अक्षदा पडल्या…लग्न झालं आणि वाटेतच 3 नवरी मुली झाल्या फरार

बनावट लग्न लावून लुटणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
जालना : अविवाहित तरुणांशी बनावट लग्न करून लुटून पळून जाणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश करण्यात चंदनजीरा पोलिसांना यश आलं आहे. गुजरातच्या 3 तरुणांशी बनावट लग्न करून मुद्देमालसह पसार झालेल्या 3 तरुणींसह 5 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
गुजरात येथील पियुष वसंत यांना जालना येथील पाशा नावाच्या एका दलालाने एका महिलेच्या माध्यमातून 3 मुली दाखवून गुजरातच्या 3 मुलांसोबत त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरचे सोपस्कार पार पाडून नवविवाहितांना गुजरातला घेऊन जाताना नागेवाडी शिवारात लघुशंकेचा बहाणा करून तिन्ही नवविवाहितांनी सामानासह पळ काढला.
बनावट लग्न लावून देणाऱ्यांचा शोध
गुन्ह्याची माहिती काढत असताना जालना जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीही बनावट लग्न करणाऱ्या महिलांचा शोध घेत असताना बनावट नवरी बनलेल्या एका तरुणीस शनी मंदिर जालना येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने इतर महिलांचे नावे, त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि अन्य माहिती सांगितली. त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी औरंगाबाद, बुलढाणा, जालना जिल्ह्यातून महिलांना ताब्यात घेण्यात आले. नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल मस्के (रा. नागेवाडी) याला नागेवाडी टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या ताब्यातून तक्रारदारचे 3 व गुन्ह्यात वापरलेले 2, असे एकूण 5 मोबाईल, बॅग, रोख रक्कम व वापरलेली मोटार(क्र. एम एच 13 बीएन 2426), असा एकूण 4 लाख 60 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांनादोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.