महाराष्ट्राचा महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ २७ मे रोजी येणार संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला
औरंगाबाद – सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाची घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली होती, अंगावर रोमांच उभे करणाऱ्या “हंबीर तू…” या गाण्याने ती अजून वाढली तर “सरसेनापती हंबीरराव” च्या जबरदस्त ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. “परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट”… “युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे” … “मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत” असे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या चित्रपटातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेले अतुलनीय शौर्य पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या महासिनेमाचा ट्रेलर पाहूनच चित्रपटाची भव्यता लक्षात येते आहे. मराठीत आजपर्यंत पाहायला न मिळालेले अनेक कलाकारांचा समावेश असलेले अंगावर रोमांच उभे करणारे लढाईचे प्रसंग, स्फूर्ती देणारे संवाद आणि महेश लिमये यांचे नेत्रदीपक छायांकन यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाला ‘महाराष्ट्राचा महासिनेमा’ का म्हणतात? हे कळते.
या महाराष्ट्राच्या महासिनेमातून “मी आता औरंगजेबाला इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार” असे म्हणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे आक्रामक रौद्र रूप पाहायला मिळणार असून “तुमच्या सारखा मामा प्रत्येकाला मिळो” अशा संवादातून त्यांचे आणि सरसेनापती हंबीरराव यांचे एक हळवे नातेसुद्धा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनी याने साकारली आहे. “आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा” असा हुंकार देणारे सरसेनापती हंबीरराव ही मुख्य भूमिका प्रविण तरडे यांनी साकारली आहे. या बरोबरच मोहन जोशी, उपेंद्र लिमये, राकेश बापट, श्रुती मराठे, स्नेहल तरडे,सुनील पालवाल, किरण यज्ञोपवीत, सुनील अभ्यंकर, रमेश परदेशी देवेंद्र गायकवाड सुरेश विश्वकर्मा, क्षितिश दाते, जयेश संघवी, शुभंकर एकबोटे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे. आर्या रमेश परदेशी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
“सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत असून गीतकार प्रणित कुलकर्णी यांच्या गीतांना कैलाश खेर, आनंद शिंदे, नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढवला आहे तर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक रमेश परदेशी असून साहस दुश्ये प्रद्युम्न कुमार उर्फ PK मास्टर यांची आहेत. पार्श्वसंगीत अविनाश विश्वजित, संकलन मयूर हरदास, कला दिग्दर्शन मदन माने, वेशभूषा मानसी अत्तरदे, पोशाख आणि शस्त्र व्यवस्थापन गणेश लोणारी व विनोद वणवे, रंगभूषा महेश बराटे, केशभूषा ज्योती सोनावणे, कार्यकारी निर्माता विशाल चांदणे आहेत.
संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा २७ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.