Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

करोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत अंगणवाडी सेविकांनी केलेले काम अतिशय कौतुकास्पद :पालकमंत्री कु. आदिती तटकरे

अलिबाग,जि.रायगड,दि.2:- करोनाच्या संकटकाळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून अंगणवाडी सेविकांनी केलेले काम निश्चितच अतिशय कौतुकास्पद आहे, स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून निष्ठेने, समर्पण भावनेने अंगणवाडी सेविका काम करतात. म्हणूनच अंगणवाडी सेविकांचाही कोविड योद्धा म्हणून गौरव होणे गरजेचे आहे.शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडीतूनच होतो. अंगणवाडी सेविका सुजाण, सुसंस्कारित पिढी घडविण्याचे काम करतात, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे केले.
श्रीवर्धन येथील ग.स. कातकर सभागृहात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील महिला बचतगट आणि अंगणवाडी सेविका यांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी उद्धव होळकर,दर्शन विचारे, ज्येष्ठ नेते मोहम्मद मेमन, नगराध्यक्ष फैसल हुरजूक, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचतगटाच्या सदस्या आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी, इतर अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांनी नि:स्पृह भावनेने करोना कालावधीमध्ये आपले काम पूर्ण केले. शासनाने दिलेल्या जबाबदारीचे योग्य रीतीने पालन करीत समाजाप्रती असलेल्या आपल्या दायित्वाचे आपल्या कार्यातून अंगणवाडी सेविकांनी एक आदर्श निर्माण केला आहे. करोना नियंत्रणासाठी शासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अंगणवाडी सेविकांची मोलाची मदत झाली. अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन विविध चाचण्या तर केल्याच त्यासोबत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठीही मोलाचे योगदान दिले.
महिला बचतगटांनी केलेल्या कामाची स्तुती करीत त्या पुढे म्हणाल्या, आजच्या काळामध्ये महिला सक्षम झाल्या पाहिजेत, महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्याच्या हेतूने सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांच्या विविध गरजा लक्षात घेऊन मी पालकमंत्री या नात्याने सदैव सकारात्मक पावले उचलली आहेत. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या हेतूने विविध छोटेखानी उद्योग पूरक वस्तूंचे वितरण व्यवस्था आपण निर्माण करीत आहोत. महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी प्राप्त झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, आपण सर्वांनी करोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्यासाठी लसीकरण मोहीम यशस्वी केली पाहिजे. लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला पाहिजे. महसूल विभागाच्या वतीने सर्वसामान्य शेतकऱ्याला नजरेसमोर ठेवून त्याला उच्च दर्जाची महसूल सेवा देण्याच्या हेतूने ई- सेवा सुरू केली आहे. महसूल विभागाने सुरू केलेल्या ई सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. श्रीवर्धन नगरपरिषदेने सर्व प्रभागात 100% लसीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी लसीकरण कॅम्प चे आयोजन केले आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करीत लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी उपस्थितांना केले.
मनोगत व्यक्त करताना महिला व बालविकास सभापती गीता जाधव म्हणाल्या की, महिला सबलीकरणाच्या उद्देशाने सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने आम्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांना उपयोगी पडतील अशा विविध वस्तूंचे वाटप केले असून आजच्या काळात महिला सबलीकरण ही समाजव्यवस्थेची गरज बनली आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य श्री.मंगेश कोबनाक यांनी केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close