Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

वृक्षलागवडीच्या अनुभवांवरील विकास खारगे लिखित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी राज्यात सुरू करणार मोठी मोहीम मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

           मुंबई : वृक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच केले.  काल सायंकाळी ते वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या “एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग”  या पुस्तकाचे प्रकाशन करताना बोलत होते पर्यावरण रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आपण आरेचे ८०० एकरचे जंगल जपण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्यात वृक्षलागवड हा महत्वाचा विषय असून तो केवळ आवडीचा नाही तर  गरजेचा विषय झाला आहे. या वाटेवरून पुढे जातांना हे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकाशनासाठी  खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष सिंग, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जराड, श्री. खारगे यांच्या पत्नी  श्रीमती मिनाक्षी खारगे,मुले व्यंकटेश आणि मनिष खारगे, वन विभागातील अधिकारी अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाने आपल्याला त्याचे परिणाम- दुष्परिणाम दाखवले पण काही चांगल्या गोष्टी ही दाखवल्या. या काळात प्रदुषण कमी झाल्याने मोर रस्त्यावर नाचल्याचे आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे प्रत्येकाने प्रदुषण कमी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न करतांना वनवैभव जपायचे आणि वाढवायचे आहे.  जिथे आपण झाड लावू शकतो म्हणजे जिथे जागा आणि पाणी आहे तिथे वृक्ष लागवड झाली पाहिजे, पाण्याच्या टाक्या करून डोंगर उतारावर पळस- पंगारा सारखी नयनमनोहारी झाडे लावून  एक सुंदर व्हॅली निर्माण केली पाहिजे. यासाठी डोंगरावर जलसंधारणाची कामे हाती घेणे,वृक्षलागवडीची मोहिम जोमाने पुढे नेण्याची गरज आहे असे झाले तर डोंगरावर हिरवा शालू आपण निर्माण करू शकु असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विकास खारगे यांनी ते वन विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असतांना करण्यात आलेल्या महावृक्षलागवडीचा अनुभव आणि हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भुमिका विशद केली. ते म्हणाले की राज्याचे सध्याचे वनक्षेत्र २० टक्के आहे ते ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी अंदाजे ४०० कोटी वृक्ष लावणे आणि ते जगवणे आवश्यक आहे. एकट्या वन विभागाकडून हे काम होणे शक्य नसल्याने व्यापक लोकसहभाग मिळवत वन विभागाने वृक्षलागवडीचा महाप्रयोग हाती घेतला होता. यात पारदर्शकता जपतांना विविध प्रोत्साहनात्मक योजना राबविण्यात आल्याचेही ते म्हणाले. वन विभागाने  ६५ लाखांची हरित सेना निर्माण केली. कन्या वनसमद्धी योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत करतांना १० वृक्ष लावण्याचा संस्कार रुजवला. रानमळा पॅटर्नमधून जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष,स्मृती वृक्ष अशा पद्धतीने जीवनातील प्रत्येक सुखदु:खाचा प्रसंग  आणि त्या आठवणी वृक्ष लावून जपण्याचे आवाहन करण्यात आले. यात राज्य आणि केंद्र शासनाचे विविध विभाग, सामाजिक, स्वंयसेवी, अध्यात्मिक संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, प्रसार माध्यमे, लोकप्रतिनिधी अशा सर्वांचा सहभाग होता. काटेकोर नियोजन, पुर्वतयारी करत हरित महाराष्ट्राची ही चळवळ लोकचळवळीत रुपांतरीत करण्यात यश मिळाल्याचे व भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून या वृक्षलागवडीच्या फलनिष्पत्तीचे निष्कर्ष दिसून आल्याचेही ते म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close