Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

हिवताप प्रतिरोध महिना कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप कार्यालय सज्ज

“आला पावसाळा आरोग्य सांभाळा” या उक्तीनुसार पावसाळा आला की पाण्यामुळे, डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या रुग्णांची शक्यता वाढू शकते. त्यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती नागरिकांना होणे आवश्यक आहे. म्हणूनच दरवर्षी जून महिना हा “हिवताप प्रतिरोध महिना” म्हणून साजरा केला जातो. अद्याप करोनाचे सावट पूर्णपणे संपलेले नाही, त्यात पावसाळा सुरू झाला आहे. तेव्हा पाणी व डासांमार्फत पसरणाऱ्या आजाराबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी, म्हणून हा लेख प्रपंच…
‘हिवताप’ म्हणजेच मलेरीया. या आजारात रुग्णाला तीव्र स्वरूपाचा ताप येतो व थंडीही वाजून येते. या आजाराची लागण अत्यंत सूक्ष्म अशा “प्लासमोडीयम” या परोपजीवी जंतूमुळे होते. आणि आजाराचा प्रसार “ॲनोफिलिस” जातीच्या डासाच्या मादीमार्फत होतो.“ॲनोफिलिस” डासाची मादी एखादया हिवताप रुग्णास चावल्यानंतर ती डासाची मादी निरोगी माणसास चावल्यावर तिच्या लाळग्रंथीच्या माध्यमातून हिवतापाचे जंतू निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.
“प्लासमोडियम” या जंतूच्या 4 वेगवेगळ्या जाती आढळतात. पी. व्हायव्हॅक्स, पी मलेरी, पी फॅल्सीपेरम व पी ओव्हेल. भारतात हिवताप रुग्णांपैकी 70% रुग्ण पी व्हायव्हॅक्समुळे तर 25-30 % रुग्ण पी फॅल्सीपेरममुळे होणारे असतात. पी फॅल्सीपेरम मुळे मेंदूचा हिवताप होतो, जो रुग्णासाठी घातक ठरु शकतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास त्यात त्या रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
हिवतापाच्या प्रमुख 3 अवस्था आहेत – थंडी, ताप, घाम अशा प्रकारची लक्षणे रुग्णात दिसतात. मेंदूच्या हिवतापात मात्र वात येऊन झटका येणे, अशी लक्षणे दिसतात. अशा रुग्णास औषधोपचार त्वरीत करणे गरजेचे असते. त्यामुळे कुठल्याही नागरिकाला ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता रक्ताची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे हिवताप / डेंगी / चिकुनगुनिया झाला आहे की नाही, याचे निदान त्वरीत होऊ शकते. हिवताप/ डेंगी साठी रक्ताची तपासणी आपल्या नजीकच्या सरकारी रुग्णालयात मोफत केली जाते व रुग्ण बाधित आढळल्यास त्यास औषधोपचार देखील मोफत करण्यात येतात.
हिवतापासाठी किंवा सर्वच कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी कुठेही तुंबून राहू देऊ नये, गटारी वाहत्या कराव्यात, पाण्याची डबकी बुजवावीत, गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात त्यामुळे मोठ्या पाणीसाठ्यांमध्ये गप्पी माशांचा वापर करावा, पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, आठवड्यातून एकदा पाणी साठविण्याची भांडी घासून पुसून स्वच्छ करावीत, झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, संध्याकाळी घराची दारे/खिडक्या काही काळ बंद कराव्यात, जेणेकरून डासांचा प्रादूर्भाव होणार नाही, सरकारी कर्मचारी औषध फवारणीसाठी, रक्त नमुने घेण्यासाठी आल्यास त्यांना सहकार्य करावे, संडासाच्या व्हेंट पाईपना जाळया बसवाव्यात, सर्वात महत्वाचे म्हणजे ताप आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करावी.
सर्व नागरिकांनी करोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसताना कीटकजन्य आजाराबाबतही दक्ष राहणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात हिवताप व डेंगी रुग्णातही घट झालेली आहे. मागील 2-3 वर्षाच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी असून या आजारात मृत्यूही झाले नाहीत, ही बाब दिलासादायक आहे. तरीही स्वत:च्या व कुटुंबियांच्या उत्तम आरोग्यासाठी काळजी घेणे, सजग राहणे गरजेचे आहे.

लेखन:-
श्रीमती वैशाली पाटील
जिल्हा हिवताप अधिकारी,
रायगड

संपादन:-
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close