Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

बोर झाला आसेल तर वाचा; माझ्या मनतल्या शहराचे ठस्से

शहराचे ठस्से

नव्वदच्या दशकात शेवटीशेवटी मी सर्वात प्रथम औरंगाबादला आलो होतो. शाळकरी दिवस ओलांडून धुमारे फुटण्याच्या काळात आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याचा आनंद, उत्सुकता आणि भीती त्यावेळी मनात होती. त्यावेळी कधीतरी शहरात राहण्याचा योग येत असे. तेव्हा गावापासून दूर होतो, पण गावाला दुरावलेला नव्हतो. शहर जवळ होते. पण शहराने अजून मनात घर केलेले नव्हते.
महानुभाव आश्रम ओलांडून जेव्हा बस रेल्वे स्टेशनमार्गे शहरात शिरत असे, तेव्हा स्टेशनसमोरच्या मस्जीदमध्ये दुपारच्या अजानचा आवाज घुमत असे. मिनारावर काही कबुतरे घुटमळलेली दिसत. स्टेशनसमोर एक फार मोठा पिंपळ होता. दिवस मावळताना त्याच्यावर प्रचंड पक्षी असत. आणि सगळा परिसर पक्षांच्या किलबिटाने भरून जाई. गाड्या मोटारांचे आवाज त्यापुढे अगदी किरकोळ होऊन जात.
प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजुला गरिबांच्या वस्त्या. पाईपलाईनवर पाणी भरणाऱ्या बायाबापड्या. पाणी खेळणारी लेकरं असत. स्टेशनसमोरचा पिंपळ हातचे राखून न ठेवता खुल्या मनाने तुमचे शहरात स्वागत करत असे. रिक्षांची गर्दी, येणारेजाणारे प्रवासी, हातगाड्यांवरचे किरकोळ विक्रेते, ओला कचरा, स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ येणारे संमिश्र वास जाणवत असत.
फळांच्या गाड्या, कटलरीवाले, उघडयावरचे हेअर सलून, पेपर स्टॉल, उडपी हॉटेल, टॅक्सीच्या रांगा, ‘ईस्लामी खाने का वाहेद मर्कज’ असं लिहिलेल्या खानावळीतला बिर्याणीचा सुगंध, भट्टीत नान भाजणारी घामेजलेली पोर, आरटीओ समोरची गर्दी, देशी दारूचे दुकान, मोकळे मैदान, रामाचे मंदिर, पदमपुऱ्याचा मागचा भाग यांना ओलांडून आपण शहरात शिरत असू.
नेमक्या याचवेळी बाप कुठतरी माळरानावर जिवावर बेतणार काम करत असे. घरून सकाळी एखादा चहा पिऊन निघालेला बाप निवांतवेळी बिडी ओढून पुन्हा कामाना लागे. बापाच्या आयुष्यातल्या काटेरी वाटा कधी संपल्या नाहीत. बाप रानावनात, मळ्यात किंवा एखाद्या वस्तीवर कुण्यातरी माऊलीची अर्धीचतकोर भाकर तळहातावर घेऊन खात असे. बाप अनेक माऊल्यांना हक्काचा भाऊराया वाटत असे. अठरा पगड जातीत बापाला भाऊ म्हणून हाक मारणाऱ्या अनेक बहिणी होत्या. बापाने नाती पेरली होती. नाती राखली होती आणि त्यांची निगराणीदेखील केली होती. बापाजवळ माणसांचे आणि विचारांचे वैभव होते.
अजूनही कुणी जवळ बिडी ओढत असले की तो वास आणि धूर जुन्या दिवसात घेऊन जातो. हातातल पुस्तक छातीवर ठेवून बिडीचा झुरका घेऊन हवेत धूर सोडताना बापाच्या आत काय हलत असेल? बाप जुन्या दिवसांचा हिशोब लावत असेल की नव्या दिवसांचे गणित जुळवत असेल? त्याच्या राकट आणि कमावलेल्या हातात काय काय सुटून गेल्याचे खुणा असतील? कदाचित बापाच्या मनातही या शहराच्या शेकडो आठवणी असतील. शहरात त्याच्याही आवडीच्या कितीतरी जागा असतील.
