही, यासाठी ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करावे.
 दि.15 जून, 26 जून पासून पुढील दोन आठवडे शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी.
 जे स्थलांतरित मजूर गावी परत गेले आहेत, त्यांच्या मुलांना गावातील शाळेत प्रवेश, पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे.
 घरात तयार केलेले मास्क वापरणे, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, ज्या ठिकाणी वारंवार हात लावले जातात उदा. दरवाजे, खिडक्या इत्यादींना स्पर्श न करणे.
 स्वच्छता व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही द्यावी.
 मुलांनी स्वतःची बॅग पुस्तके पाणी बॉटल पेन पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य शाळेत येताना बरोबर घेऊन येणेबाबत सूचना देण्यात याव्यात.
 शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये.
 शाळा व्यवस्थापन समितीने पालक-शिक्षक संघ यांच्याशी वरील सर्व बाबींसंदर्भात चर्चा करून शाळा सुरू करणे आणि अनुषंगिक बाबींची कार्यवाही करणे, याबाबतचे नियोजन करावे.
ग्रामपंचायतीची जबाबदारी..
• ग्रामपंचायतीने शाळेतील फर्निचर बाजूला करून फरशीची साबणाच्या पाण्याने साफसफाई करून घ्यावी.
• शाळेचे निर्जंतुकीकरण, वीज व पाणीपुरवठ्याची व इतर अनुषंगिक बाबींची जबाबदारी घ्यावी.
• बाहेरगावातून येणाऱ्या शिक्षकांची शाळेत येण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी अथवा त्यांनी करून घेतलेल्या वैद्यकीय तपासणीची खातरजमा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे करावी.
• एखाद्या शाळेतील सर्व शिक्षकांची करोनाच्या कामकाजासाठी सेवा अधिग्रहित केली असल्यास आणि ते शिक्षक शाळा सुरू होण्याच्या दिवशी शाळेत उपस्थित राहू न शकल्यास स्थानिक पातळीवर नियोजन करून शिक्षक उपलब्ध करून देण्याची सोय करावी किंवा स्थानिक अर्हताप्राप्त स्वयंसेवकांची मदत घ्यावी.
• विद्यार्थ्यांकरिता शाळांमध्ये साबण, पाणी, सॅनिटायझर या सुविधा पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीमधून पुरविण्याबाबतचा निर्णय घ्यावा.
• मनरेगा अंतर्गत निधी शाळेच्या स्वच्छतेकरिता वापरण्यात यावा.
• ग्रामपंचायतीने मुलांचे थर्मल स्क्रीनिंग, वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा.
पालकांची जबाबदारी…
 मुलांना घरातून मास्क घालून पाठविणे, पाण्याच्या बाटल्या देणे, हातरुमाल व छोट्या चटई देणे.
 मुलांना मास्कची सवय लावणे, तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे, हात साबणाने धुण्याची सवय लावणे, घरातील मोबाईल फोन आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकांच्या नजरेखालीच उपलब्ध करून द्यावेत.
 इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत घरातूनच अभ्यास करावा.
 पालकांनी पाल्य आजारी असल्यास आपल्या शाळेत पाठवू नये.
शिक्षकांची जबाबदारी…
 राज्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 हे विदर्भ वगळता 15 जून पासून सुरू होत असून विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 26 जून पासून सुरू होते.
 राज्यांमध्ये संचारबंदी सुरू झाल्यापासून ते उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यापासून बरेच शिक्षक स्वतःचे मुख्यालय सोडून स्वतःच्या मूळ गावी गेल्याचे निदर्शनास येत आहे.
 त्यामुळे अशा सर्व शिक्षकांनी स्थानिक प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहावे. जेणेकरून त्यांना दि. 15 जून व 26 जून रोजी त्यांच्या कार्यालयात शाळांमध्ये उपस्थित राहता येईल.
 तसेच जे शिक्षक या करोना काळात कामकाजासाठी कार्यरत आहेत, त्यांनी संबंधित प्रशासनाने कार्यमुक्त केल्यानंतर होमक्वॉरंटाईनची अट असल्यास त्याचे योग्य ते पालन करून आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह, (कार्यमुक्ती आदेश, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी) संबंधित शाळेत कामकाजासाठी उपस्थित राहावे. यासाठी उपलब्ध सार्वजनिक, खाजगी वाहन व्यवस्थेचा वापर करावा.
 शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून ऑनलाइन प्लॅटफॉर्म टीव्ही, रेडिओ, दीक्षा ॲप इत्यादींच्या मदतीने अध्ययन होण्यासाठी त्यांना मदत करावी. तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण होण्यासाठी पालकांनाही मार्गदर्शन करावे.
 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असल्याने त्यांना मोबाईल तसेच विविध संपर्क माध्यमांतून स्वाध्याय द्यावा तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करून अध्याय सुरू ठेवावे.
 ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात शंका, प्रश्न निर्माण होत असतील अशा विद्यार्थ्यांच्या शंकाचे, प्रश्नांचे फोनद्वारे किंवा इतर माध्यमांद्वारे निराकरण करावे.
 दि.15जून 2020 पर्यंत सर्व पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
 पाठ्यपुस्तकांचे वाटप पालकांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलावून व आवश्यक सुरक्षित अंतर ठेवून करावे.
