Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील जेष्ठ तमाशा कलावंतांना औरंगाबाद जिल्ह्यातील माजी सरपंचांकडून मदतीचा हात

अहमदनगर/mh20live Network

– लॉक डाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नगर जिल्ह्यातील ६ तमाशा कलावंतांना शिउर बंगला, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद येथील माजी सरपंच तथा तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष भास्कर आबा जाधव यांनी आपल्या १ वर्षाच्या मानधनाच्या रकमेतून प्रत्येकी २ हजार रुपये आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जाधव यांनी केलेल्या या मदतीमुळे नगर जिल्ह्यातील तमाशा कलावंतांनी समाधान व्यक्त केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिउर बंगला येथील कलावंत, माजी सरपंच व तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव यांना लोककला विषयी अत्यंत आदर आहे तसेच दुर्लक्षित लोककलावंतांवर त्यांचे मनापासून प्रेम आहे. लॉक डाऊनच्या काळात तमाशा कलावंतांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याची त्यांनी कल्पना होती. म्हणूनच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी नगर जिल्ह्यातील सखुबाई भवर (शेवगाव), रोहिदास सोनवणे (पिंपरी तालुका पाथर्डी), ज्ञानदेव जवणे (चांदा बुद्रुक तालुका कर्जत), हसन शेख पाटेवाडीकर (पाटेवाडी तालुका कर्जत), दत्ता ठोकळे (कुळधरण तालुका कर्जत), संजय जाधव (वेल्हाळे तालुका संगमनेर) तसेच सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी वंजारी (वंजारवाडी तालुका करमाळा), वंदना जाधव (अर्जुनसोडे तालुका मोहोळ), गणेश महाडिक (नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर) व संभाजी कोल्हे (हावरगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद) या १० कलावंताच्या बँक खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये आर्थिक मदत पाठविली आहे.

भास्कर आबा जाधव यांच्याकडून अनपेक्षित पणे झालेल्या या मदतीमुळे हे तमाशा कलावंत हरखून गेले आहेत. त्यांनी भास्कर आबा जाधव यांना मनापासून धन्यवाद दिले. व आपल्या हातून भविष्यकाळात देखील अशाच प्रकारची समाजसेवा घडावी अशी सदिच्छा व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाचे वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांनी कौतुक केले आहे.

शिउर बंगला येथे दरवर्षी अक्षय तृतीयेनंतर ५ दिवसांची सांस्कृतिक कार्यक्रमांची पंचमी साजरी होते. परंतु यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पंचमी निमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले. शिउर बंगला हे गाव मुळातच कलाप्रेमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे लोककलावंतांचा मानसन्मान केला जातो. पंचमी निमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यासाठी शिउर बंगला येथे सर्व कलावंतांचा राबता भास्कर आबा जाधव यांच्या निवासस्थानीच असतो. कलावंतासाठी चहा, नाष्टा, भोजन निवास व्यवस्था देखील भास्कर आबा जाधव यांच्या घरीच असते. जाधव यांच्या पत्नी आबई जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः जातीने लक्ष देऊन या सर्व कलावंतांना काय हवे काय नको ते पाहत असत. परंतु २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले.

भास्कर जाधव यांना २ मुले असून १ मुलगा सैन्यामध्ये आहे तर दुसऱ्या मुलाचा मिलचा
व्यवसाय आहे. भास्कर जाधव हे स्वतः जेष्ठ कलावंत असल्यामुळे त्यांना केंद्र शासनाच्या जेष्ठ कलावंत मानधन योजनेद्वारे दरमहा ४ हजार रुपये व राज्य शासनाच्या जेष्ठ कलावंत मानधन योजनेतून दरमहा २२५० रुपये मानधन मिळते.

कोरोना महामारीचे संकट व लॉक डाऊनमुळे या वर्षी मार्च, एप्रिल, मे या तिन्ही महिन्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही तमाशाचे खेळ होऊ शकले नाहीत. त्यामुळे तमाशा कलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत. हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या १ वर्षाच्या मानधनाची रक्कम १५ जेष्ठ तमाशा कलावंतांना देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील तमाशा कलावंत तथा कै. शाहीर पठ्ठे बापूराव तमाशा कलावंत, कलाविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष हसन शेख पाटेवाडीकर यांच्याशी संपर्क साधला. व त्यांच्याकडून राज्यातील विविध भागांतील १५ गरजू जेष्ठ तमाशा कलावंताची नावे, भ्रमण ध्वनी क्रमांक मागितले व त्यापैकी १० कलावंतांना प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर पाठविली. उर्वरित ५ कलावंतांना या आठवड्यात मदत पोहच होईल असे त्यांनी सांगितले. जाधव यांच्या या उपक्रमाचे तमाशा कलावंतांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.

लॉक डाऊन सुरू होऊन २ महिने पूर्ण झाले आहेत. या काळात समाजाचे विदारक वास्तव, विविध घटना, घडामोडी व कृतीद्वारे समाजासमोर येत आहे. त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक अनुभव समाजातील विविध घटकांच्या वाट्याला येत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समस्थ तमाशा कलावंतांनी महाराष्ट्र शासनाकडे मदतीची सामूहिक मागणी केली होती. परंतु तमाशा कलावंतांना अद्यापपर्यंत कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही.

राष्ट्रवादी वेलफेअर फौंडेशनच्या वतीने राज्यातील संगीतबारी (कलाकेंद्र) मधील कलावंतांना प्रत्येकी ३ हजार रुपये मदतीची घोषणा झाली होती. ती मदत मिळविण्यासाठी राज्यातील कलाकेंद्रातील मालक, पार्टी मालकीण व पार्टीमध्ये काम करणाऱ्या कलावंतांची आवश्यक ती माहिती संबंधितांकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यातील ५० टक्के कलावंतांना प्रत्येकी ३ हजार रुपयांची रक्कम मिळालेली आहे. आणि उर्वरित ५० टक्के कलावंत ही मदत कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close