Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

लॉकडाऊनमधली सुट्टी

भारतात कोरोनाचा प्रथम रुग्ण सापडला…. त्यानंतर लगेच त्याचे इतके गांभीर्य लक्षात आले नाही . पण मग मात्र त्या करोनाने आपले हात पाय मारायला सुरवात केली. बघता बघता त्याचे आकारमान वाढत गेले. पुणे, मुबंई सुद्धा यात अडकले गेले. पुण्यात पहिला रुग्ण 8मार्च ला सापडला. त्या नंतर मुंबई व त्या नंतर महाराष्ट्र भर त्याचा विळखा दिसू लागला. म्हणून 25 तारखेला सर्व भारतभर जनता कर्फ्यू जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लॉक डाऊन आदेश 31 मार्च पर्यंत लॉक डाऊन घोषित केले
मग खरी परिस्थिती किती गंभीर आहे हे लोकांना कळू लागले. तरी पाहिजे तितके काही ठिकाणी त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्यामुळे त्याचे परिणाम आज आपण बघतच आहोत.

सुरवातीला खूप गम्म्मत वाटली व आनंद ही झाला की ती इतके दिवस मनात म्हणत होती की मला खरंच आराम हवा रोजचा प्रवास व घरी येऊन पुन्हा काम खूप दमून गेले. छान झाले आता घरी. उद्या पासून ऑफिसची धावपळ नाही आरामात उठून आवरत जाणार…. या आनंदाचा… आनंद अजून कुठे मावळला ही नाही तर “वर्क फ्रॉम होम ” चे मेल आले. झाले एकदम फुग्यातली हवाच निघून गेली. लगेचच दुसरी बातमी आली की आजपासून घरात काम करणारी बाई पण कामाला येणार नाही आणि उरली सुरली ताकद ही गेली.
मग काय तिने डोक्याला हात लावून घेतला पण किती वेळ हे असं बसणं जमणार आहे आता, उठ आणी, हे का आवश्यक आहे याचा विचार कर असं तिच्या मनात आलं व दुसऱ्या च क्षणाला स्वतःला प्रथम सांभाळणे गरजेचे होते म्हणून ते काम प्रथम केले.
26मार्च पासून 3मे पर्यंत मग 25 17 मग 24 आणि आता 31 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले.
आता हताश होऊन चालणार नव्हतेच म्हणून कामाची सुरवात प्रथम आपल्या पासूनच केली
सकाळ 5 ला होऊ लागली… त्या शिवाय पुढचं गणित ही सोडवायला हवंच होत….. उठल्या उठल्या प्रथम तिने आपले स्वयंपाक घरं पुर्ण पणे न्यहाळले. व एक समाधानाचा मोठा श्वास सोडला. आईचे शब्द तिला आठवले कीं पोरी घरातील डब्बे नेहमीच भरलेले ठेवत जा…. कधी कोणती वेळ सांगून येत नाही…. आज तिला खुप आनंद झाला… कीं माझ्या स्वयंपाक घरात सर्व सामान भरून आहे …. तिच्या बरण्या खुप आनंदी वाटत होत्या….. नंतर तिने आपला मोर्चा दारातील कुंच्या कडे वळवला… त्याला नमस्कार करून हातात घेतला…. व म्हणाली आजपासून मालकीण च तुझ्या बरोबर आहे… तेव्हा तू पण मला साथ दे… हे किती दिवस चालणार आहे हे तुला जसे माहित नाही तसे मला पण…. माझ्या तब्बेतीची तू पण काळजी घे… कधीच मला कोणते दुखणं नको देऊ…. सवय नाही पण होईल… हळू हळू…. त्या नंतर केर पोछा दोन्ही करून… स्वतःचे आवरून देवपूजा करून ती ओट्या पुढे उभी राहिली…. तोपर्यंत घरातील सर्व आरामात उठले…. दोन्ही मुलगे…. कामाची सवय नाही…. नवरोबा तर उल्लास…. पण खंत न करता तिने सर्वांना चहा नाश्ता दिला. स्वयंपाक तयार करून तीने “वर्क फ्रॉम होम ” ला 9.30ला सुरवात केली…
तिचेच तिला आश्चर्य वाटले…. कीं मी पण हे करू शकते…
पण जसे लॉक डाऊनचे दिवस जाऊ लागले… कडक बंदोबस्त होऊ लागला….. दूध येणं बंद झाले… सुरवातीला चहा पिताना… तोंड वेडंवाकडं झाले… पण आता चहाच करण बंद करून फक्त घरी तयार केलेला ग्रीन टी घरात होऊ लागला… एक चांगले पेय म्हणून सर्वच पिऊ लागले… घरातील काम व ऑफिस चे काम तिची कसरत होऊ लागली…. ही कसरत मुलांच्या व नवरोबा च्या लक्षात आली…. म्हणून कधीच तांब्या न उचलणारे हात तिला कामात मदत करू लागले… चक्क पडतील तशी भांडी जो तो स्वच्छ करू लागला…. आपलं आपण वाढून घेणं सुरू झालं. आपल्याला मुलगी नाही ही खंत तिच्या मनात होती पण मुलगा सुध्दा आईला कामात मदत करताना पाहून खूप समाधान वाटले तिला…. एक गम्मत अशी होती कीं रोज फक्त एक वेळेस येऊन भांडी बाई घासत होती आणि आजकाल तर मोरीत सारखीच पिल्लं पडत होती .. घासणारे हात पण वाढले होते तरी मोरी मोकळा श्वास घेतच नव्हती…
काशी घेणार.. आता सर्वच घरात कुणीच बाहेर जात नव्हतं… आणी बिनकामाची भूक मात्र लागत होती प्रत्येकाला…. त्यामुळे जो तो आपल्या आवडीचं करून बघत होता…. दोन वेळेस खाणारी तोंड चार वेळेस खाऊ लागली…. मुलांना काय दोष देणार… आपण पण घरी असलो की हेच करत होतो…
सर्व जण फक्त संध्याकाळी एकत्र येत होते… जेवणाच्या टेबलवर…. पण आता सारखेच एकत्र त्यामुळे संवाद वाढू लागले… एकमेकांना सांभाळून घेऊ लागले….
कुणीच घराबाहेर पडत नव्हतं… सरकारने घालून दिलेल नियम प्रामाणिक पणाने पाळत होते….. कारण दिवसेंदिवस करोना चा विळखा घट्ट होऊ लागला होता…. तरी त्याला घाबरून न जाता त्याला जितकी टक्कर देता येईल तितकी देत होते….
घरात बसून कधी अस्वस्थ न होता, करमुणकीची साधने शोधून काढू लागले… मग पत्त्याचा डाव… कधी सात आठ, कधी गुलाम चोर कधी not at home, तर कधी मेंढी कोट…. अशी चढाओढ सुरु झाली… माळ्यावर ठेवलेली बॅग खाली आली… मग कधी कॅरम, कधी चेस, कधी घरातच भोवरा खेळणे तर लहानपणीची सापशिडी, ल्युडो असे बरेच खेळ खेळले जाऊ लागले… ती पण जसे जमेल तशी सहभागी होऊ लागली… खरंच इतक्या वर्षानंतर पुन्हा बालपण व एकमेकांना बरोब खेळाचा आनंद घेऊ लागले… ती तर आई आणि बाई आशा दोन्ही भूमिका छान पार पाडू लागली…. गप्प झालेले घरं पुन्हा खळखळून हसू लागले…..
निसर्ग पण मोकळा श्वास घेऊ लागला.. प्रदूषण कमी होऊ लागले. . रोज धूर सोडत धावणारी गाडी एका जागी शांत उभी होती…. घरातील भिंती पण बोलू लागल्या… आपल्या आवडीचे पेन्टिंग भिंतीवर दिसू लागले… घरे स्वच्छ दिसू लागली…. वेळ मिळेल तसा जो तो कामत हात देऊ लागला…. आई काय करते, तिला काय काम असतं. हे आता सर्वांनाच पटू लागले……