मला उगाचच आवडत आलेल्या गोष्टीमध्ये हा शहराचा पहिला नंबर लागेल. औरंगाबादला नाव ठेवलेल मी ऐकून घेतो. पण अशावेळी मी मनातून दुखावलेला असतो. आमच्या शहराच्या रस्त्यात खड्डे आहेत. पण आमच्या मनाची माती समतल आहे. सुपीक आहे. इथ नाती सहजतेने वाढू शकतात. आमचे राजकीय नेते चांगले नसणे हे आमचे कर्तृत्व असू शकते. पण इथली माणसे अजूनही चांगली आहेत. हे शहर मला सुरुवातीपासूनच आवडत आलेले शहर आहे. माझ्या आयुष्याची अनेक अयशस्वी वर्षे मी इथे राहिलो आहे. आणि उत्कटतेने जगलो आहे. यशस्वी होण्यासाठी धडपडलो आहे. इथेच मला जीवाभावाचे मित्र लाभले. इथेच मी नवनवीन गोष्टी शिकलो. भिडस्तपणा सोडून थोडासा बोलका झालो. आतून थोडासा बाहेर आलो. कधीतरी थोडस थांबून स्वत:शी मोकळेपणाने बोलू शकलो आहे.
एखाद शहर म्हणजे काय असते? निर्जिव वस्तूंची जंत्री की रसरशीत जिवंतपणा? धूळ चढलेली अपार्टमेंट, जाहिराती रंगवलेल्या भिंती, खड्डे पडलेले रस्ते, रेल्वेरूळं, स्टेशन, भाजीमंडी, नाले, सार्वजनिक मुताऱ्या, मॉल, किराणा दुकाने, स्टेशनरी, हेअर सलून्स, थिएटर, कॉलेज, कॅन्टीन, लायब्ररी. पण या सगळ्या निर्जिव गोष्टीत कुठेतरी आपले सजिव अस्तित्व असतेच ना.
एखादे शहर म्हणजे काय असते? उत्तररात्री होस्टेलच्या टेरेसवरून अनुभवलेली थंड हवा, उजेडाच्या जागा, अंधाराची भूत, गडद होत जाणाऱ्या अंधारातली आश्वासक सोबत, गुलमोहराचा एकटेपणा, रुमच्या भिंतीचा थंड स्पर्श, शेवटच्या पाच रुपंयात दोन मित्रांनी पिलेला चहा, भज्यांचा खमंग सुवास, गावाकडून कुणीतरी आणलेली ढक्कू चपाती, आईने बनवून दिलेली अंडा भुर्जी किंवा झिंगा चटणी, मध्यरात्रीपर्यंत मारलेल्या गप्पा, हसण्साचे आवाज, पोट, गळा आणि मन या तिन्हीमधून गाणाऱ्या मित्राचा आवाज, त्याच्या डोळ्यातली आसव, कवितांच्या वह्या, प्रेमभंगाच्या कथा, जगण्याची कविता नि असच बरच काही.
माणसे प्रेमाला पारखी होतात. पण शहरे प्रेमाला पारखी होत नाहीत. जुन्या पिढ्या शहराच्या प्रेमात असतात. आणि नव्या पिढीची शहराशी नाळ जुळलेली असते. तुमच्या आवडत्या जुन्या जागा बदलून जातात. पण बालपणी जळालेल्या हाताचे व्रण आयुष्यभर सोबतीला राहतात ना, तशा काही जागा असतात. शहर त्यांना बदलून टाकते. पण मिटवून टाकत नाही.

शहराचे ठस्से अमिट असतात. आणि आठवणीची रांगोळी पुसून टाकता येत नाही.

  • अरुण सीताराम तीनगोटे
  • 919764844621
  • प्रतिक्रीया कळवा ,
  • आपण पण ,आपल्या ,मनतले या व्यासपीठ वर ,लिहु शकताता… आपली यशोगाथा , पाठवा

Tags
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close