 अपवादात्मक परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून तातडीने अशा विद्यार्थ्यांना गतवर्षीची पाठ्यपुस्तके संकलित करून देण्यात यावी तसेच नजीकच्या काळात या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात यावा.
 शिक्षकांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत या गावातच करावी.
डिजिटल शिक्षण…
• विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता घरी राहून डिजिटल पद्धतीने अभ्यास पुढील वेळेच्या मर्यादेतच व्हावा.
• पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये मात्र त्यांना टीव्हीवर, रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावे, ऐकवावे.
• इयत्ता 3 री ते 5 वी साठी कमाल एक तास प्रतिदिन, इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमाल दोन तास प्रतिदिन, इयत्ता नववी ते बारावी साठी कमाल तीन तास प्रतिदिन, डिजिटल अभियानामध्ये आवश्यकतेनुसार मोकळा वेळ देण्यात यावा.
• विद्यार्थ्यांचे सलग अध्ययन करून घेण्यात येऊ नये.
आरोग्य विभागाची जबाबदारी…
 आरोग्य विभागाने आवश्यकतेप्रमाणे शिक्षकांचे व मुलांचे थर्मल स्क्रीनिंग, वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठीचे नियोजन करावे.
 किमान पाच ते कमाल दहा शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यान्वित करावे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना सूचना…
 शाळेचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावा, सॅनिटायझर मार्ग व आवश्यक निर्जंतुकीकरण साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे तसेच पंधराव्या वित्त आयोग व ग्रामपंचायत निधी चा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.


 शालेय परिसरात व स्वच्छतागृहात पुरेशा प्रमाणात साबण व पाण्याची व्यवस्था करावी.
 महानगरपालिकांनी शक्यतो शहरात मुलांच्या शैक्षणिक फायद्यासाठी विविध ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच शक्यतो स्थानिक केबल टीव्ही नेटवर्कच्या/व्हर्च्युअल शाळांच्या मदतीने मुलांना घरी अभ्यासक्रम पाठवावा.
 आरोग्य विभागाच्या मदतीने करोना संसर्ग झालेल्या ठिकाणी सर्व मुलांची व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, विशेषतः मुख्यालयात न राहणारे आणि बाहेर गावातून येणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करावी.
 महानगरपालिकांनी अभ्यासक्रम प्री-लोड करून टॅब / एसडी कार्ड विद्यार्थ्यांना पुरविण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवावा.
 एखाद्या विद्यार्थ्यास किंवा शिक्षकास आजारपणाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करण्याची व्यवस्थाही करावी.
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 शैक्षणिक कॅलेंडर व अभ्यासक्रम याचा आराखडा सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात यावा.
 टाटा स्काय, जिओ यासारख्या खाजगी टीव्ही नेटवर्कच्या सहभागाने मुलांना शिक्षण देण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवावा.
राज्यामध्ये पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा,शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना गावांमध्ये कोणताही कोविड-19 रुग्ण आढळला नाही,याची खात्री करून पुढील वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात.
 इयत्ता नववी दहावी व बारावी- जुलै 2020 पासून, सहावी ते आठवी- ऑगस्ट 2020 पासून, तिसरी ते पाचवी- सप्टेंबर 2020 पासून, पहिली व दुसरी- शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा.टीव्ही, रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम त्यांना दाखविण्यासाठी ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे,इयत्ता अकरावी- इयत्ता दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर.
हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे व आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन करण्यात यावी.
संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीचे योग्य नियोजन करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण लवकरात लवकर सुरू कसे करता येईल, याबाबतची पूर्वतयारी करून घ्यावी तसेच शैक्षणिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.
शाळापूर्व तयारी पंधरवडा…
 शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करणे. (प्रत्यक्ष, ऑनलाइन, व्हाट्सअप, व्हीसी)
 स्थानिक पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे.
 पाठ्यपुस्तक वितरण.
 स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्याचे प्रयत्न, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था.
 गटागटाने पालकसभा घेऊन जनजागृती करणे. पालकांच्या मनातील भीती कमी करणे.
 बालरक्षक, शिक्षकांनी स्थलांतरित मजूरांची मुले, संभाव्य शाळाबाह्य होण्याची शक्यता असणारे विद्यार्थी यांच्या घरी भेटी देऊन शाळेत येण्याची मानसिकता तयार करणे.
 सरल / यू-डायस प्रणालीतील माहिती अद्ययावत करणे.
 विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करणे.
 ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कम्प्युटरची व्यवस्था करून सोय नसलेल्या मुलांसाठी ही मदत करणे.
 ग्रंथालयातील पुस्तकांचे अवांतर वाचन, श्रमदान, कविता लेखन करणे.
 गुगल क्लासरूम, वेबिनार, डिजिटल पद्धतीने शिक्षणाचे शिक्षकांचे पालकांचे सक्षमीकरण करणे.
 दीक्षा अॅप चा प्रचार आणि प्रसार.
 ई-कंटेन्ट निर्मिती.
 गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करणे.
 शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे.
 प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे.
 सायबर सुरक्षेविषयी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करणे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शिक्षणाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने शासनाने योजलेल्या उपाययोजना या लेखात नमूद केल्या आहेत. या लेखातील नमूद बाबी नागरिकांना, शिक्षकांना, संस्थाचालकांना निश्चितच दिशादर्शक ठरतील.

(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close