Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

आणि काय हवं ३’ मध्ये प्रिया आणि उमेशचे नाते नवीन टप्प्यावर

तुम्हाला असे कधी वाटते का, एक ‘कपल’ म्हणून तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात, तुमचे नाते परिपक्व आहे, एकमेकांना सांभाळून घेता? वैवाहिक जीवनातील सुरुवातीचा काळ हा नेहमीच खास असतो. परंतु जशीजशी वर्षे सरतात, तसे या नात्यातील नावीन्य कमी होऊ लागते. दैनंदिन जीवन सुरु होते. आयुष्यात मजा अशी काही राहातच नाही आणि रटाळ, कंटाळवाणे आयुष्य सुरु होते. अशा वेळी नवरा बायकोच्या नात्यातील मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि या नात्यातील नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणे किती गरजेचे आहे, याची जाणीव होऊ लागते. अशीच कहाणी आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या जोडीची. म्हणजेच जुई आणि साकेतची. त्यांच्यातील या प्रेमाचा गोडवा घेऊन ‘आणि काय हवं’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिझन १ मध्ये जुई आणि साकेत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील प्रत्येक पहिल्या गोष्टीचा आनंद साजरा केला. तर दुसऱ्या सिझनमध्ये लग्नाचे तिसरे वर्षं साजरे करत एकमेकांसोबत वेगवेगळ्या भावना शेअर केल्या. आता सिझन ३ मध्ये जुई आणि साकेतने लग्नाचा पाच वर्षांचा टप्पा गाठला असून त्यांच्यातील विश्वास, प्रेम आणि थोडा वेडेपणा देशभरातील लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांना त्यांच्या जीवनाची ओळख करून देईल. कामासंबंधित गुंतागुंत सोडवण्यापासून ते अचानक असे वाटेपर्यंत की, आता दैनिक जीवनात नवीन बोलण्यासारखे काहीच उरले नाही. असा अनुभव घेणाऱ्या सर्व जोडप्यांचे नित्याचे जीवन ते आपल्या समोर आणणार आहेत. ‘मुरांबा फेम’ वरुण नार्वेकर दिग्दर्शत या मनोरंजक हंगामात प्रिया बापट आणि उमेश कामत यांनीच या भूमिका साकारल्या आहेत. एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशनचे ‘आणि काय हवं ३’ ६ ऑगस्टपासून आपल्याला एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

सिझन ३ बद्दल प्रिया बापट म्हणते, ”हा सिझन आपल्याला लॉकडाऊनदरम्यानच्या जीवनात घेऊन जाणारा आहे. या काळात अनेकांच्या नातेसंबंधांमध्ये अनेक बदल झाले. आपले लग्न कधीही अस्थिर होऊ नये आणि आपले नाते अधिक दृढ होण्यासाठी नवीन छंद जोपासणे किंवा मग एखादा प्रोजेक्ट एकत्र करणे अथवा एखादी अशी गोष्ट जी एकत्र करताना मजा येईल, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधणे खूप महत्वाचे आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुई आणि साकेतचे नातेही समृद्ध होत आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारांना ते यशस्वीरित्या सामोरे जात आहेत आणि याच कारणास्तव मी ही व्यक्तिरेखा साकारली. मी आणि उमेशही खऱ्या आयुष्यात यातील काही क्षण जगलो आहोत. आता जुई आणि साकेत पुन्हा तुमच्या भेटीला येण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.”

उमेश कामत म्हणतो, ”यशस्वी वैवाहिक जीवनासाठी नात्यात संवाद आणि मैत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराला समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हाच संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे. या जोडप्यांमधील गंमतीजंमती आणि कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देणे म्हणजे प्रिया आणि माझ्या ऑफस्क्रीन नात्याचे प्रतिबिंब आहे. मला खरोखरच असे वाटते, की आमच्यातील थोडा स्वभाव, गुण जुई आणि साकेतमध्ये आहेत. मला वाटते, वरुणने ते उत्तमरित्या पडद्यावर जिवंत केले आहे.”

तिसऱ्या सिझनबद्दल वरुण नार्वेकर म्हणतात, ” पहिल्या दोन्ही सिझनना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. तिसऱ्या सिझनमध्ये हे सुंदर आधुनिक नाते अधिक उलगडणार आहे. लॉकडाऊच्या निमित्ताने या समृद्ध नात्यात अधिक गोडवा येईल. जुई आणि साकेतचे पाच वर्षांचे नाते अधिकच बहरलेले दिसेल. ‘आणि काय हवं’ मधील जुई आणि साकेतच्या व्यक्तिरेखेसाठी प्रिया आणि उमेशची जोडी परफेक्ट आहे. त्यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचे प्रतिबिंब ऑनस्क्रिनही दिसते.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close