Subscribe to our Newsletter
Loading
II जागो ग्राहक जागो ll

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष…..

नमस्कार, *आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन.* 24 डिसेंबर 1986 साली अखिल भारतीय ग्राहक पंचायती च्या प्रयत्नातून भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केला. म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्राहक दिन मोठया उत्साहात विविध जनजागृती कार्यक्रमांनी साजरा केला जातो. तसे पाहता दैनंदिन जीवनामध्ये आजही खेडा पाड्यातील ग्राहकांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते… दूध किंवा शीतपेय छापील किंमती  (एम.आर.पी.) पेक्षा जादा किमतीने घ्यावे लागते. आठवडा बाजारातील भाजीवाला तराजूत वजना ऐवजी दगड ठेवतो. अखाद्य रंग वापरलेल्या मिठाईची विक्री केली जाते , दुधात भेसळ होते, अश्लील, हीन अभिरुचीच्या जाहिरातींतून नको ते ओंगळवाणे प्रदर्शन केले जाते. रिक्षा-टॅक्सीवाल्यांची लुबाडणूक आपण निमूटपणे सहन करतो. बिल्डर, फायनान्स कंपन्या, प्रवासी कंपन्या, वस्तूंचे उत्पादक आपल्याला फसवताहेत, यांसारख्या बऱ्याचशा अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागते…
हे सगळं का ? यामागील कारण एकच,.. अजूनही आपल्यातील शोषणाविरुद्ध लढणारा खरा ग्राहक बाहेर येत नाही. म्हणूनच आजच्या *24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपणांस ग्राहक संरक्षण कायद्या ने प्राप्त झालेल्या काही मूलभूत अधिकारांची माहिती घेणं महत्वाचं आहे.. ..* 
*1 ) सुरक्षिततेचा हक्क  :-* बाजारात उपलब्ध असणारी कोणतीही वस्तू आरोग्याला घातक नसणे तिचा कोणत्याही प्रकारे उपद्रव न होणे हा आपला ग्राहक म्हणून हक्क आहे. उदा.- लहान मुलांची खेळणी ज्यापासून त्यांना इजा होऊ शकेल अशी नसावीत. 
*2 ) माहिती मिळविण्याचा हक्क :-* जी वस्तू खरेदी करावयाची आहे त्या वस्तू,उत्पादना विषयी, कंपनी विषयी तिच्या उपयोगा विषयी अगर सेवे विषयी, वस्तूच्या वापरातून होणाऱ्या परिणामां विषयी सर्व प्रकारची सत्य माहिती ग्राहक म्हणून जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.
*3 ) वस्तू निवडण्याचा हक्क :-* अनेक दर्जाच्या अनेक कंपन्यांच्या नानाविध किंमती असलेल्या वस्तूतून चौकस राहून गुणवत्ता पूर्ण अशी वस्तू निवडण्याचा ग्राहकास हक्क आहे.
*4 ) मत मांडण्याचा किंवा तक्रार निवारणाचा हक्क :-* वस्तू अगर सेवा घेतल्यानंतर काही दोष अथवा तक्रार उद्भवल्यास आणि आपली फसवणूक झाली आहे असे वाटल्यास ग्राहकाला तक्रार करण्याचा आणि ती निवारण करुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
*5 ) ग्राहक शिक्षणाचा हक्क  :-* ग्राहकांचे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत त्यांची आणि बाजारपेठेत केल्या जाणाऱ्या सर्व व्यापारी व्यवहारा तील बदलांची शासनाने केलेल्या नवीन कायदे, तरतूदी तसेच नियमांची माहिती करून घेण्याचा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे.
*6 ) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क :-* आपले जीवनमान चांगले राहण्यासाठी प्रदूषणा पासून संरक्षण मिळवण्याचा, याचा अर्थ आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असणे,सांडपाण्या चा निचरा व्यवस्थित होणे, आरोग्यसंबंधी वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणे हा आपला अधिकार आहे.
दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून वावरताना बऱ्याचदा आपल्या या अधिकारांची, हक्कांची पायमल्ली होते. हे आपण वरचेवर अनुभवतो. अशा वेळी गरज असते ती ठामपणे आणि चिकाटीने आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करून घेण्याची. *जागरूक ग्राहक हा या देशाचा सुरक्षित नागरिक असतो या तत्वाने आपण सर्वानी आपला ग्राहक डोळा सजग ठेवून व्यवहार करायला हवेत.* 
