औरंगाबाद :शहरातून पुन्हा पाच दुचाकी लंपास

औरंगाबाद – दुचाकी चोरांचा शहरात धुमाकूळ सुरूच असून, विविध भागातून पुन्हा पाच दुचाकी चोरांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटना आठवडाभरात घडल्या. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पथके स्थापन केली आहेत. मात्र या पथकांचे दुसरीकडेच लक्ष अधिक असल्याने चोरांचे फावते असल्याचे दिसते आहे.
पहिली घटना सिडको, एन-5, कॅनॉट भागात घडली. निर्दोष जयकुमार परतवार (58, रा. आयनॉक्स तापडीयाच्या पाठीमागे, सेक्टर टाऊन सेंटर सी-3) हे सेवानिवृत्त आहे. 4 जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास परतवार हे कॅनॉट प्लेस भागातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-20-डीएक्स-8109) बँकेच्या गेटसमोर उभी केली होती. बँकेतील काम आटोपून दुपारी अडीचच्या सुमारास ते बाहेर आले. तोपर्यंत चोराने त्यांची दुचाकी लांबवली होती. दुसरी घटना शहागंज भागातील बनेमिया दर्गा परिसरात घडली. कारपेंटर सय्यद समीर सय्यद युसूफ (29, रा. माणिकनगर, गट क्र. 3, नारेगाव) यांनी 6 जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास शहागंजातील हॉटेल जमजम समोरील बनेमिया दर्गाजवळ दुचाकी (एमएच-20-ईव्ही-0393) उभी केली होती. त्यांची दुचाकी पाऊण तासाच्या अंतरावर चोराने लांबवली. तर तिसरी घटना उस्मानपुरा भागातील गोपाल टी जवळ घडली.
शेतकरी अमजद उस्मान पठाण (42, रा. बालानगर, ता. पैठण) हे 5 जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात आले होते. त्यांनी गोपाल टी जवळ त्यांची दुचाकी (एमएच-20-एफजे-7710) उभी केली होती. कामानिमित्त ते बाहेर गेल्याचे पाहून चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबवली. तसेच चौथी घटना अदालत रोडवरील आयसीआयसीआय बँकेसमोर घडली. इमरान खान हुसेन खान (28, रा. पटेलनगर, नारेगाव) हे 5 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास अदालत रोडसमोरील आयसीआयसीआय बँकेत कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी (एमएच-20 सीसी-4223) बँकेसमोरील पार्किंगमध्ये उभी होती. चोराने संधी साधून अवघ्या अर्ध्या तासात त्यांची दुचाकी लंपास केली. याशिवाय वाळुज, लांजी रोड येथील निसार हमीद पठाण (33, रा. लांजी रोड) यांनी 6 जानेवारी रोजी घरासमोर दुचाकी (एमएच-20-एफडी-9101) उभी केली होती. चोराने मध्यरात्री त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली.