उत्तर प्रदेशची निवडणूक भारताच्या पुढील १० वर्षांच्या राजकारणावर परिणाम करणारी: संजय मिस्किन
‘पाच राज्यांच्या निवडणुक निकालांचा अन्वयार्थ’ विषयावर यशवंतराव चव्हाण सेंटर व एमजीएमच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन
औरंगाबाद (दि.१४): उत्तर प्रदेश विधानसभेची यंदाची निवडणूक ही भारताच्या पुढील १० वर्षांच्या राजकारणावर परिणाम करणारी आहे.आता सर्रासपणे धर्मावर मतदान व्हायला लागले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काही मुद्दे लोकांसाठी संवेदनशील होते. मात्र, त्याहून अधिक भाजपची रणनिती, प्रचारतंत्र आणि यंत्रणेवरील पकड या गोष्टी प्रभावी ठरल्या, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित ‘पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ’ व्याख्यानमालेत ‘उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक’बाबत ते बोलत होते. या वेळी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबादचे सचिव नीलेश राऊत, सुहास तेंडुलकर, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके, प्रा. जयदेव डोळे, प्रवीण बर्दापूरकर, प्रा. डॉ. आशा देशपांडे, प्रशांत पवार, प्रा. एच.एम.देसरडा आदींची उपस्थिती होती.
संजय मिस्किन म्हणाले, उत्तर प्रदेश हा राजकारण, जातकारण आणि शेतीकारणांनी प्रचंड विखुरलेला प्रदेश आहे. एकीकडे सुपिक गंगेचा भाग तर दुसरीकडे कोरडा बुंदेलखंड आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडणे, दलित मुलीवर अत्याचार आणि बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे होते. पण, या मुद्यांना बाजूला सारुन योगी आदित्यनाथ यांनी ८०:२० चा मुद्दा आणून लोकांना पुन्हा जातआधारीत ध्रुवीकरणाकडे वळवले. दरम्यान, माध्यमांवरील चर्चा, विश्लेषण सर्व त्याच दिशेने वळवण्यात आले. शेतकरी आंदोलनही केवळ मोठ्या शेतकऱ्यांचेच असल्याचे चित्र रंगवण्यात आले.
अखिलेश यादव यांनी सपाची धुरा एकहाती उचलली होती. त्यांना युवकांचेही मोठ्या प्रमाणात समर्थन होते. मात्र, निवडणुकीची तयारी त्यांनी केवळ सहा महिन्यांपूर्वी सुरू केली. ती जर एक-दीड वर्षे आधीपासूनच तयारीला लागले असते तर चित्र वेगळे राहिले असते. सोशल मीडिया प्रचारात सपाने बाजी मारली. पहिल्या टप्प्यात त्यांच्या या प्रचाराचा प्रभाव दिसूनही आला. मात्र, दुसऱ्या टप्प्यात आयोगाने व्हर्च्युअल सभा बंद करून टाकल्या. तर, दुसरीकडे भाजपने सर्व मैदाने, सभास्थळे बुक करून सपाची कोंडी करून टाकली. भाजपने रेशन आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा स्थानिक स्तरावर अधिक व्यापक करून मतदारांना आकर्षित केले. कारण, उत्तर प्रदेशातील १७४ जागा २०० ते २००० मतांच्या फरकाने जिंकल्या किंवा पराभूत झाल्या आहेत. यास टपाली मतदान कारणीभूत ठरले, असे म्हणायला हरकत नाही. टपाली मतदान भाजपने जोरकसपणे करून घेतले. दुसरीकडे, हिंदुत्वाचा मुद्दाच जर या निवडणुकीत चालला असे म्हटले तर भाजपचे ११ मंत्री आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मातब्बर नेते का पडले, याचाही विचार व्हायला हवा. वरवर बघता या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा होता पण खेडोपाडी मोकाट जनावरे, बेरोजगारीसारखे मुद्देही होती. त्यावर भाजपने उत्तम रणनिती आखली होती. हिंदु-मुस्लिम, भारत-पाकिस्तान हा प्रोपोगंडा आहे. मुळात प्रत्यक्ष जमीनीवर निवडणुक लढवण्यासाठी यंत्रणा सक्षम असावी लागते आणि ती भाजपत आहे. कोरोनाचा उत्तर प्रदेशातील शहरी भागातच प्रभाव होता. खेड्यातील लोकांना कोरोनाचा काहीच फरक पडला नाही. पण, कोरोनामुळे नुकसान सहन करावे लागूनही शहरी मतदार धर्माच्या नावावर भाजपच्या विरोधात गेले नाहीत, असेही संजय मिस्किन म्हणाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक,अजय धनजे यांनी सूत्रसंचलन तर डॉ. रेखा शेळके यांनी आभार मानले. एमजीएमच्या विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाचे सुबोध जाधव, प्रतिक राऊत आदीही या वेळी उपस्थित होते.