Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये तपासणीसाठी पाच पथके


आयुक्‍तांचे आदेश : दंड आकारुन सीलची कारवाई करा

औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने कोरोना नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. शहरातील कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये तपासणीसाठी पाच पथके तैनात केली असून मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर, संख्यांची मर्यादा याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी दि.17 दिले.
मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल मंगळवारी जिल्ह्यात 120 रूग्ण आढळून आले. त्यात शहरातच अधिक 96 रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता लक्षात पुन्हा नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अनलॉक झाल्यामुळे सर्व व्यवहार सूरू झाले आहेत. कोचिंग क्लासेसला परवानगी दिली असून मंगल कार्यालयात विवाह समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम धुमधडक्यात साजरे होत आहेत. विशेष म्हणजे यात नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसून सोशल डिस्टंसिंगही पाळले जात नाही. सॅनेटायझरचा वापर होत नसून संख्येवर देखील मर्यादा ठेवली जात नाही. त्यामुळे शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने आरोग्य विभागसह वॉर्ड अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोना नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश बुधवारी दिले. याविषयी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले की, संसर्ग वाढत असल्याने कोचिंग क्लासेस आणि मंगल कार्यालयांची तपासणी करण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. कोचिंग क्लासेसच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकांत डॉक्टर, मुख्याध्यापक, नागरिक मित्र पथक, वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे. हे पथक कोचिंग क्लासेसला भेट देवून त्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून मास्कचा वापर, क्लासमध्ये बसताना सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर, थर्मलगन, ऑक्सीमिटरचा वापर केला जातो किंवा नाही याची तपासणी करेल. बुधवारपासून तपासणी देखील सुरू करण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

कोचिंग क्लासेसला 20 हजारांपर्यंत दंड : कोरोना नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास 10 विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासेसला एक हजार रुपये, 50 विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रूपये, 50 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास दहा हजार रूपये दंड आकारून तो वसुल केला जाईल. दुसर्‍या तपासणीत नियमांची अंमलबजावणी होताना दिसून आली नाही तर वीस हजार रूपये दंड आणि 15 दिवसांसाठी कोचिंग क्लासेस सिल केले जाईल. तिसर्‍या तपासणीत नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास एक महिना सील आणि गुन्हा दाखल केला जाईल.

मंगल कार्यालयांसाठी नागरी मित्र पथके : शहरातील मंगल कार्यालयात विवाह सोहळयांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची नागरिक मित्र पथकाकडून तपासणी केली जाईल. हे पथक मंगल कार्यालयात जावून 50 पेक्षा अधिक संख्या, मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर केला जात नसल्याचे आढळून आल्यास दहा हजार रुपयाचा दंड केला जाईल. दुसर्‍या तपासणीत नियम पाळले जात नसल्याचे दिसून आल्यास 20 हजार रुपये दंड व 15 दिवसासाठी मंगल कार्यालय सील केले जाईल. तिसर्‍या तपासणीतही नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर महिनाभर सील आणि 30 हजार रूपये दंड वसुल केला जाणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close