पाणी टंचाई निवारणाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी केली शहरातील जुन्या विहिरींची पाहणी
रेल्वे स्टेशन आणि विद्यापीठातील जुन्या विहिरींना भेट
औरंगाबाद : शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण प्रयत्नशील आहेत. याच अनुषंगाने त्यांनी आज शहरातील रेल्वे स्टेशन आणि विद्यापीठ परिसरातील काही जुन्या विहीर तसेच बारवाची पाहणी केली.
शहरातील काही विहीर अशा आहेत ज्याचे क्षेत्रफळ मोठे असून काही वर्षांपूर्वी त्यात पाण्याची उपलब्धता चांगली होती परंतु या विहिरी आता पडीक आहेत असे काही स्थानिकांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना सांगितले होते. या अनुषगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व कर्मचार्यांसह शकरवाडी परिसरातील विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शकरवाडी विहिरीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बैल गोठी येथील तीन विहिरींची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना याविषयीचे अंदाज पत्रक तयार करण्यास सांगितले. तसेच हे पाणी एकत्रितपणे गोळा करून महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य प्रणालीमध्ये कसे टाकता येईल याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ह्या सर्व विहिरीतून साधारण 1 एमएलडी पाणी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर त्या परिसरात असलेल्या दातवाडी येथील विहिरीची पाहणी केली.
त्यानंतर स्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनीतील दोन क्रमांकाच्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीतून खासगी टँकर भरले जात होते. त्यांनी तहसीलदारांना या विहिरीचे मालक शोधण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यापीठ परिसरातील सोनेरी महालाजवळील सिंगारी विहिरीची देखील त्यांनी पाहणी केली. या विहिरीतून गोगा बाबा टेकडीच्या पायथ्याशी करण्यात येणाऱ्या वृक्षरोपणाला पाणी पुरविण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियत्याना दिले.
विद्यापीठ परिसरातील गंगा भरावजवळील आणि मुख्य इमारत समोरील विहिरींची देखील पाहणी केली. यावेळी अजय सिंग, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, हेमंत कोल्हे, कार्यकारी अभियंता, औरंगाबाद महानगरपालिका,
तहसीलदार श्रीमती पवार, अपर तहसीलदार विजय चव्हाण, आर डी काळे, कार्यकारी अभियंता इतर अधिकारी उपस्थित होते.