Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नाथांच्या पालखीचे 20 वारकर्‍यांच्या उपस्थितीत प्रस्थान

दशमीपर्यंत समाधी मंदिरात पालखी मुक्कामी

पैठण / किरण काळे औरंगाबाद आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या सात मानाच्या पालखी सोहळा पैकी एक संत एकनाथ पालखी सोहळा. साडेचारशे वर्षापेक्षा अधिकची या पालखी सोहळ्याला परंपरा आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच मोजक्या वारकर्‍यांसह पालखीने प्रस्थान केले आहे. दशमीपर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असणार आहे.डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, तोंडाला मास्क आणि 20 वारकर्‍यांच्या उपस्थितीत नाथाच्या पालखीने दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नाथच्या जुन्यावाड्यातून प्रस्थान ठेवलं. एरवी हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत,भानुदास एकनाथ गजरामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय पालखी विश्वस्तांनी घेतला होता. अगदी सकाळपासून गोदावरीच्या काठावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळायची. मात्र आज गोदावरीचा काठ भक्ताविना ओस होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी पैठणमध्ये एकत्र येतात. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर एकमेकांपासून दूर राहिलेले वारकरी, महिनाभर वारीच्या निमित्ताने एकत्र राहतात. पालखी हे त्यांच्यासाठी घर होऊन जातं. मात्र यावेळी या आनंदापासून दूर राहावे लागणार असल्याने प्रत्येक वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर उत्साह काही दिसला नाही.या सोहळ्याला सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्‍यांनी 40 ते 50 वर्ष या वारीत सहभाग घेतला आहे, या वारीचे ते साक्षीदार आहेत. तुळशीराम काकडे हे गेल्या 50 वर्षांपासून न चुकता वारी सोहळ्यात सहभागी होतात. त्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षात अनेक संकट आली. पाऊस, वादळ-वारा, पालखी वाटेतील घाट अशी अनेक संकट पाहिली, पण कधी हतबल झालो नाहीत. पण यावर्षी आमच्या हातात काहीच नाही. पण एवढंच भाग्य की चार पावलं तरी पालखी सोबत चाललो.वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकर्‍यांची ही अशीच काहीशी भावना होती. एरवी वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी पोलीस असायचे, पण यावर्षी वारीत वारकर्‍यांना सोशल डिस्टंसिंग सांगण्यासाठी पोलीस होते. वारीत अधिकचे वारकरी सहभागी होऊ नयेत म्हणून त्याचं लक्ष होतं. आता दशमीपर्यंत नाथांची पालखी नाथांच्या समाधी मंदिरात मुक्कामी असेल. रोज शासनाच्या नियमांनुसार भजन-कीर्तन होईल. दशमीला नाथांच्या पादुका वाहनानं पंढरपूरला पाच वारकरी घेऊन जातील.
प्रत्येक वर्षीच्या रीती-रिवाजाप्रमाणे काल्यापर्यंत पादुका पंढरपूरमध्ये असतील आणि हा सोहळा पार पडेल. नाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो वारकरी सहभागी होतात. कोरोनामुळे आज ते शरीराने जरी पैठणमध्ये नसतील तरी मनाने मात्र ते पैठणमध्येच असतील, यात शंका नाही. साडेचारशे वर्षाच्या सोहळ्याच्या इतिहासात हे वर्ष कायम वारकर्‍यांच्या स्मरणात राहील. आज वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी भानुदास एकनाथ या गजरासोबतच नाथांना एक मागणी करत असेल ती म्हणजे हे कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वर्षी तरी वारीची परंपरा उत्साहात आणि आनंदात साजरी होऊ देत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close