अवैद्य धंदे चालकासह खेळणाऱ्या जुगारड्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमावत यांच्या धाडसी किरवाईने अनेकांचे धाबे दणाणले
उस्मानाबाद /प्रतिनिधी
औरंगाबाद परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्या आदेशानुसार उपविभाग केज येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी उस्मानाबाद शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या जुगारड्यांना जाग्यावरच रंगेहात पकडून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करून अनेक जुगारड्या विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या अवैध धंदे चालविणार्या व खेळणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या धेंडांची नावे असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकलेली आहे. मात्र काहीजण या कारवाईपासून वाचण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगली आहे. ही कारवाई दि.१३ मे रोजी करण्यात आली असून कोणाला अटक केली जाते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, कुमावत यांच्या धाडसी कारवाईमुळे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सुरू असलेल्या अवैद्य धंदे चालकांमध्ये खळबळ माजली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. उस्मानाबाद शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली असून छापे टाकून केलेल्या कारवाईमध्येउस्मानाबाद शहरातील मार्केट यार्ड सोलापूर रोड अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून ४ व्यक्तींना जागीच ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून नगदी ५६ हजार ६३० रुपये व ७८ हजार ८५० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३५ हजार ४८० रुपयांचा माल ताब्यात घेऊन ४ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर शिवाजी चौक दीपक फुल स्टॉल शेजारी चपने कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून ६ व्यक्तींना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी ८ हजार ८८० रुपये व ऑनलाईन जुगाराचे साहित्य ५० हजार ४०० रुपये असे एकूण ५९ हजार २८० रुपयांचा माल जप्त करून ६ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच हॉटेल नाज शेजारी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून २ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. व हॉटेल लजीज शेजारील ऑनलाईन जुगार अड्डयावर छापा मारून ५ आरोपींना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी ५ हजार ५०० रुपये व ५६ हजार ५०० रुपयांचे ऑनलाईन जुगाराचे साहित्य असा एकूण ६२ हजार रुपयांचा माल जप्त करून एकूण ७ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर नाज हॉटेल शेजारी पाथरूड गल्ली येथील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून ४ आरोपींना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नगदी १ हजार ६२५ रुपये व जुगाराचे ७० हजार रुपयांचे साहित्य असा एकूण ७१ हजार ६२५ रुपयांचा माल जप्त करून ४ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अडत लाईन समोरील समोरील टपरीमध्ये कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा मारून ३ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नगदी ८ हजार ७०० व मोबाईल किंमत १७ हजार रुपये असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करून ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच साईबाबा ट्रेडर्स येथे छापा मारून एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गोवा गुटख्याचा ५ लाख २९ हजार ४८२ रुपयांचा माल ताब्यात घेऊन ३ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व आनंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाई शॉपिंगमधील सूर्या बिर्याणी हाऊस या दुकानात बिंगो जुगार गेम खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून १३ जुगारड्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी २५ हजार ३७० रुपये व विंगो जुगाराचे साहित्य कॉम्प्यूटर, सीपीओ व मोबाईल असा एकूण २० हजार ५०९ रुपयांचे साहित्य असा एकूण २ लाख २६ हजार ८७० रुपयांचा माल जप्त करून एकूण १४ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर नितीन ऑनलाईन लॉटरी जुगारावर छापा मारून ६ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातून नगदी २ हजार ३० रुपय व ऑनलाइन जुगाराचे साहित्य १ लाख ८९ हजार असा एकूण १ लाख ९१ हजार ५३० रुपयांचा माल जप्त करून ८ व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून ७ जणांना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी२८ हजार ४० रुपये व साहित्य ८० हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ८ हजार ५४० रुपये जप्त करून एकूण १० व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर हरमन चहा टपरीच्या बाजूला मिलन नाईट जुगार अड्ड्यावर छापा मारून ३ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी ६ हजार ९०० रुपये, जुगाराचे साहित्य व मोबाईल १७ हजार रुपये असा एकूण २३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व एकंदरीत उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ७ ठिकाणी छापा मारून २६ आरोपींना जाग्यावरच पकडून त्यांच्या ताब्यातून माल जप्त करून एकूण २९ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. आनंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ ठिकाणी छापा मारून ९ लाख ९९ हजार ६७ रुपयांचा माल जप्त करुन २९ आरोपींना ताब्यात घेऊन ५ लाख ५० हजार १३० रुपयांचा माल जप्त करून अवैध धंदे चालकासह एकूण ३६ आरोपी विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे चालविणार्या व खेळणाऱ्यामध्ये खळबळ माजली असून कोणाकोणाला अटक केली जाणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांचे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात वाढलेले व फोफावत चाललेले अवैद्य धंदे रोखण्याच्या कारवाईकडे होणारे दुर्लक्ष हे शहर व जिल्हावासियांना विशेषतः तरुणाईला व्यसनाधीनते बरोबरच अधोगतीकडे नेणारे ठरत असल्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.