Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

करोना लसीची शुभवार्ता लवकरच?पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरममध्ये घेतला आढावा

पुणे: करोनावरील लस केव्हा येणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज पुणे येथे येऊन सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली व लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. पंतप्रधान सुमारे एक तास सीरममध्ये होते. पंतप्रधानांच्या या भेटीनंतर करोना लसीबाबत लवकरच शुभवार्ता मिळण्याची आशा वाढली आहे.
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचं संकट देशावर घोंगावू लागलं असतानाच ही लाट रोखायची असेल तर करोनावरील लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहेत. पंतप्रधानांनी आज एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी यांनी आज सर्वप्रथम सकाळी अहमदाबाद येथील झायडस बायोटेकला भेट दिली. तिथे आढावा घेतल्यानंतर ते हैदराबाद येथील भारत बायोटेकमध्ये पोहचले. या ठिकाणी सुरू असलेली लस निर्मिती आणि त्याचे उत्पादन याबाबत संबधित शास्त्रज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सर्वांच्याच प्रयत्नांचं कौतुक केलं. हैदराबादनंतर पंतप्रधान थेट पुण्यात दाखल झाले. पुणे विमानतळावरून पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्युट गाठली. तिथे पूनावाला कुटुंबीयांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी सीरमचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांना लस उत्पादनाबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर सीरमच्या शास्त्रज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. या बैठकीनंतर लसचं उत्पादन जिथे सुरू आहे त्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट घेतली. सुमारे तासभर पंतप्रधान सीरम इन्स्टिट्युटमध्ये होते.

सिरम इन्स्टिट्यूट आणि लस निर्मितीचा इतिहास
सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पुनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिथून सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवासाला सुरुवात झाली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झाला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे. तसंच एकूण लसीच्या 90 टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close