Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

बापा जरा धीर धर..!

बापा जरा धीर धर..!
गेल्या महिन्याभरापासून गावात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आमच्या घरापासून काही अंतरावर असलेलं धरणही फुटलं..माझ्या आजोबांच वय 82 वर्ष आहे माञ त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात इतका पाऊस बघितला नाही.धरण फुटण्याची घटना त्यांनी पहिल्यांदाच पाहिली. ‘1972 चा कोरडा दुष्काळ आणि 2021 चा हा ओला दुष्काळ हे दोनच दुष्काळ मी आयुष्यात पाहिले आहेत’ असं आजोबा सांगत होते. जे धरण फुटले, त्यात आमच्याच शेतातून पाणी जाते. यावरून तेथील परिस्थिती काय असु शकते याचा अंदाज होतो.
 माझा बाप रोज पहाटे पाचच्या आत उठतो आणि पहाटे पासून तर झोपेपर्यंत तो फक्त शेतात काम करतो आणि त्याला भक्कम साथ देती ती आमच्या घराची वाघिण…. माझी आई. दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शेतात काम करतात. या वर्षी एक एकर लाल कांदे लावले होते, ते कांदे दोन महिन्यांचे झाले, आता ते कांदे काढायला फक्त एक महिना बाकी होता त्यात मोठी ढगफुटी झाली आणि सर्व कांदे पाण्यात खराब झाले. या दोघांनीही कांद्यांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं… त्यावर हजारो रूपये खर्च केले आणि त्यांना चांगला भाव येईल अशी आशा या दोघांनी बाळगली होती.. माञ अतिवृष्टी झाली आणि त्यांचं स्वप्न ते स्वप्नच राहिले…
काही दिवसांपूर्वी गावी गेलो तेव्हा आपल्याला कांदे लावायचे आहेत असं बाबा म्हणाले पण रानात पाणी असल्याने आम्ही काही दिवस थांबलो. पावसाने थोडी सुट्टी घेतल्यावर मजूर लाऊन कांदे लावायला सुरुवात केली. ज्या दिवशी कांदे लावायला सुरुवात करणार होतो त्या राञी आई – बाबांना झोप होती की नाही माहीत नाही, माञ दोघेही भल्या पहाटे उठून आपले कामं आटोपून कांद्याच रोप उपटायला तयार झाले होते.  मी आणि माझी ताई देखील  त्यांच्या सोबत शेतात गेलो. आम्ही तरूण आहोत माञ त्या दोघांचं वय झालं असूनही सलग चार दिवस त्यांनी शेतात धावपळ केली.  मजुरांचे रोजगार जास्त होते आणि त्यांना सगळं वेळेवर द्याव लागायचं. बाबांनी त्यावर देखील हजारो रुपये खर्च केले. या सगळ्यात लागलेली मेहेनत बाजूलाच…माञ कांदे लावल्याचा तिसऱ्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि हे देखील कांदे पाण्यात वाहून गेले. या दोन एकरात कमीतकमी 200 पेक्षा अधिक क्विंटल कांदा निघाला असता. म्हणजे कमीतकमी दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झालं होतं.कांद्याचं झालं मात्र..अनेक वर्षानंतर दोन एकर सोयाबीन लावलं होतं त्यातही कमरे येवढे पाणी वाहत आहे. यासाठीही बाबांनी अनेक स्वप्न पहिली होती.  या ढगफुटीत आमचं तीन लाखांपेक्षा अधिक नुकसान झालं…. याची जाणीव असुनही माझे बाबा आणि आई अजूनही खंबीरपणे उभे आहेत याचा अभिमान वाटतो. 
ज्या दिवशी ढगफुटी झाली त्या दिवशी मला कॉलेजने फीस भरण्यासाठी प्रचंड आग्रह धरला. गावची परिस्थिती मला माहिती होती त्यामुळे बाबांकडे पैसे मागायला लाज वाटत होती…माञ इकडे पैसे भरणं गरजेचं होतं त्यामुळे मोठी हिंमत करून घरी फोन केला..काहीही करून कॉलेजची फिस भरावी लागेल असं मी त्यांना सांगितलं…जेव्हा मी फोन केला तेव्हा बाबा अक्षरशः शेतातून पाणी काढत होते. पण मला गरज आहे हे कळल्यावर शेतातच त्यांनी मला पैसे पाठवले…
 यावरून समजलं माझा बाप खरंच खूप खंबीर आहे, तो हरणार नाही, तो खचणार नाही, यापूर्वीही कधीही त्याने आम्हला कशाची कमतरता भासू दिली नाही आणि इथून पुढेही भासू देणार नाही…..माञ आताची परिस्थिती बघावली जातं नाहीये…वरून खंबीर वाटत असला तरी तोही माणूसच आहे… मनात प्रचंड वेदना आहेत, अश्रूही आहेत पण त्या बाहेर येणार नाहीत याची खात्री आहे…कारण “बाप आहे ना तो”….. कितीही दुःख असली तरी कुटुंब ढासळू नये म्हणून आपण खुश आहोत असंच तो दाखवतोय…फक्त माझीच बाबा नाहीत तर आज अनेकांची अशीच स्थिती आहे… देवा….! बसं झालं रे… बिचाऱ्या शेतकऱ्याची अजून किती परीक्षा बघणार? 
मुख्यमंत्र्यांनी पिंजऱ्यातून बाहेर यावं आणि थोडी फोटोग्राफी शेतातही करावी अशी अपेक्षा आहे…कारण आता आश्वासनं नकोशी झाली आहेत…आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना आणि मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्यांना ही परिस्थिती काय कळणार…तुम्हीही त्यातलेच म्हणा…पण एकदा शेतात येऊन बघा..जगाचा पोशिंदा आज ढसाढसा रडतोय… त्याला मदतीची गरज आहे, नुकसान भरपाईची गरज आहे..आता अधिक वेळ न दवडता ती आपण द्यावी….एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून इतकीच कळकळीची विनंती आहे..

.निर्घोष त्रिभुवन

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close