आदिवासी, कामगार शेतकऱ्यांसाठी सरकार एवढ्या साऱ्या योजना राबवतयं हे कळालं ….
प्रदर्शन पाहिल्यावर बचतगटातील महिलांची भावना
औरंगाबाद, :- आदिवासी, कामगार शेतकऱ्यांसाठी , कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी शासन एवढ्या साऱ्या योजना राबवतं हे पहिल्यांदाच या प्रदर्शनातून कळाल्याची भावना औरंगाबाद येथील कुंभेफळ गावातील श्री विघ्नहर्ता स्वयंसहायता महिला बचतगट समूहाच्या आशा शेळके यांनी व्यक्त केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद कार्यालयातर्फे शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या मोहिमेंतर्गत सचित्र प्रदर्शनाचे आयोजन सिमंत मंगल कार्यालय, जिल्हा परिषद समोर, औरंगपूरा, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला श्रीमती शेळके यांनी भेट दिली , यावेळी त्यांच्या सह बचत गटाच्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.
लॉकडाऊन मध्ये आमच्या गावात शिवभोजन केंद्र सुरू झाले. महिला बचत गटाने सुरू केलेल्या या शिवभोजन केंद्राचे काम बघून आम्हीही या बचत गटाचे सदस्य झालो. शिवभोजन सोबतच आदिवासी, कामगार, शेतकऱ्यांसाठी शासन एवढ्या साऱ्या योजना राबवते याची माहिती प्रदर्शनातून मिळाली अशी भावना शासन योजनांच प्रदर्शन पाहिल्यानंतर श्रीमती शेळके यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली.
रंजना पाटील यांनी औरंगाबाद सोबतच बीड, जालना, परभणी या आपल्या गावात कोणकोणत्या योजना शासनकडून चांगल्या पध्दतीने राबविल्या जात आहे. त्यासोबतच गरीब गरजूंना लॉकडाऊन मध्ये खूप मोठा आधार ठरलेल्या शिवभोजन योजनेत राज्यात किती काम झाले हे इथे कळालं. सुवर्णा यांनी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेली मदत तसेच माहिला व बालकांसाठीच्या योजना याचीही सोप्या पध्दतीने माहिती या प्रदर्शनातून मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
सदरील राज्यस्तरीय प्रदर्शन नागरिकांसाठी 1 पासून 5 मे 2022 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांनी विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी केले आहे.