Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

पाण्याचे नियोजन करता न आलेली पिढी 

पाण्याचे नियोजन करता न आलेली पिढी

शेजारच्या एका गावात ‘श्यामसुंदर’ नामक व्यक्तीने त्याच्या शेतात कुपनलिका खणली, तर त्याला पाचशे फूट जमिनीखाली पाण्याचा झरा लागला. अर्थात पाणी शेतामध्ये खळाखळा वाहू लागले. श्यामसुंदर खुपच खुश झाला,त्याने लगेच गावभर मिठाई वाटली. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. त्यांच्या शेतातला हा सातवा बोअरवेल होता, ज्याला पाणी लागले. सगळे म्हणत पण होते, ” सातव्यांदा खणल्यावर साडेसाती एकदाची सम्पली.” 

  मला वाटले, की इतक्या परिश्रमाने व खुप प्रयत्नांती शेतात पाणी आले. श्याम व त्यांचे कुटुंबीय आता पाण्याचा जपून वापर करतील आणि त्याचे व्यवस्थित नियोजन सुद्धा करतील. जसे,शेतात ठिबक व तुषारचा वापर, पिकाला देण्यात येणारे अनावश्यक पाण्याच्या फेऱ्या टाळणे, वैगरे! दुसऱ्या दिवशी त्यांच्या शेताच्या बाजूने जात होतो तर काय पाहतो? शेताभोवतीच्या नाल्यातून ओढा वाहतोय; हा भास नव्हे साक्षात्कार होत होता. शेतामधील पिके नेमकीच काढल्यामुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्नच नव्हता. मग हे पाणी असे वाहतेय का? हे विचारण्यासाठी मी श्यामकडे गेलो. श्यामला चौकशी केली असता मला अतिशय वाईट व मूर्खपणाचे उत्तर मिळाले. उत्तर कशाचे! माझ्यासाठी तो यक्षप्रश्नच होता. आशा मूर्ख व व्यवहारशून्य लोकांना आणि अशाच बावळटांना कसे समजावून सांगावे हाच तो यक्षप्रश्न!

  श्यामचे उत्तर नम्र पण भ्रम पसरवणारे होते. तो सांगत होता, ” झरे मोकळे करतोय.” मी म्हटले, ” झरे मोकळे! म्हणजे?” त्याने पुढे सांगितले की, झरे मोकळे करणे म्हणजे काही दिवस असेच पाणी वाया जाऊ देणे. त्याने काय होईल तर झरे मोकळे होतात आणि बोअरवेलचे पाणी आणखी वाढायला सुरुवात होते. अरेरे! हा मूर्खांचा बाजार ज्याने कोणी सुरू केला असेल न, त्याच्या एक कानाखाली ठेवून द्यावं असे सारखे वाटायले लागले, मला अगदी त्याक्षणापासून! आधीच पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे, आणि हे ‘उंटावरचे शहाणे’ झरे मोकळे करण्याच्या अगदी तकलादू पध्दतीने जीवंत पाण्याचा ऱ्हास घडवून आणत आहेत. आता यांची ही झरे मोकळे करण्याची प्रक्रिया केवळ त्या दिवसापुरती नाहीतर मध्ये- मध्ये कधीही अशीच सुरू राहील. असे श्याम, राम, आणि कितीतरी ‘नाम’ आहेत जे झरे मोकळे करण्याच्या नादात ‘जीवन’ म्हणतात ते जलस्रोत संपवण्याच्या मार्गी लागले आहेत.

