मंदिराच्या पार्श्वभूमीवर किसिंग सीन दाखवला म्हणून Netflix विरोधात गुन्हा; Suitable Boy मध्ये Love Jihad असल्याचाही भाजपचा आरोप

भोपाळ- मदिराच्या पार्श्वभूमीवर किसिंग सीन दाखवणारी वेबसीरिज प्रसिद्ध केली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचं कारण देत OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या (Netflix India) दोन अधिकाऱ्यांवर मध्य प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीवून FIR दाखल करण्यात आला आहे. या मालिकेतून लव्ह जिहादचा (Love Jihad) पुरस्कार केल्याचाही त्यांचा आरोप आहे. विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे नेटफ्लिक्सवर लोकप्रिय होत असलेली A suitable Boy ही वेबसीरिज वादात सापडली आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘अ सुटेबल बॉय’ ही सीरीज BBC 1 तर्फे तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांनी याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज तयार केली आहे. या सीरिजमधल्या एका दृश्यामुळे वाद पेटला आहे. या दृश्यात मंदिराच्या पार्श्वभूमीवर एक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. मागे देवळातलं भजनसुद्धा ऐकू येत आहे. हेतुपुरस्सर मंदिर परिसरात किंसिंग सीन दाखवल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. “या दृश्याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशात या संदर्भात एफआयआर दाखल केला असून नेटफ्लिक्सच्या कंटेंट विभागाच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल आणि पब्लिक पॉलिसी चेअरमन अंबिका खुराणा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव तिवारी यांनी नेटफ्लिक्स आणि मालिका निर्मात्यांकडे माफी मागण्याची आणि “आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची मागणी केली असून यासंदर्भात रीवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘लव्ह जिहाद’चा हा प्रकार असल्याचा आरोप देखील गौरव यांनी यावेळी केला आहे. या संदर्भात गृहमंत्री मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले होते. या वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य आहेत की नाहीत याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा तपास करून त्यामध्ये आक्षेपार्ह दृश्य आणि विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही गुन्हा नोंद केल्याचे सांगितले.
गौरव तिवारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम 295 (A) धार्मिक भावना व श्रद्धा यांना ठेच पोहोचवणे आणि त्यांचा अपमान करणे याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे रीवा पोलिस अधीक्षक राकेश कुमार सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शनिवारी गौरव तिवारी यांनी रीवा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून नेटफ्लिक्स आणि मालिका निर्मात्यांनी माफी मागण्याची आणि “आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची मागणी केली होती. या मालिकेमध्ये हिंदू मंदिरात एक हिंदू मुलगी एका मुस्लिम मुलाला किस देतेय हे दृश्य दाखवण्यात आले आहे. यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असून ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोपदेखील गौरव तिवारी यांनी केला होता.
दरम्यान, तिवारी यांनी आपल्या तक्रार अर्जात मोनिका शेरगिल आणि अंबिका खुराना यांचे नाव लिहिले होते. नेटफ्लिक्सवरील या सीरिजच्या सहा भागांचे दिग्दर्शन दिग्गज चित्रपट कर्त्या मीरा नायर यांनी केले आहे. त्यांनी सलाम बॉम्बे, मान्सून वेडिंग आणि द नेमसेकसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तब्बू, इशान खट्टर, तानया माणिकताला यांनी या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे