पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
लातूर प्रतिनिधी:-
किल्लारी पोलीस स्टेशनला शनिवारी रात्री ( ता. 12 ) ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार एस.एस. सावंत यांनी सुसाईड नोट लिहुन मध्यरात्री गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री किल्लारी पोलिस स्टेशनला नाईक कृष्णा गायकवाड, मीरा जाधव यांच्यासह पीएसओ कर्मचारी एस. एस सावंत हे ड्युटीवर होते. मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटाला सावंत यांनी ठाण्यातील रायफल च्या साह्याने हनुवटीच्या खालून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. हा आवाज ऐकून नाईक कृष्णा गायकवाड हे घटनास्थळी पोंहचले. सदरील घटनेची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिली.
एपिआय गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदरील माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना कळवली. रात्री साडेतीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हे किल्लारी पोलीस स्टेशन येथे उपस्थित आहेत. याप्रकरणी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणेने सर्व व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावंत यांनी २०१७ मध्ये कासार शिरशी ( ता. निलंगा ) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना निलंगा तालुक्यातील काही शैक्षणिक संस्था चालक व काही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आर्थिक व्यवहार केले होते. स्वतःच्या खाजगी प्रॉपर्टी वर कर्ज उचलून त्यांनी ते बैठकितल्या व्यवहारांमध्ये दिले होते. यांना जवळपास नऊ ते दहा लाख रुपये देणे होते. ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेला आहे. असे लोक रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी यासंदर्भात यापूर्वीही तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटी कर्ज काढून दुसऱ्याला दिलेले पैसे परत येत नसल्याने हतबल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.