  कित्येकदा नगरपालिकेच्या सार्वजनिक नळाचे पाणी घरोघरी सोडल्यानंतर जेव्हा आपले पाणी भरणे संपते, त्यावेळेला कैक घरासमोरचे नळ असेच सुरू राहून त्याचे पाणी घरासमोरच्याच नालीत वाहत असल्याचे मी खुप वेळा पाहिले आहे. काहीजणांना त्या नळाची तोटी बंद करण्याची फुरसत नसते, काहीजण नाली साफसफाई करतात म्हणे, काहीजण तर असे आहेत ज्यांच्याकडे तोटी बंद करायचे कॉक किंवा त्यावर बसवायचे झाकनच नाही म्हणे! हसू की रडू काही कळत नव्हते! म्हणजे आम्ही 20 रुपयांचा गुटखा दिवसातून पाचदा खाऊ, पण 10 रुपयाचे झाकण तोटीला बसवायला आणणार नाही. जेव्हा उन्हाळ्यात चार दिवसात एकदा पाणी येते, तेव्हा बोंबलणारे पण हेच असतात. तेव्हा पाणी बंद झाले की डोळ्यात पाणी आणतात आणि सुखाच्या काळात माजून जातात. जनावरांमध्ये आणि आपल्यात कुठलाही फरक राहिला नसल्याचे कदाचित ते निदर्शकच असेल!

  घरचे पाणी शिळे झाले म्हणून फेकून देणारी ‘सविता’ असेल नाहीतर झाडाला अवाजवी पाणी देणारा ‘गोविंद’, नाहीतर शॉवरखाली मनसोक्त अंघोळ करणारा ‘अजीज’; सगळेच इथून तिथून सारखेच! कोणालाच पाण्याची बचत करत असतात; हे माहितच नसावे. बऱ्याच वाळवंटी देशात नाहीतर आपल्याच देशातील पर्जन्यछायेतील प्रदेशात कधी जाऊन पहा म्हणा! पाण्यासाठी किती समस्यांचा सामना करावा लागतो ते! आजही ज्या गावात नळयोजना नाही, तिथे उन्हाळ्यात पाच-पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्या लोकांना थेंबा- थेंबाचे महत्व आहे. त्यांच्या काळात सुकाळ असताना त्यांची मानसिकता कशी होती? हे आपण आता सांगू शकत नाही, पण असे अनुभव घेतल्यावर कोणीपण नक्कीच सुधारेल.

   दुष्काळ पडतो तेव्हा आकाशाकडे पहावे लागते. फक्त पावसाचे पाणी नाही पडले म्हणून ही वेळ आली नाही, तर जमिनीत पाणी साठवण्यासाठी आपण कुठलेच प्रयत्न केले नाहीत याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.

  पाणी हे तहान भागवण्याचे काम करते, हे तर आपण विसरूनच गेलो आहोत. कारण पाणी पिण्यासोबतच शेतीसाठी, अंघोळीसाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी, कोल्ड ड्रिंक साठी व इतर बऱ्याच कामी उपयोगी येते. त्यामुळे त्याचे मुख्य काम सजीवांची तहान भागवणे हे आपण विसरलो आहे. आणि ते तितके साहजिकच आहे. ते विसरण्यामागे पण एक कारण आहे. ते म्हणजे पाण्याची असणारी उपलब्धता होय. ज्यामुळे त्याची किंमत आपण शून्य करून टाकली आहे. जेव्हा हेच पाणी भेटणे मुश्कील होईल, तेव्हा आपण आधी स्वतःची तहान भागवू व नन्तर इतर गोष्टी करू! कारण ते अनुपलब्ध होऊन जाईल न तेव्हा! 

  तहान भागवते ते पाणी, आणि त्याची किंमत न करणे हे बेईमानी. आज जर नाही सुधारले, तर भविष्यात कदाचित सुधारणार पण नाही आणि तेव्हाचा भविष्यकाळ आणि तेव्हाची भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हाची जीवंत पिढी व आताची मरत असलेली पिढी इतकेच म्हणेल की, ‘ आमची पिढी पाण्याचे नियोजन करू शकली नाही.’

धन्यवाद!

लेखक- अमोल चंद्रशेखर भारती

( लेखक / कवी / व्याख्याते, नांदेड )

मो – 8806721206

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close