कुंड्यांमधली झाडे टवटवीत झाली… लॉकडाऊन असूनही देवाला मात्र भरपूर फूले घरच्या घरी मिळू लागली…. बागेची आवड होतीच पण वेळ नाही म्हणून लक्ष दिले जात नव्हते पण आता फक्त फूलच नाही तर कुंडीत फळभाजी पण दिसू लागली… हा आनंद खरंच लॉकडाऊन मुळे तिला घेता आला…
पण हे सर्व करताना स्वतःला आरशात पाहिले तर तिचेच तिला हसू आवरेना… केसाला फणी नाही, चेहऱ्यावर कुठे पावडर नाही, लाली नाही तरी चेहऱ्यावर समाधान दिसतं होते, कारणं आता सगळे कुटुंब एका छताखाली रहात एकमेकांना आनंद देत होते.
जरी कुणाला भेटत नव्हते तरी न चुकता एकमेकांना फोन करून विचारपूस करत होते. एकमेकांच्या मनाने जवळ आले होते आणि हे करोनाने करून दाखवले होते.
पूर्वी जो तो आपल्या कामातच मग्न… फोन आला तरी… जुजबी बोलणे होत होते… पण आज आठवणीने एकमेकांना विचारत होते….
तसेच काही करमणूक पण घरात दिसू लागली होती….. घरात बसून गाणी लावून त्यावर पावले ठेका धरू लागली…. आजी नातवाबरोबर नाचू लागली…. आई बाबा घरातच हातातहात घालून जीवनगाणे गाताना दिसू लागले…
जगणे हरवून बसलेले पुन्हा मुक्तपणे वय विसरून जगताना दिसू लागले….
हे जरी चांगले दिसत असले तरी दुसरी बाजू आठवली डोळ्यात पाणी आणणारी आहे. या करोनाशी युद्ध आता जागतिक पातळीवर सुरू आहे. यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयामावशी, व सर्व पोलीस वर्ग .. उच्च अधिकारी, सर्व दलातील अधिकारी…..सफाई कामगार देशाला वाचवण्यासाठी लढाई करताना दिवस रात्र दिसत आहेत…. त्यांना पण घर आहे, कुटुंब आहे तरी ते सर्व देवावर सोपवून देशाकरता मैदानात उतरले आहेत….. त्यांना खरंच सलाम, त्यांच्या मोलाचे चीज करणे आपल्या हातात आहे… त्याकरता सरकार सांगेल त्या नियम पालन गरजेचे आहे…

ह्या लॉक डाऊन मुळे गरिबाला जेवढी मदत करता येईल तेवढी करायला सगळे हात पुढे आले आहेत … देव जरी लॉक डाऊन असले तरी त्यांचा आशीर्वाद सतत साऱ्यां बरोबर आहे… हे लक्षात ठेवून आपण आपली नियमानुसार वागणूक ठेवून घरात राहू व देश सेवा करू…
शिरोमणी काव्य रचना
घाबरायचं
आता नाही
लढायचं बिना ढाल
करोनाचे करू कायमचे हाल

घाबरायचं
कश्यासाठी आता
लॉकडाऊन होऊन
छंदाना थोडी पायावाट देऊ

घाबरयचं
मुळीच नाही
घरात स्वास्थ बसायचं
लहानमोठया सर्वांना धीर द्यायचा

घाबरायचं
कुणालाच नाही
मनाने नियम पाळायचे
हात पाय सारखेच धुवायचे.

घाबरायचं
स्वप्नातही नाही
पहाटे आनंदात उठायचे
जमतील तसे व्यायाम करायचे..

घाबरायचं
कुणासाठी
घरात बंदिस्त आनंदात
रामायण, महाभारत, यांच्या सहवासात
– करुणा शिंदे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close