*ग्राहकाभिमुख प्रशासन, शोषणमुक्त समाज आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेऊन 1974 साली ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना केली आहे.* *”संवाद समन्वयात ग्राहक कल्‍याणम् !! ” कारखानदार,  व्यापारी, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक हि अर्थक्षेत्राची पाच अंगे आहेत. यांच्यात संघर्ष नको अंगअंगी भाव हवा कारण शेवटी सर्व ” ग्राहक ” आहेत. तेव्हा यात समरसता हवी म्हणूनच ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्षात्मक कार्यक्रम अशीही ग्राहक चळवळीच्या कार्याची चतुःसूत्री गुंफत ग्राहक चळवळ संपूर्ण देशभर कणखरपणे उभी आहे.* 
असे असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठेत वावरताना मात्र बऱ्याच वेळेला ग्राहक म्हणून असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. केली जाणारी अडवणूक पीळवणूक ही केवळ वस्तू खरेदीच्या स्वरूपातच असते असं नाही, तर त्यात जीवनावश्यक अशा सेवांचा ही समावेश होतो. मग पेट्रोलपंपावर वाहनात पेट्रोल भरताना, औषध दुकानातून औषध घेताना, विविध फायनान्स कंपन्या कडून उपलब्ध केल जाणार अर्थसहाय्य, सुट्टी दरम्यान निघणाऱ्या कौटुंबिक सहली, पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी बुकिंग केली जाणारी मंगल कार्यालय, शेती हंगामानुसार खरेदी केली जाणारी बी बियाणे, खतांचा पुरवठा, बँकेच्या ए. टी. एम मधून न मिळालेली रक्कम, विद्यार्थ्याना मिळणारी एस. टी ची पास सवलत, गॅस कंपन्यांचे अनुदान न मिळणे, रुग्णालयांतून होणारी अवास्तव बिल आकारणी, वीज वितरण कंपनीची विमा रक्कम मिळण्यातील अडचणी, रेल्वे आरक्षण शुल्क, विशीष्ट भाडे करारानुसार पुरवली जाणारी विविध सेवा साधने अशा एक ना अनेक सेवांचा या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. 
*पावती शिवाय खरेदी करु नका, ऑनलाईन खरेदी टाळा, आणि जाहिरातींच्या भुलभुलैयांना बळी पडू नका.* जागरूक राहूनही फसवणूक झालीच तर संबंधित यंत्रणेशी ग्राहक म्हणून आपण स्वतः लेखी तक्रार करुन आपले म्हणणे मांडू शकता. या सर्व समस्यांच्या निराकरण आणि मार्गदर्शनासाठी गांव तिथे ग्राहक पंचायत हा संकल्प या निमित्ताने आपण सारेजण करूया. गावोगावी मार्गदर्शन सेवा केंद्र सुरु करूया. तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या मदतीला ग्राहक पंचायतीचे  अनेक कार्यकर्ते जिल्हाभर सेवाशरण वृत्तीने कार्यरत आहेत. ग्राहक चळवळ बहिष्काराची पुरस्कर्ती आहे पण संप, मोर्चे, टाळेबंदी, घेरावो, जलादो अशा चुकीच्या पद्धतीचा अवलंब कधीही करीत नाहीत याला आमचा सक्त विरोध आहे. *चर्चा, संवाद आणि समन्वयातून अनेक प्रश्न सुटतात या विश्वासावर गेली 45 वर्ष ग्राहक चळवळ उभी आहे .*
एखादा जटिल प्रश्न नाहीच सुटला तर ग्राहक संरक्षण कायद्याने आपणांस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे 1 कोटी रु.पर्यंत मुल्य असलेल्या तक्रारी सुनावणीसाठी नजीकच्या जिल्हा आयोगात दाखल करता येतात. तर 5 लाख रुपया पर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जातं नाही.10 कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे तर 10 कोटी हुन अधिक रक्कमेच्या तक्रारी राष्ट्रीय आयोगात दाखल करण्याची तरतूद आहे. 
*नव्याने प्रारित झालेल्या 2019 च्या कायद्यानाव्ये उत्पादन दायीत्व, नुकसान भरपाई कार्यक्षेत्र वाढ करुन तिच्या अंलबजावणी साठी स्थापित झालेल प्राधिकरण,  मध्यस्त, ऑनलाईन व्यवहार, आणि फसव्या किंवा दिशाभूल जाहिराती करणाऱ्यांवर थेट कारवाई, तसेच दंड आणि कारावास  अशा महत्वपूर्ण बदलामुळे आजचा ग्राहक हा खऱ्या अर्थानं राजा झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.* आता गरज आहे ती ग्राहकाने अन्याया विरुद्ध उठून उभं राहण्याची. आणि लेखणी युद्ध सुरु करुन ” जेजे आपणांस ठावे | तेते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे सकळजन | हे संत वचन सार्थ ठरवण्याची. *|| जय भारत – जय ग्राहक ||

*
डाॅ विलास मोरे प्रांत उपाध्यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close