मी दिल्लीत आंदोलन करणारच- अण्णा हजारे

अहमदनगर | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यासोबतच आपण दिल्लीत जाऊन आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं होतं.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीष महाजन आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अण्णांची भेट घेत मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र आश्वासन नाही तर कृती करा, केंद्र सरकारने मान्य केलं आहे मात्र लागू केले तरच आंदोलन थांबवू नाहीतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील आंदोलनावर आपण ठाम असल्याचं अण्णांनी सांगितलं.
2018 आणि 2019 मध्ये आंदोलन केल्यावर पंतप्रधान कार्यालय आणि त्यावेळचे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिलं होतं परंतू त्याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आपण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आत्ता मागे काही दिवसांपुर्वीही गिरीष महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती. त्यावेळी चर्चेचा तपशील देवेंद्र फडणवीसांकडे पाठवू, असं महाजन म्हणाले होते. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झालं नसल्याचं दिसत आहे.